यूथटॉक : गडकिल्ल्यांचे संवर्धन हेच शिवकार्य

गणेश रघुवीर
शनिवार, 22 जून 2019

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै हे माझं मूळ गाव. तेथे गोवागड नावाचा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग अशी दुर्गचौकट आहे. बालवाडीत असल्यापासून या किल्ल्यांचं दर्शन मला सातत्यानं होत होतं. बालवयात तेवढं आकर्षण नसलं, तरी किल्ल्याची ओढ मात्र होतीच. शिक्षण पूर्ण करता करता दुर्गभ्रमंतीचं वेड लागलं. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गडकिल्ले भ्रमंतीची आवड निर्माण झाली. पुढे ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्याशी शिवरथ यात्रेत ओळख झाली आणि दुर्गसंवर्धन व इतिहासाची माहिती मिळत गेली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै हे माझं मूळ गाव. तेथे गोवागड नावाचा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग अशी दुर्गचौकट आहे. बालवाडीत असल्यापासून या किल्ल्यांचं दर्शन मला सातत्यानं होत होतं. बालवयात तेवढं आकर्षण नसलं, तरी किल्ल्याची ओढ मात्र होतीच. शिक्षण पूर्ण करता करता दुर्गभ्रमंतीचं वेड लागलं. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गडकिल्ले भ्रमंतीची आवड निर्माण झाली. पुढे ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्याशी शिवरथ यात्रेत ओळख झाली आणि दुर्गसंवर्धन व इतिहासाची माहिती मिळत गेली. गडकिल्ल्यांची भ्रमंती करताना किल्ल्यावरील अवशेषांचा, वास्तूंचा अभ्यास करू लागलो. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, हरियाना, दिल्ली व मध्य प्रदेशातील सुमारे ८०० किल्ल्यांची भ्रमंती केली. स्थापत्य आणि लष्करीदृष्ट्या किल्ल्यांचे महत्त्व आणि ते अभ्यासून त्यानुसार किल्ल्यांविषयी लिखाण सुरू झाले.

दुर्गभ्रमंती ही तरुणाईला आत्मविश्‍वास आणि मानसिक ताकद देणारी आहे. त्यामुळे त्यातून नवं काहीतरी बघण्याची जिज्ञासा वाढते. तसेच इतिहासाची चिकित्सा करण्याचे बळ मिळत असते. त्यामुळे तरुणांनी दुर्गभ्रमंती करतानाच, किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा दुर्गभ्रमंतीतून बघणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हे काम तरुणच करू शकतात. त्यासाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून किल्ल्यांना भेटी देण्याची गरज आहे. मी गेली साडेतीन वर्षे एकही रविवार न चुकता सलग १८० दुर्गभ्रमंती करून दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी झालो आहे. या कार्याची आता चळवळ होण्याची गरज आहे आणि त्यासाठी तरुणांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

पूर्वीपेक्षा ट्रेकिंगसाठी तरुण आज बऱ्यापैकी बाहेर पडतात, गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घेतात; तर काही मौजमस्ती म्हणूनही गड-किल्ल्यांवर जाणारे आहेत. मौजमस्ती करण्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. ज्यांना जेथून आनंद मिळवावासा वाटतो, तेथून त्यांनी तो मिळवावा; पण मौजमस्ती करताना किल्ल्यावर मद्यपान वा अन्य अनुचित गोष्टी करू नयेत. गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे. किल्ल्यावर जाताना काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे. किल्ल्यांच्या परिसरातील कुठल्याही नैसर्गिक संपत्तीला जराही हानी पोचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मग ते झाड असो, वा दगड-माती-खडक. किल्ल्यावरील तटबंदी, बुरूज अथवा कुठल्याही दगडावर आपले नाव लिहून, त्या ऐतिहासिक वास्तूला विद्रूप करू नये. असे करताना त्या क्षणी आनंद वाटत असला, तरी ती विकृतीच आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे. तरुणांनी गड-किल्ले भ्रमंतीचा आनंद नक्कीच मिळवावा. त्याचबरोबर या ऐतिहासिक स्थळांना कुणी विद्रूप करत असेल, तर त्यांना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. गड-किल्ल्यावर जेवढी स्वच्छता ठेवता येईल, तेवढी ठेवलीच पाहिजे. शक्‍य असेल तर तेथील स्वच्छता अभियानातही सहभागी व्हावे; अन्यथा इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकोट काळाच्या ओघात नामशेष होतील आणि आपण काहीही करू शकणार नाही.
आज महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची स्थिती फारशी बरी नाही. महाराष्ट्रात ४५० हून अधिक किल्ले असले, तरी राज्य आणि केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत जवळपास ९० किल्ले आहेत. उर्वरित किल्ले वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार यांच्या कक्षेत; तर काही खासगी मालकीचे आहेत; पण देखभालीअभावी यातील सुमारे २०० किल्ले शेवटची घटका मोजत आहेत. महाराष्ट्रात अनेक संस्था दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या निकषांनुसार किल्ल्यांचे संवर्धन करणारे ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या कामात आघाडीवर आहे. प्रतिष्ठानने हजारो गडप्रेमींना एकत्र आणून दुर्गसंवर्धन चळवळ हाती घेतली आहे. दर रविवारी तोफगाडे, दरवाजे लोकार्पण, किल्ल्यावरील वास्तूंना प्रकाशात आणून नवसंजीवनी देण्याचे काम संस्था करीत आहे. अन्य संघटनाही या कामात पुढाकार घेत आहेत. माझ्यासारखे अनेक तरुण-तरुणी या मोहिमेत सहभागी होत आहेत. गड-किल्ल्यांची दुरवस्था ही आपली सर्वांची व्यथा आहे. या व्यथेची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन हेच खरे शिवकार्य आहे, असे मी मानतो.

(लेखक ‘सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र’च्या दुर्गसंवर्धन विभागाचे अध्यक्ष आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh raghuvir write youthtalk article in editorial