चीनशी मैत्रीसाठी कृती आराखडा

gautam bambawale
gautam bambawale

चीनबरोबरील संबंध दृढ करतानाच अन्य देशांशीही मैत्रीचे संबंध राखता येतील. चीनशी संबंधांबाबत नेमकी कोणती पावले उचलावीत, या दृष्टीने काही तज्ज्ञांनी ठोस विचार मांडले आहेत. उभय देशांच्या संबंधांना निश्‍चित दिशा देणारा हा ‘पुणे कृती कार्यक्रम’ सर्वसमावेशक आहे.

स ध्या देश निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत मग्न असला, तरी काही महत्त्वाच्या परराष्ट्र धोरणविषयक बाबींवरही मंथन व्हायला हवे. विशेषतः पुढच्या पाच वर्षांतील देशाचे परराष्ट्र धोरण कसे असायला हवे, प्रमुख देशांशी संबंधांबाबत कोणती धोरणात्मक दिशा असायला हवी, यावर चर्चा होणे आवश्‍यक आहे. त्यातून येणाऱ्या सूचना, सल्ला, माहिती यांचा कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी त्याला उपयोग होईल, हे निश्‍चित. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता चीनबरोबरचे संबंध हा सर्वांत महत्त्वाचा भाग ठरणार आहे. त्या देशाशी असलेल्या आपल्या संबंधांबाबत नेमकी कोणती पावले उचलायला हवीत, या दृष्टीने देशातील काही अभ्यासक, तज्ज्ञ, तसेच विश्‍लेषक या विषयाचा विविध अंगांनी विचार करीत आहेत. विशेषतः पुण्यात काही अभ्यासकांनी व्यापक विचारमंथनातून या विषयासंबंधी अधिक ठोस कल्पना आणि विचार मांडले आहेत. भारत-चीन संबंधांविषयीचा ‘पुणे ॲक्‍शन प्लॅन’ असे नामाभिधान त्याला द्यायला हरकत नाही.

चीनमधील राजकीय व्यवस्था अत्यंत केंद्रीभूत आहे. शीर्षस्थ नेतृत्वाच्या हाती सर्व सत्ता एकवटलेली आहे. त्यामुळेच अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी प्रथम राजकीय संवाद साधणे आवश्‍यक असून मग क्रमाने मंत्री आणि नंतर अधिकारी पातळीवर संवादाची प्रक्रिया करावी लागेल. २०१८मध्ये वुहान परिषद झाली होती. तिचा पाठपुरावा आवश्‍यक असून शी जिनपिंग यांची २०१९च्या उत्तरार्धात भारतभेट घडवून आणायला हवी. पंतप्रधान व शी जिनपिंग यांच्यात थेट चर्चा व्हायला हवी. वुहानप्रमाणेच ती अनौपचारिक पातळीवर असू शकेल. ज्या देशांना परस्परविश्‍वासाच्या आधारे उभयपक्षी संबंधांबाबत पुढे जायचे आहे, त्यांच्या नेत्यांत विस्ताराने अनौपचारिक पातळीवर चर्चा व्हावी. दोन मोठ्या देशांतील नेत्यांनी आपापल्या देशांची उद्दिष्टे, स्वप्ने, परिस्थितीचे मूल्यमापन, एकमेकांविषयी जाणवणारे धोके, आडाखे या मुद्‌द्‌यांवर चर्चा केली, तर त्याचा फार चांगला उपयोग होईल.

भारत व चीन यांच्यात लष्करी पातळीवरही संवाद व सहकार्य वाढायला हवे. सध्या फक्त भूदलाच्या पातळीवर अशी चर्चा होते; परंतु तिची व्याप्ती वाढवून नौदलाच्या पातळीवरही विचारविनिमय होण्याची आवश्‍यकता आहे. ती फक्त अभ्यासदौरे आणि दैनंदिन कामाविषयीचे संवाद यापुरती मर्यादित राहायला नको. या प्रतीकात्मकतेच्या पलीकडे जायला हवे. परस्परांना एकमेकांचे दृष्टिकोन अधिक खोलात जाऊन अभ्यासता यावेत, याची गरज आहे. हे लगेच शक्‍य होईल, असे नाही; पण कुठेतरी सुरवात व्हायला हवी. सरहद्दीवरही परस्परांतील विश्‍वास वाढविण्यासाठी काही पावले उचलायला हवीत. दोन्ही देशांची सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकून निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी ‘स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’मध्ये आवश्‍यकतेनुसार काही भर घालता येईल.

आपण तयार केलेल्या औषधांना जगभर बाजारपेठ उपलब्ध होताना दिसते. चीनमध्ये देखील ती उपलब्ध व्हायला हवी. भारत व चीन यांच्यातील व्यापारात असलेला असमतोल दूर व्हायला हवा. चीनमधील पर्यटकांनी भारताला भेट द्यावी, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत. ‘इनक्रेडिबल इंडिया’चे जास्तीत जास्त मार्केटिंग केले जावे. ते करण्यासाठी चीनमधील ट्रॅव्हल एजंटांचा उपयोग करून घेतला पाहिजे. दोन्ही देशांदरम्यान उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्या, विविध ऑनलाइन एजन्सी, सोशल मीडिया या जास्तीत जास्त माध्यमांचा उपयोग करून भारतातील पर्यटनाविषयी चिनी नागरिकांमध्ये आकर्षण निर्माण व्हावे, याचा प्रयत्न करता येईल. एकीकडे हे प्रयत्न करीत असतानाच चिनी पर्यटकांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आपल्याकडे काही सोईसुविधा निर्माण करायला हव्यात. आपल्याकडील डोंगरदऱ्या, सागरकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक-प्राचीन स्थळे, बुद्धविहार, स्तुप, अभयारण्ये या सगळ्यांना चिनी पर्यटकांत प्रचंड लोकप्रियता मिळेल, यात शंका नाही. एका अंदाजानुसार, प्रयत्न केले तर २०२०पर्यंत भारतात येणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्या १५ लाखांवर जाईल.

चांगली पटकथा, उत्तम अभिनय असलेले बॉलिवूडचे चित्रपट चिनी रसिकांना आवडतात. चांगल्या चित्रपटांना तसा प्रतिसाद मिळाला आहे. ‘दंगल’सारखा चित्रपट चिनी चित्रपटरसिकांना आवडला. अशा कसदार चित्रपटांना चिनी प्रेक्षक गर्दी करतील. काही प्रेक्षकांनी असे सांगितले आहे, की विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिलांची स्थिती अशा विषयांवर काढलेले चित्रपट पाहायला आम्हाला आवडतील. हे लक्षात घेऊन चित्रपट निर्मात्यांना चीनमध्ये मार्केटिंगसाठी सरकारने साह्य करायला हवे. सर्वसामान्य लोकांच्या, समाजाच्या पातळीवर परस्परविश्‍वास आणि सहकार्य वाढण्यासाठी चित्रपट हे माध्यम फार महत्त्वाचे ठरेल. शिवाय या सहकार्यातून आपल्याला बहुमोल असे परकी चलन मिळेल. चीनला देण्यासारखी अस्सल भारतीय गोष्ट म्हणजे योग. लाखो चिनी नागरिकांना त्याविषयी कमालीचे कुतूहल आणि आकर्षण आहे. त्यामुळे योगप्रसार चालू ठेवायला हवा. २१ जून रोजी चीनमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला, हे नोंद घेण्याजोगे आहे. या दिवशी योगाच्या कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आठ ते दहा हजार लोक एकत्र येतात, ही गोष्ट साधीसुधी नाही. एकूणच ‘सॉप्ट पॉवर’ निर्यात ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. भारत व चीन यांच्यातील लोकांमधील बंध वाढविण्यास याचा उपयोग होईल. आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे क्रीडा. टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्‍स, नेमबाजी, पोहणे या क्रीडाप्रकारांत आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी चिनी प्रशिक्षकांना भारतात आणण्यात यावे. त्याचा आपल्या तरुणवर्गाला उपयोग होईल.

‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’साठी भारताने पुढाकार घेतला. फ्रान्सच्या सहकार्याने स्थापन केलेल्या या संस्थेचे मुख्यालय भारतात आहे. जितक्‍या लवकर चीनला यात सहभागी करून घेता येईल, तेवढे चांगले. सोलर पॅनेल व आनुषंगिक सामग्रीचे उत्पादन करण्यात चीन अग्रेसर आहे. शिवाय या मुद्‌द्‌यावर चीन आणि आपले मूलभूत मतभेद नाहीत. त्यामुळेदेखील चीनचा सहभाग अधिक प्रस्तुत ठरेल. एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेत आशियातील हे दोन मोठे देश एकत्र काम करतात, ही घटना अतिशय उत्तम वातावरणनिर्मिती करेल. उभयपक्षी लाभकारक अशी ही घटना ठरेल. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविणे आवश्‍यक आहे, हे चीनला पटवून देण्याचे प्रयत्न चालूच राहायला हवेत. अर्थात आपले मुत्सद्दी हे प्रयत्न करीत असतील, याविषयी शंका नाही. ‘प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी’त ( आरसीइपी-रिसेप) भारत व चीन हेच प्रमुख देश आहेत. ‘रिसेप’ने विविध सेवा उपक्रमांचे आदानप्रदान आणि दोन्ही देशांतली लोकांची ये-जा सुलभरीतीने होण्यास कटिबद्धता दर्शवायला हवी. दोन्ही देशांनी आयात शुल्काबाबतही लवचिकता ठेवायला हवी.

चीनबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांशी असलेल्या संबंधांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. चीनबरोबर संबंध दृढ करतानाच इतर देशांशीही मैत्रीचे संबंध राखता येतील. हे आव्हान पेलण्यास आपले मुत्सद्दी सक्षम आहेत. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारसाठी चीनच्या संदर्भात ठोस दिशा देणारा हा ‘पुणे कृती कार्यक्रम’ आहे. तो सर्वसमावेशक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com