कुंचल्यातून व्हा व्यक्त

Brush
Brush

चित्रकलेत चूक/बरोबर असं काही नसतं. तुम्ही परीक्षेलाच बसणार असाल तर योग्य विषयाचे ज्ञान असणं अपेक्षित आहे. व्यावसायिक चित्रकाराला मिळालेले ज्ञान कसे वापरावे, याची मर्यादा किंवा बंधन असे नसते. उलट जितके प्रयोग करू तितके चांगले. मग मी अमुकच रंग का वापरला, याचे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. हे स्वातंत्र्य मौल्यवान आहे. स्वतःसाठी चित्रनिर्मिती करणाऱ्यांना तर अजिबात काहीच बंधन नसते. पूर्ण तांत्रिक शिक्षण घेतलेला चित्रकारसुद्धा त्याच्या ज्ञानाचा वापर नकळत करतच असतो, पण पूर्ण स्वातंत्र्य अनुभवतो. हा अनुभवच खूप विलक्षण आहे. तो कॅन्व्हास किंवा तो कागद पूर्णपणे आपला असतो. त्यावर आपल्याला काहीही काढता येणे, असे स्वातंत्र्य इतक्‍या सहज मिळत असेल, तर मग का नाही घ्यायचे ते? बरं, त्याने कोणाला काही त्रासही नाही. 

तंत्र हे अभिव्यक्तीला समृद्ध करणारे साधन आहे, सर्वस्व नाही. आपल्याला जे दाखवायचे आहे ते कसे दाखवता येईल यासाठी तंत्राचा आधार आपण घेतो; पण अभिव्यक्ती आपलीच! त्यामुळेच तर ही कला अतिशय व्यक्तिगत, सच्ची आणि बंधनमुक्त आहे. आणि आपली चित्र तर आपल्या सोबत राहतात... अगदी कायमस्वरूपी. आपल्याच नाही तर नंतर येणाऱ्या पिढ्यांसोबतही... तेही अगदी अस्सल, अद्वितीय अशा मूळ स्वरूपात. स्वतःच्या आनंदासाठी चित्रनिर्मिती करण्यासारखे सुख नाही. तेव्हा ते चित्रच तुमचे भावविश्‍व असते. अगदी कशाचीही पर्वा न करता आपण त्यात पूर्ण व्यक्त होऊ शकतो. अनेक जण छंद म्हणून ही कला जोपासतात. पण जर केवळ हौशी चित्रकार ते व्यावसायिक चित्रकार असा प्रवास आपल्याला करायची इच्छा असेल तर तांत्रिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. ‘आर्ट स्कूल''चे शिक्षण तर उत्तमच; पण ते नसेल शक्‍य तर एखाद्या चित्रकाराच्या स्टुडिओवर जाऊन योग्य तांत्रिक शिक्षण घेता येतेच. काहीच कष्ट न घेता व्यावसायिक चित्रकार होऊ शकतो, हा समज चुकीचा वाटतो मला. काहींना असेही काही जण असतात ज्यांना जन्मतः एक देणगीच मिळालेली असते; मुळातच त्यांना कलेची समज असते. त्यांच्याशी आपण प्रत्येक जण बरोबरी नाही करू शकत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक गोष्ट विसरून चालणार नाही, की कलेची देणगी असणाऱ्यांनीही अपार कष्ट करूनच चित्रकार म्हणून नावलौकिक मिळवला आहे. उदा. विन्सेंट व्हॅन गॉग, हे एक जगप्रसिद्ध नाव. त्याने तर अथक परिश्रमाने नवीन शैली निर्माण केली चित्रकलेच्या दुनियेत. त्याने कला महाविद्यालयात शिक्षण नव्हते घेतले, तरी त्याने त्या काळातील अनेक थोर चित्रकार, त्यांची चित्रशैली यांच्यातून प्रेरणा घेतली, अभ्यास केला. त्यांच्यासोबत कामही केले. त्यातून त्याची शैली विकसित झाली. आपल्याकडेही काही प्रसिद्ध समकालीन चित्रकार आहेत जे मुळात चित्रकार नव्हते. डॉ. सुधीर पटवर्धन यांचे नाव पटकन सुचते. डॉ. सुबोध केरकर हेही असेच एक नाव, ज्यांनी डॉक्‍टरकीचे शिक्षण घेतले आहे.

या दोघांनीही त्यांची अभिव्यक्तीची गरज जाणली, पॅशन ओळखली आणि दृश्‍यकलेत त्यांची विशिष्ट शैली निर्माण केली. हे अचानक एका दिवसात नाही घडले. त्यांच्या नैसर्गिक देणगीला जोड मिळाली अभ्यासाची. म्हणूनच भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी अवश्‍य कुंचला हाती घ्या.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com