esakal | कलाबहर... : आनंदी चेहरे रेखाटणारा कुंचला
sakal

बोलून बातमी शोधा

Anuradha Thakur

कलाबहर... : आनंदी चेहरे रेखाटणारा कुंचला

sakal_logo
By
गायत्री देशपांडे

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांनी ‘चित्रकला’ ही केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता समाजातील अगदी तळागाळापर्यंत पोचवली; अगदी आदिवासींपर्यंत. चित्रातून अद्‍भुत असं निर्माण करणाऱ्या अनुराधा ठाकूर मूळच्या नगरच्या. त्यांचे चित्रकला शिक्षण झाले पुण्यात. ‘कला’ सकारात्मक बदल घडवून आणू शकते, यावर त्यांचा विश्‍वास कायम होता. समाजासाठी काहीतरी करायची इच्छा बाळगून त्यांनी अनेक एनजीओ व शाळांच्या माध्यमातून काम केले.

ग्रामीण महिला, किशोरवयीन मुलं-मुली यांसाठी कलेच्या माध्यमातून विविध प्रकल्प केले. चित्रकलेच्या माध्यमातून ‘मुलांचा गुणात्मक विकास आणि वर्तनबदल’ या त्यांच्या प्रकल्पाला राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला. चित्रकला कार्यशाळांमधून ग्रामीण विभागातील मुलींना आत्मविश्‍वास व समाजाचा सन्मान मिळवून दिला. शहरी गृहिणींमध्येही त्यांनी अनेक सकारात्मक बदल होताना बघितले. कलेच्या माध्यमातून आपण स्वतः काहीतरी घडवू शकतो, ही जाणीव त्यांनी जागृत केली. ‘कला तुमच्याकडे जे आहे त्यातूनच आनंद देते. जे मिळेल त्यातून कलानिर्मिती करता येते आणि शून्यातून आपण विश्‍व निर्माण करू शकतो,’’ हा विश्‍वास अनुराधा ठाकूर यांनी त्या स्त्रियांना दिला. यातून त्यांना स्वतःला खूप आनंद मिळतो, असं सांगताना त्या म्हणतात- ‘‘माझ्या चित्रांतून लोकांना आनंद मिळावा.’ पंतप्रधान कार्यालयात आज त्यांचे चित्र आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘माझ्या कार्यात मला अत्यानंद मिळतो आणि हेच माझे जीवन आहे असे मला वाटते.’

आदिवासींचे जीवन त्यांनी खूप जवळून बघितले आहे. आणि त्यातून प्रेरणा घेऊन तब्बल २२ वर्षांच्या खंडानंतर त्यांनी कुंचला उचलला. त्या समाजातील सुसंवाद, प्रामाणिकपणा, ताल या सर्वांनी त्यांच्या कॅन्व्हासला व्यापले. काळ्या रंगांनी महत्त्वाच्या घटकांना त्यांनी रंगवले. काळा रंग हे शुद्धता व प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या चित्रांतील आकृती जरी काळ्या असल्या तरी त्या आनंदी दिसतात. कठीण परिस्थितीत असूनही आनंदाने जगणाऱ्या या लोकांची चित्रं आहेत ही. काळा रंग तसा खरं तर जड दिसणारा. एक रेष चुकली तरी चित्र खराब होऊ शकतं. म्हणूनच तो वापरायला हात हवा एका प्रामाणिक, स्वच्छ, शुद्ध मन असणाऱ्या चित्रकाराचा. त्यासाठी निर्भयता लागते.

हे आव्हान अनुराधाताईंनी ताकदीने पेलले. शुद्ध मनाच्या लोकांची चित्रं करताना काळा रंग अगदी सहज अवतरला त्यांच्या चित्रांत. भरपूर प्रवासातून मिळालेल्या समृद्ध अनुभवाला त्यांच्या हातून चित्ररूप मिळाले. त्यांनी त्या लोकांना इतका आनंद दिलाय, की तोच आनंद त्यांच्या चित्रांत परावर्तित होतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आसाम, राजस्थान, हिमाचल प्रदेश येथील भ्रमंतीत विविध संस्कृती, जीवनशैली त्यांनी आत्मसात केल्या. ‘साँग ऑफ नेचर’ ही त्यांची चित्रमालिका या अनुभवांतूनच जन्मली. त्यांच्या चित्रांतील विषय सोपे असतात. काळा व पांढरा रंग प्रामुख्याने पारदर्शकता दर्शवतात. तेजस्वी रंग त्या लोकांच्या आयुष्याचे व त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचेच प्रतीक आहे. जगभरात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली.

भारतीय अलंकारिक शैलीतील त्यांच्या कामात ॲक्रेलिक माध्यमाचा वापर त्या करतात. रेखांकन कौशल्य उठून दिसेल, अशी त्यांची चित्रे आहेत. ‘आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले मी माझ्या अनुभवांतून. कलेच्या माध्यमातून आत्मानंद मिळवता येतो हे मी स्वानुभवातून सांगू शकते.’’असं त्या सांगतात. त्यांच्याकडे बघून हे शिकायला मिळाले, की कुठल्याही चांगल्या गोष्टीला आपण कधीही सुरवात करू शकतो. ‘फक्त विक्रीसाठी काम न करता प्रत्यक्ष कार्यातून सर्वसामान्य माणसांपर्यंत आपण ही कला घेऊन जावं,’ अशा मताच्या अनुराधाताईंच्या नगरमधील स्टुडिओला आज जगभरातून रसिक भेटीला येतात.

loading image
go to top