esakal | सारांश : कलाकार नि माणूस म्हणूनही गिरीश कार्नाड मोठा
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Karnad

गिरीशनं दिग्दर्शित केलेला "काडू' हा कन्नड चित्रपट सुपरहीट ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी मी गिरीशबरोबर काम केले. माझ्यासाठी हा अनुभव खूप चांगला होता.

सारांश : कलाकार नि माणूस म्हणूनही गिरीश कार्नाड मोठा

sakal_logo
By
गोविंद निहलानी

गिरीशबरोबर मी काम केलं आहे. त्याच्याबरोबर काम करताना वेगळी मजा यायची. शिवाय आम्ही दोघेही चांगले मित्र. खूप वर्षे आम्ही एकत्र होतो. जवळपास 45 ते 50 वर्षे आमची मैत्री होती. गिरीशच्या कुटुंबीयांशीही माझे चांगले संबंध होते. आमची पहिली भेट मुंबईत झाली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करायला सुरवात केली.

गिरीशनं दिग्दर्शित केलेला "काडू' हा कन्नड चित्रपट सुपरहीट ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी मी गिरीशबरोबर काम केले. माझ्यासाठी हा अनुभव खूप चांगला होता. गिरीशचं नाट्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यानं खूप चांगली नाटकं लिहिली. त्याची नाटकं आजही प्रत्येकाच्या तितकीच लक्षात आहेत. तो फक्त इथंच थांबला नाही, तर त्यांनं अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं. विशेष म्हणजे या क्षेत्रातही तो सरस ठरला. त्यानं रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या. अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या "एक था टायगर' चित्रपटातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो मुंबईत आला, तेव्हा त्याची तब्येत नाजूक होती. तरीही त्यानं चित्रीकरण पूर्ण केलं. त्याचं त्याच्या कलेवर असणारं प्रेम वारंवार दिसून आलं आहे. "एक था टायगर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याची भेट झाली.

गिरीश एक उत्तम लेखक असल्यानं आजारपणातही त्याला त्याच्यातील लेखक स्वस्थ बसू देत नव्हता. आम्ही शेवटचे भेटलो, तेव्हा त्यानं सांगितलं, "आता तब्येतीमुळे थकलो आहे. एखादा विषय सुचलाच, तर त्यावर लिहीन. पण, ओढूनताणून काहीतरी लिहायचं म्हणून लिहिणार नाही.' गिरीशच्या "तुघलक' या नाटकावर मी चित्रपट बनवणार होतो. या चित्रपटाबाबत त्याच्याशी चर्चाही झाली. त्यानं या चित्रपटासाठी हिरवा कंदील दाखविला होता. मी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होतो. मात्र, चित्रपट बनवण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी काही जुळून आल्या नाहीत. त्यानंतर गिरीशही आजारपणामुळे थकला. गिरीशबरोबर "तुघलक' नाटकावर आधारित चित्रपट बनवण्याची इच्छा अपूर्णच राहिली.

गिरीशच्या कलेची महती देशभरात आहेच, पण त्याचबरोबर एक माणूस म्हणूनही तो मोठा होता. गिरीशची निरीक्षणशक्‍ती चांगली होती. त्याची अभ्यासूवृत्ती तर अफलातून. प्रत्येक विषयाचा खोलवर अभ्यास करणं गिरीशला आवडत असे. त्याची एक गोष्ट मला कायमच आवडत आली आहे आणि ती म्हणजे कोणत्याही विषयावर मोकळेपणानं मत व्यक्त करणं. सामाजिक, त्याचप्रमाणं राजकीय विषयांवर गिरीश खुलेपणानं मतं मांडायचा. आता हे सगळं संपलं आहे.

loading image