जागतिक अस्वस्थतेला जबाबदार कोण?

वास्तविक पाहता जागतिक रचना, जागतिक नेतृत्व आणि जागतिक वित्तीय संघटना हे तीन घटक या दशकातील अस्वस्थतेसाठी जबाबदार
Global structure global leadership global financial organization are three factors responsible for global unrest
Global structure global leadership global financial organization are three factors responsible for global unrestsakal

- डॉ. रोहन चौधरी

सध्याची जागतिक रचना, जागतिक नेतृत्व आणि जागतिक वित्तीय संघटना यांच्यामुळे विविध देशांसमोर जीवन-मरणाचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. जगभरात अस्वस्थता वाढत आहे. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना या अस्वस्थतेला जबाबदार कोण, याची जाणीव होणे आवश्‍यक आहे.

जागतिक राजकारण सध्या अस्वस्थतेच्या गर्तेत अडकले आहे. देशांतर्गत घडामोडींच्या कर्कश आवाजात जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या राजकीय-आर्थिक संघर्षाचा आवाज क्षीण होत चालला आहे. एक वर्ष होऊनही रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यात आलेले अपयश, श्रीलंका, पाकिस्तान,

अफगाणिस्तान, इथिओपिया, सुदान आणि सीरिया यांसारख्या छोट्या राष्ट्रांमध्ये राजकीय-आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यात दिसणारी उदासीनता, यामुळे जागतिक राजकारण हे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. याचे परिणाम भविष्यात काय होणार हे जितके महत्त्वाचे आहे; तितकेच सध्या निर्माण झालेल्या अस्वस्थतेला नेमके जबाबदार कोण आहे, हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

वास्तविक पाहता जागतिक रचना, जागतिक नेतृत्व आणि जागतिक वित्तीय संघटना हे तीन घटक या दशकातील अस्वस्थतेसाठी जबाबदार आहेत. पहिले आणि दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध ते अमेरिकाकेंद्रित जागतिक व्यवस्था या काळात जागतिक रचना ‘मत्स्य न्याय’ यावर आधारित राहिली आहे. ज्या देशांकडे जास्त ताकद त्या देशाचे जास्त वर्चस्व हाच नियम राहिला आहे.

परिणामी प्रत्येक देश आपली ताकद जास्तीत जास्त कशी वाढेल यासाठीच प्रयत्नशील राहिला आहे. लष्करी, आर्थिक आणि तंत्रज्ञानातील ताकद जास्तीत जास्त वाढवणे हेच परराष्ट्र धोरणाचे एकमेव ध्येय बनले आहे.

या गृहितकाला आव्हान देण्याचा प्रयत्न अपवादानेच जागतिक राजकारणात झाला. १९२० मध्ये लीग ऑफ नेशन्स आणि १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना किंवा अलिप्ततावादी चळवळ यासारख्या प्रयोगातून त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. परंतु कुंपणानेच शेत खाल्ल्यामुळे हे सर्व प्रयोग निष्फळ ठरले.

साधारणतः १९४५ पूर्वीचा जागतिक रचनेचा इतिहास पाहिल्यास वसाहती आणि साम्राज्यविस्तारासाठी स्पर्धा करणारे देश त्यावेळच्या जागतिक अस्वस्थतेला जबाबदार होते. १९४५नंतर ज्या देशांनी जर्मनी, इटलीसारख्या सत्तांना पराभूत केले त्या देशांनी नव्या जागतिक रचनेची धुरा वाहण्यास सुरुवात केली.

परंतु ‘गुन्हेगारां’चे कर्दनकाळ असल्याचे म्हणवणारे नंतर स्वतःच तसे बनले. १९९१पर्यंत ही स्थिती होती. त्या वर्षी ‘कम्युनिस्ट’ या तथाकथित ‘संकटा’चा नायनाट केल्याच्या अविर्भावात स्वतःला जगाचा ‘अधिनायक’ घोषित करणारी अमेरिका पुढच्या काळात स्वतःच जगासाठी धोकादायक ठरली. लोकशाहीच्या खोट्या मुखवट्याखाली इतर देशांच्या अंतर्गत राजकारणात थेट राजकीय हस्तक्षेप करून जागतिक रचना कायमस्वरुपी अस्वस्थ राहील याची तजवीज अमेरिकेने करून ठेवली.

जिथे हा देश युद्धात उतरला तिथे निर्माण झाली ती फक्त उद्ध्वस्तता आणि अस्थिरता. जागतिक रचनेला आव्हान देण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे, अशा भारत आणि चीन यासारख्या देशांनी वेळप्रसंगी अमेरिकेच्या कळपात राहणे किंवा त्याच्याशी तडजोड करणे पसंत केले. त्यामुळे जागतिक रचनेला आव्हान देऊन नवे काही घडण्याची शक्यता दुरापास्त झाली.

युद्धप्रेमी, अाभासी नेतृत्व

या अस्वस्थ दशकाचे दुसरे मोठे दोषी हे जागतिक नेतृत्व आहे. कोणत्याही नेतृत्वाची समीक्षा ही त्याच्या आभासी प्रतिमेवरून न करता जागतिक भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या नेतृत्वाकडे आहेत का, यावरून होणे गरजेचे असते. अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, जवाहरलाल नेहरू, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, मिखाईल गोर्बाचोव्ह, मनमोहन सिंग, बराक ओबामा या नेतृत्वाकडे जागतिक प्रश्नांना भिडण्याची ताकद होती. इतकेच नव्हे तर स्वतःच्या देशातील जनतेची नाराजी पत्करून जागतिक हितासाठी कठोर निर्णय घेण्याचे धैर्य होते. यासाठी या नेत्यांना राजकीय किंमतदेखील चुकवावी लागल्याचे दाखले इतिहासात आहेत.

आज जागतिक नेतृत्वाकडे नेमक्या याच राजकीय गुणांची वानवा आहे. सध्याचे नेतृत्व हे आभासी असून जनमत निर्माण करण्याऐवजी जनमताचे दडपण घेऊन धोरण आखण्याला प्राधान्य देत आहे. उदा. युद्ध आणि नेतृत्व यांचा परस्परसंबंध. युद्ध या संकल्पनेला पाठिंबा असणारा एक मोठा वर्ग जगात आहे. विशेष म्हणजे युद्धाची दाहकता न अनुभवणारे युद्धाला पाठिंबा देण्यात आघाडीवर आहेत. डोनाल्ड ट्रम्प, ज्यो बायडेन, शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन यांची अलीकडच्या काळातील धोरणे पाहिल्यास समन्वयाऐवजी संघर्षावर भर असल्याचे दिसते.

देशांतर्गत राजकारणात युद्धाच्या भाषेला राजकीय अधिष्ठान मिळत असल्यामुळे तशीच भाषा वापरणे हे या नेतृत्वासाठी सोयीचे ठरते. आपले राजकीय वर्चस्व अबाधित राखण्यासाठी सातत्याने आभासी गुन्हेगारांची निर्मिती केली जाते. यातून द्वेष निर्माण होतो. असे द्वेषाने पछाडलेले लोक काही शक्तींना राजकीय फायद्यासाठी उपयोगी पडत असले तरी वास्तविक पाहता यातून मानवी बॉम्ब निर्माण होत असतात.

सध्याच्या जगात अणूबॉम्बच्या प्रसारापेक्षा या मानवी बॉम्बचा प्रसार वेगाने होत आहे. युद्धप्रेमी नेतृत्वातून निर्माण झालेले मानवी बॉम्ब आणि या मानवी बॉम्बमधून निर्माण झालेले युद्धप्रेमी नेतृत्व ही साखळी निर्माण झाली आहे. या साखळीला तोडण्याऐवजी तिचाच भाग होण्याकडे जागतिक नेतृत्वाचा असणारा कल हेच सध्याच्या जागतिक अस्वस्थतेचे मूळ कारण आहे.

जागतिक अस्वस्थतेला जागतिक वित्तीय संघटना यासुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. मुळात जागतिक वित्तीय संस्था हे जागतिकीकरणाचे प्रतिक आहेत. जागतिक राजकारण हे लष्करी व्यवस्थेवर अवलंबून न राहता आर्थिक घटकावर अवलंबून राहावे या हेतूने जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना यांसारख्या वित्तीय संघटनांची स्थापना करण्यात आली होती.

आर्थिक कारणास्तव देशांतर्गत विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसू नये, जागतिक आर्थिक संरचनेशी संलग्नता निर्माण व्हावी, छोटी राष्ट्रे विकासाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जाऊ नयेत ही जबाबदारी प्रामुख्याने या संघटनांवर होती. परंतु या संघटनांमुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती त्यातील सहभागी देशांची झाली आहे.

२०११चा इजिप्त असो किंवा सध्याचा श्रीलंका-पाकिस्तान असो या वित्तीय संस्थांच्या जाचक अटींमुळे छोट्या देशांची अवस्था ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी झाली आहे. या वित्तीय संस्थांच्या कर्जाचा विळखा या देशांभोवती इतका घट्ट झाला आहे की, आर्थिक आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय या देशांकडे उरलेला नाही. आत्महत्या करणारा जीवाला तर मुकतोच, त्याच्यावर गुन्हादेखील दाखल होतो. परंतु त्याला आत्महत्येला प्रवृत्त करणारा मोकाट सुटतो.

इजिप्तमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला आपण फक्त होस्नी मुबारक यांना जबाबदार धरतो, परंतु त्या काळात राजकीय रूप धारण केलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला मात्र निर्दोष सोडतो. हीच अवस्था श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांचीदेखील आहे. हे देश आणि त्यांचे नेतृत्व, सरकार हे त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार आहेतच, परंतु फक्त हेच घटक दोषी आहेत का? जागतिक वित्तीय संघटनांची यात काहीच भूमिका नाही का? हे प्रश्नदेखील विचारणे महत्त्वाचे आहे.

रशिया-युक्रेन यांच्यात लांबलेले युद्ध असो अथवा आर्थिक गर्तेत अडकलेले छोटे देश असोत जागतिक रचना, जागतिक नेतृत्व आणि जागतिक वित्तीय संघटना या तिघांच्या अभद्र युतीमुळे यांसारख्या समस्यांवर उत्तर मिळणे हे नजीकच्या भविष्यात दुरापास्त दिसत आहे. हे वास्तव मान्य करूनच या अस्वस्थतेतून मार्ग काढावा लागणार आहे. हा मार्ग काढत असताना त्याला जबादार असणारे नेमके गुन्हेगार कोण याची जाणीव जरी झाली तरी त्यातून मार्ग काढणे सोपे जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com