‘आम आदमी’च्या ‘पंजा’त पुन्हा

‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न आहे.
Gujarta
Gujartasakal

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. काँग्रेसही तयारीला लागली आहे. कडवे आव्हान कोण उभे करते, हे लवकरच स्पष्ट होईल. तथापि, गेल्या काही वर्षांत भाजपच्या घटणाऱ्या जागा हाही चिंतेचा विषय आहे.

येत्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होताहेत. त्याचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल. नरेंद्र मोदी दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेल्या गुजरातमध्ये सलग २७ वर्षे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अन्य राज्यांप्रमाणेच इथेही झालेली विकासकामे आणि समस्याही सारख्याच आहेत. परंतु ‘गुजरात पॅटर्न’चा डंका देशभर पोहचविण्यात मोदी यशस्वी झाले. त्याच्या बळावरच त्यांनी दिल्ली गाठली. गुजरातमध्ये भक्कमपणे पाय रोवलेल्या भाजपसमोर कडवे आव्हान केवळ काँग्रेसनेच दिले आहे. २०१७मध्ये भाजपच्या तोंडाला फेस आणणारी काँग्रेस गेल्या पाच वर्षांत इथून बेपत्ता आहे. मात्र, सध्या भाजपपुढे आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. दिल्ली, पंजाब राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील अभूतपूर्व यशानंतर या पक्षाचे आगामी लक्ष्य गुजरात आहे. एकेक राज्य जिंकत २०२४ मध्ये भाजपपुढे बलाढ्य विरोधक म्हणून उभे राहू असे ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न आहे.

सवलतींच्या योजनांनी मतदारांना आकर्षित करण्याचे कौशल्य केजरीवालांमध्ये आहे. दिल्लीनंतर पंजाबातील त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. गुजरातच्या मतदारांना हेच आमिष दाखवत सर्व, १८२ जागा लढवण्याचे नियोजन आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, अहमदाबाद, सुरत अशी दोन-चार मोठी शहरं सोडली तर केजरीवालांच्या ‘आप’ची राज्यात ओळख नाही. महात्मा गांधींच्या प्रतिमेला साक्षी ठेवून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून नाव कमावत दोन राज्ये जिंकणाऱ्या केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाबातून गांधींना हद्दपार केले. त्यांच्या मुखातून महात्मा गांधी हा शब्द दोन वर्षांत अपवादानेच आलाय. त्यांनी मतांचे राजकारण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या प्रतिमापूजनावर भर दिला. त्यांचीच छायाचित्रे सर्वत्र असतील असा फतवा काढला. गांधीजींचे अनुयायी रुसले नसले तरी योग्य वेळी ‘गांधीगिरी’ करतील. केजरीवालांना आता त्याच गांधींच्या गुजरातला गांधींशिवाय जिंकायचे आहे. त्यांच्या रॅलींना उत्तम प्रतिसाद मिळतोय. केजरीवालांना इथली हिंदूंची मते हवी आहेत. त्यामुळे ते सावधतेने पावले उचलत आहेत. ते बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींबाबत भाष्य करण्याचे टाळतात.

बदललेले केजरीवाल

केजरीवालांनी २०१३ मध्ये अण्णा हजारेंचा खुबीने वापर केला. त्यांना दिल्लीत आणले. केजरीवाल, सिसोदिया, किरण बेदी यांनी हजारेंचा चेहरा दाखवत जनतेला सामाजिक जाणिवांची भुरळ पाडली. स्वातंत्र्यानंतरची पहिली लढाई म्हणत दिल्लीतील रामलीला मैदान, जंतर मंतर फुलले. या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला. संयुक्त पुरोगामी आघाडीचे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार गेले.

यशस्वी आंदोलनानंतर अण्णा हजारे राळेगण सिद्धीला परतले आणि इकडे ‘टीम केजरीवाल’ राजकारणात स्थिरावली. वीज, पाणी, आरोग्य, महिलांना डीटीसी बसमध्ये प्रवास, वृद्धांना तीर्थयात्रा या मोफत योजनांमुळे तळागाळातील लोकांनी केजरीवालांना डोक्यावर घेतले. परंतु घोषणा करणे आणि त्या प्रत्यक्षात उतरवणे अवघड आहे, याची जाणीव त्यांना आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी दिल्लीत २०० युनिट वीज मोफत देण्याचे नियम बदलले. अर्ज करणाऱ्यांनाच हा लाभ मिळेल. साडेतीन हजार कोटींची तरतूद करताना केजरीवालांची दमछाक व्हायची. त्यांच्या अन्य मोफत योजनाही याच मार्गावर आहेत. पंजाबात मोफतचा नारा देत ‘आप’चे सरकार सत्तेवर आले, परंतु पैसाच नसल्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आठवडाभरातच भगवंत मान यांना मोदींच्या दरबारात लोटांगण घालावे लागले. गुजरातमध्येही केजरीवाल घोषणांचा पाऊस पडत आहेत.

गुजरातला गेल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या दीड-दोन कोटींच्या कारमधून उतरून लगेच ते ऑटोरिक्षात बसले. रिक्षाचालकाच्या घरी जावून त्यांनी जेवणही केले. त्यांनी असे प्रयोग पंजाबातही केले आहेत. त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटले तरी निवडणुकीनंतर हा आम आदमी ‘खास’ होतो. सामान्यांना सोडाच पक्षातील कार्यकर्त्यांनाही भेटत नाहीत. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या केजरीवालांच्या सहकाऱ्यांना आणि पक्षाला अलीकडे भ्रष्टाचाराने घेरले आहे. त्यांचे एक मंत्री सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ‘सीबीआय’च्या रडारवर आहेत. अबकारी धोरणात १४०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा भाजपचा त्यांच्यावर आरोप आहे. केजरीवालांचा आर्थिक लेखाजोखा सांभाळणारे विजय नायर देशाबाहेर आहेत. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे केजरीवाल हा विषय केव्हाच संपुष्टात आला आहे.

भाजपची घसरती लोकप्रियता

गुजरातमध्ये भाजपला तुल्यबळ लढत देणारा पक्ष केवळ काँग्रेस आहे. २०१७ मध्ये काँग्रेसचे सह-प्रभारी दिवंगत खासदार राजीव सातव यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. काँग्रेस सत्तेत येईल असे भाकित केले गेले. भाजप नमोहरम होते, असे चित्र होते. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या आणि ११ जागांवर फटका बसला तो राष्ट्रवादीमुळेच. ही आघाडी असती तर भाजप सत्तेत आले नसते. परंतु राजकारणात जर-तरला अर्थ नसतो; ‘जो जिता वही सिकंदर’ हे मान्य करावे लागते. यावेळी राष्ट्रवादीची भूमिका काय असेल ते पाहावे लागेल. राष्ट्रवादीची जागा ‘आप’ घेईल, असा तर्क लावला जातो. काँग्रेसमुक्त भारत या मोदींच्या अभियानात केजरीवाल सहभागी आहेत, हे वारंवार बिंबवले जाते. तसेही सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार दिवंगत अहमद पटेल हे मोदींसोबत मैत्रीधर्म निभावत होतेच! राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. तत्पुर्वी त्यांनी ५ सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये सभा घेतली. प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू, ३०० युनिट मोफत वीज व ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर आणि १० लाख तरुणांना रोजगाराची घोषणा त्यांनी केली आहे. परंतु गुजरातच्या मैदानात काँग्रेस अद्याप उतरलेली नाही.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपचे विधानसभेतील संख्याबळ सातत्याने घटते आहे. त्यामुळे ‘गुजरात पॅटर्न’ केवळ जुमला होता, असे दिसते. २००२च्या गुजरात विधानसभेमध्ये भाजपकडे १२७, तर काँग्रेसकडे ५१ सदस्य होते. २००७ मध्ये भाजपला ११७ तर काँग्रेसला ५९ जागांवर समाधान मानावे लागले. २०१२ मध्ये भाजपने ११५, तर काँग्रेसने ६१ जागा पटकावल्या. २०१७ मध्ये तर भाजप ९९ जागांवर घसरले आणि काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या. भाजपला ४९, तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळाली. पंतप्रधान असूनही मोदींची जादू इथे चालली नाही. अहमदाबाद, राजकोट, भावनगर, कच्छ, बडोदा, सुरत, मेहसाना हे भाजपचे गड अद्यापही मजबूत आहेत. तरीही यावेळी केजरीवालांचा दारुमधील भ्रष्टाचार, राहुल गांधींचा टी शर्ट आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मोदींचा दहा लाखांचा सूट आणि बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा झालेला सत्कार हे मुद्दे गाजणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळवले आहेत. मोदींचे पट्टशिष्य देवेंद्र फडणवीस यांना लहान भाऊ असलेल्या गुजरातचे किती लाड करू आणि किती नको, असे झाले आहे. अशा घटनांनी गुजरातच्या निवडणुकीत हवा भरली जात असल्याने तिथे रंगतदार लढती होतील, असे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com