रुग्णांसाठी जगलेला डॉक्‍टर 

वीणा देव
सोमवार, 16 मार्च 2020

आमच्या कुटुंबाचा आणि डॉक्‍टरांचा परिचय १९९८ मध्ये झाला. तेव्हापासून ते आमच्या कुटुंबाचेच एक भाग बनले. माझ्या आईच्या आजारात त्यांचा सल्ला घ्यायचा होता. त्यासाठी मी डॉक्‍टरांना फोन लावला. त्यांनीच तो घेतला आणि मलाच विचारले, ‘‘तुम्हाला वेळ कधी आहे, त्या वेळी आईंना घेऊन या,’’ केवढे जबरदस्त सौजन्य. ज्या डॉक्‍टरांची महिना, दीड महिना वेळ मिळत नाही, ते डॉक्‍टर आपल्याला वेळ विचारतात, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मी, माझे पती विजय आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचे ते सल्लागार होते. माझ्याकडे आलेला रुग्ण खडखडीत बरा झाला पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता.

आमच्या कुटुंबाचा आणि डॉक्‍टरांचा परिचय १९९८ मध्ये झाला. तेव्हापासून ते आमच्या कुटुंबाचेच एक भाग बनले. माझ्या आईच्या आजारात त्यांचा सल्ला घ्यायचा होता. त्यासाठी मी डॉक्‍टरांना फोन लावला. त्यांनीच तो घेतला आणि मलाच विचारले, ‘‘तुम्हाला वेळ कधी आहे, त्या वेळी आईंना घेऊन या,’’ केवढे जबरदस्त सौजन्य. ज्या डॉक्‍टरांची महिना, दीड महिना वेळ मिळत नाही, ते डॉक्‍टर आपल्याला वेळ विचारतात, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मी, माझे पती विजय आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचे ते सल्लागार होते. माझ्याकडे आलेला रुग्ण खडखडीत बरा झाला पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. रुग्णांचे ते अत्यंत उत्साहाने स्वागत करायचे. खऱ्या अर्थाने त्यांना पाहिल्यावर निम्मे दुखणे बरे व्हायचे. त्यांच्याकडे गेल्यावर कोणताही रुग्ण सुखावून जायचा.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डॉक्‍टरांमधील आत्मीयता, तळमळ दैवदत्त होत्या. रुग्णाच्या भावना कशा जपायच्या, त्याने औषध घेण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, यावर डॉक्‍टर रुग्णांशी खूप आत्मीयतेने बोलत. त्यामुळे रुग्ण औषध घेण्यासाठी उद्युक्त होत. ते डॉक्‍टरांमधील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील साधेपणा मला विशेष भावायचा. कोणताही गंड नाही. सहज संवाद ही त्यांची खासियत होती. सुरुवातीला रुग्णाला त्यांच्याबद्दल धास्ती वाटायची; परंतु पहिल्या भेटीनंतर अगदी मित्रत्वाचे नाते निर्माण व्हायचे. कधीही भेटायचे म्हटले तर ते म्हणायचे ‘‘मी रिकामाच असतो.’’ या वाक्‍याचे अप्रूप वाटायचे. एवढा व्यग्र डॉक्‍टर किती सहजतेने बोलत असे. 

मी दूरचित्रवाणीसाठी त्यांच्या दोन मुलाखती घेतल्या. तसेच, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगणारे ‘निरामय जीवनाचे पथदर्शक’ हे पुस्तकही लिहिले. त्यामुळे डॉक्‍टर मला अगदी जवळून समजून घेता आले. मराठीसाठी ते विशेष आग्रही होते. वैद्यकीय ज्ञान सर्वसामान्यांना समजले पाहिजे, यासाठी ते सोप्या मराठी भाषेत असावे, हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी बहुतांश पुस्तके मराठीतच लिहिली. माझ्या पतीचे निधन झाले, त्या वेळी ते मला आवर्जून भेटायला आले. विशेष म्हणजे, त्यांचा त्याच दिवशी वाढदिवसही होता. डॉ. सरदेसाई यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सर्वांगाने विद्वान असलेले व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: H V Sardesai