यशाचा ‘हर्ष’

रजनीश जोशी
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या (आयईएस) परीक्षेत हर्षल देशात पहिला आला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर सुरू झालेल्या त्याच्या ओढगस्तीच्या जीवनाला आता आकार मिळाला आहे. आई कमल भोसले यांनी पाच मुली आणि लहानग्या हर्षलचा सांभाळ करण्यासाठी अक्षरशः रक्‍ताचं पाणी केलं.

सोलापूर जिल्ह्यातील भीमानदीकाठच्या तांडोर गावाचं नाव एरवी बातमीत येई ते तिथल्या अवैध वाळूउपशामुळं. पण आता हे गाव देशभरात पोचलं आहे ते हर्षल ज्ञानेश्‍वर भोसले या तरुणामुळं. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या (आयईएस) परीक्षेत हर्षल देशात पहिला आला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर सुरू झालेल्या त्याच्या ओढगस्तीच्या जीवनाला आता आकार मिळाला आहे. आई कमल भोसले यांनी पाच मुली आणि लहानग्या हर्षलचा सांभाळ करण्यासाठी अक्षरशः रक्‍ताचं पाणी केलं. साडेतीन एकरांचा जमिनीचा तुकडा असूनही कसायला कुणी नव्हतं. मग दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून, पडेल ती कामं करून त्या माऊलीनं हर्षलला शिक्षण दिलं. मंगळवेढ्यात प्राथमिक शिक्षण, देगावच्या आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण, बीडला डिप्लोमा आणि कऱ्हाडला पदवी अशी भटकंती त्यानं केली. आईनं हर्षलला हिंमत हरू दिली नाही. हर्षलनं देशात पहिलं येणं हा तिचाही मोठाच गौरव आहे.

हर्षलला आता देशाच्या संरक्षण विभागात काम करायचं आहे. त्यानं प्राधान्यक्रमात ‘डिफेन्स’ला प्रथम स्थान दिलं आहे. येत्या काही दिवसांत तो रुजू होईल. शिकण्यासाठी ससेहोलपट होऊनही देशाची सेवा करण्याचं स्वप्न हर्षलनं उराशी बाळगलं आहे. प्राण पणाला लावून लढणाऱ्या जवानांसाठी आवश्‍यक असलेली तांत्रिक सुविधा अव्वल दर्जाची असली पाहिजे. म्हणून तांत्रिक विभागातील ‘क्वॉलिटी कंट्रोल’मध्ये हर्षलला रस आहे. अनंत अपेष्टा सोसूनही देशाचाच पहिला विचार करण्याचा गुण नव्या पिढीत आला तो या मातीतूनच. आईच्या काबाडकष्टाचे पांग देशसेवा करून फेडण्याची हर्षलची भावना आहे. ‘कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी धीर न सोडता मेहनत घेत राहा,’ असा संदेश त्यानं तरुणांना दिला आहे. मराठी माध्यमात शिक्षण झालं, तरी हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता येतं, इंग्रजीचा बाऊ करण्याचं कारण नाही, हेही त्यानं स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. एकापाठोपाठ एक संकटं येत गेली, तरी हर्षलनं जिद्द सोडली नाही. हर्षलसारखी तरुणाई संरक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगून असते, तेव्हा त्याच्याबरोबरच देशाचंही भविष्य उज्ज्वल असल्याची खात्री पटते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshal Bhosale is first in the country in the examination of Indian engineering services