भाष्य : बांगलादेशात धर्मांध उद्रेक

बांगलादेशातील निवडणुकांचे राजकारण व त्यानिमित्ताने उपस्थित होणारे मुद्दे आणि तिथे हिंदूंविरोधात उसळलेला हिंसाचार यांची संगतवार सांगड घालत या प्रश्‍नाची दखल घेतली पाहिजे. त्यामुळेच भारताची संयत प्रतिक्रिया रास्तच म्हणावी लागेल.
bangladesh hindu temple attack
bangladesh hindu temple attacksakal media

बांगलादेशातील निवडणुकांचे राजकारण व त्यानिमित्ताने उपस्थित होणारे मुद्दे आणि तिथे हिंदूंविरोधात उसळलेला हिंसाचार यांची संगतवार सांगड घालत या प्रश्‍नाची दखल घेतली पाहिजे. त्यामुळेच भारताची संयत प्रतिक्रिया रास्तच म्हणावी लागेल.

बांगलादेशाची संस्कृती, परंपरा, धर्म जरी इस्लामी असला तरी भारतीय संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. भाषा, लिपी, राहणीमान, पेहराव, कलाविष्कार अशा अनेकविध गोष्टींनी भारतीय संस्कृतीशी निगडित आहेत. बांगलादेशात कुमिल्ला येथे दुर्गापूजेवेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची करावी तेवढी निंदा कमी आहे. कुमिल्ला हा जिल्हा भारत-बांगलादेश सीमेवरचा. त्रिपुराची राजधानी आगरतळापासून समोरच. सीमेवरचे गाव अखुवारा. तेथून रस्त्याने ६० कि.मी. आणि रेल्वेने १७ कि.मी. एवढ्यानजीक कुमिल्ला आहे. आगरतळा ते कुमिल्लादरम्यानच्या गावांची, वस्त्यांची नांवे आहेत नारायणपूर, मिथीलापूर, ब्राह्मणपाडा, हरिपूर; ती भारतीय संस्कृतीशी निगडित आहेत. बांगलादेशातील सीमेवरील या भागातील दर्शनी समाज आणि आर्थिक जीवन हे भारतातील इतर वस्त्यांशी खूपच मिळतेजुळते आहे. त्यामुळे आपण बांगलादेशात आहोत की भारतात हेही कळत नाही. अशा या कुमिल्लामधील तरुणाने फेसबुकवर टाकलेल्या संदिग्ध छायाचित्रावरून बांगलादेशात हिंसाचार झाला. याचाच अर्थ ही हिंसा, जाळपोळ योजनापूर्वक होती.

फेसबुकवरचे छायाचित्र हे हिंसाचाराचे निमित्त असले तरी बांगलादेशात काही वर्षांपासून धर्मावर आधारित हिंसाचार सुरू आहे. सततच्या हिंसाचारामुळे बांगलादेशाच्या सीमावर्ती कुमिल्ला, सिल्हेट, नौखाली आणि चितगांव या जिल्ह्यांतील हिंदूंच्या पलायनामुळे शेजारील त्रिपुरा राज्यातील लोकसंख्येची संरचनाच बदलून टाकली. बांगलादेशात पुन्हा हिंसक उद्रेक झाले आणि अनेक हिंदुंनी त्रिपुरा व लगतच्या प्रदेशात आश्रय घेतला. बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या चितगाव टेकडी प्रदेश, बंदरबन, रंगामाती, कॉक्स बझार अशा प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या बौद्धधर्मीय आदिवासी चकमा समुदायाचे बंगाली मुस्लिमांकडून झालेले सामूहिक शिरकाण, संहार जगाला नवा नाही. विशेषत: बांगलादेशातील स्थानिक राजकारणाची सूत्रे जसजशी धर्मांध पक्षांच्या आणि नेत्यांच्या हाती गेली तसतसे बांगलादेशात धर्मांध शक्तींचा जोर वाढला.

या घटनांचे पडसाद भारत-बांगलादेश संबंधांवर उमटले. सीमेवर अनेकदा गोळीबार झाले. हा काळ होता लष्करी राष्ट्रप्रमुख जनरल इर्शाद यांचा. त्यांनी राजकीय व्यवस्था इस्लामिक राजसत्तेकडे झुकवली; परिणामी त्याच दिशेने बांगलादेशाचा राजकीय प्रवासही सुरू झाला तो १९९६ पर्यंत सुरूच होता. पुन्हा एकदा २००१ ते २००६ या काळात इस्लामच्या नावावर खालिदा रहमान यांचा बांगलादेश राष्ट्रीय पक्ष आणि जमात-ए-इस्लामी यांनी एकत्र येऊन बांगलादेशात सत्ता स्थापली. त्यांनी संगनमताने भारतविरोधी कारवाया चालवल्या. भारतात दहशतवादी कृत्ये घडवून आणली. बांगलादेशी स्थलांतरितांविषयीच्या भारतातील रोषाचे भांडवल करून भारतविरोध हा प्रचाराचा मुद्दा केला जातो. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातला हिंसाचार दोन्ही देशांतील सरकारांसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.

शेख हसीनांची कोंडी

बांगलादेशातील एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के असलेल्या हिंदू समाजावर जानेवारी २०१३ पासून नव्याने अत्याचार सुरू झाले. विरोधी पक्ष नेत्या खालिदा रहमान यांनी जमात-ए-इस्लामी आणि डझनभर संघटनांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षनेत्या आणि पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या सरकारवर हल्ला चढविला. अनेक ठिकाणी दंगली, जाळपोळ, लुटालूट अशा घटनांना मूर्त रुप दिले. कारण काय तर निवडणुका या नि:पक्ष होत नाहीत. असे अनेक आरोप त्यांनी केले. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकला. या वृत्तीचा प्रखर विरोध म्हणून फेब्रुवारी २०१३मध्ये ढाका जिल्ह्यातील शाहबाग येथे विद्यार्थी संघटनांनी बांगलादेशातील राजकीय संस्कृती ही निधर्मी तत्वावर आधारित असल्याने तेथील सरकारी व्यवस्था तशीच असावी यासाठी आंदोलन केले. त्याचाच परिणाम म्हणजे २०१४ आणि २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकांतून इस्लामाधारित पक्षांना आणि गटांना सक्रिय राजकारणातून बहिष्कृत व्हावे लागले. अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना वाजेद २००९ पासून सलग पंतप्रधानपदी आहेत. हिंसाचाराला पुनर्प्रारंभाचे कारण म्हणजे डिसेंबर २०२२मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका. अफगाणिस्तानात तालिबानींनी दहशतीच्या बळावर तेथील सत्ता संपादली आहे. त्यामुळे बांगलादेशातील मूलतत्त्ववादी गटांना चेव आला असण्याची शक्यता आहे. अप्रत्यक्षपणे सत्तेवरच्या अवामी लीग आणि त्याच्या शेख हसीना वाजेद यांची यानिमित्ताने कोंडीचा प्रयत्न आहे.

बांगलादेशात दुर्गामाता किंवा इस्कॉनच्या मंदिरांवरचे हल्ले हे पूर्वनियोजित असण्याची आणखी महत्वाचे कारण म्हणजे भारत-बांगलादेशातील सौदार्हाचे संबंध. भारताच्या शेजारील देशांत अनेकविध धर्म आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भूतान बौद्धधर्मीय; तर मालदीव, पाकिस्तान, बांगलादेश इस्लामी आहेत. नेपाळ २०१५पर्यंत हिंदू राष्ट्र होते, आता ते निधर्मी आहे. तरीही भारत-बांगलादेश संबंध विशेषत: शेख हसीना वाजेद यांचा कार्यकाळातले जगासाठी ‘रोल मॉडेल’ आहेत, असे नुकतेच भारताच्या परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे आणि ते खरेही आहे. उल्लेखनीय म्हणजे, शेख हसीनांच्या कार्यकाळात भारत-बांगलादेश दरम्यानचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटले. उदा. सीमेवरील भूभाग हस्तांतर, पाणी वाटपाचा तिढा किंवा उद्योग व गुंतवणूक यांना चालना. परिणामी दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होत गेले. यामुळे अनेकदा बांगलादेशातील वृत्तपत्रांनी कधी कधी हसीना वाजेद यांचे धोरण भारताप्रती मवाळ असल्याचे म्हटले आहे. अर्थात हे संबंध टिकविण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे आणि असायला हवाच. मूलतत्त्ववाद्यांना वेसण घालण्याचा आग्रह धरतानाच बांगला देशातील हसीना यांच्या स्थानाला धक्का बसू नये, असा प्रयत्न करावा लागेल.याचे कारण त्या सत्तेबाहेर गेल्यास बांगलादेशात धर्मांध शक्तींना सत्ता काबीज करता येईल. ते भारताला परवडण्यासारखे नाही. कारण भारताच्या एका बाजूला चीन जो भारताच्या सीमेवर चहूबाजूंनी आक्रमकपणे शिरकाव करू पाहतोय. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान मूलतत्त्ववादी इस्लामी राजसत्तेच्या पताका पाकिस्तान व भारतासमोर नाचवत आहे.

अशा परिस्थितीत भारतात राहणारे बेकायदा स्थलांतरित बांगलादेशी नागरिक आणि छुपे दहशतवादी यांच्यात निर्माण होणारी जवळीक भारताची डोकेदुखी वाढवू शकते. तसेच मूलतत्त्ववादी इस्लामपुरस्कृत बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मालदीव ही इस्लामी राष्ट्रे धर्माच्या नावावर भारताविरोधात एकत्र आल्यास काय होईल, त्याची कल्पनाही न केलेली बरी! बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा, पश्चिम बंगाल, अासाम, मिझोराम आणि मेघालय यांच्या दरम्यान सुमारे ४१०० किलोमीटरची सीमा आहे. त्या सीमावर्ती भागातल्या लोकांचे प्रश्नही ऐरणीवर येऊ शकतात. त्यामुळे भारतासाठी सध्या तरी ‘थांबा आणि पाहा’ अशीच सावध भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे. भारतासाठी संयमी धोरण स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. सार्वभौमत्व संकल्पनेच्या रेषा अशावेळी अधिक प्रखर आणि गडद होण्याची दाट शक्यता असते.

( लेखक मुंबई विद्यापीठाचे डीन आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com