भाष्य : बौद्धिक संपदेची क्षितिजे

जगात अमेरिका तसेच युरोपीय देशांनी बौद्धिक संपदेबाबत मोठी झेप घेतली आहे. चीनही त्याच वाटेने जात आहे. या क्षेत्रात भारतालाही मोठा वाव आहे.
Patented
Patentedsakal

जगात अमेरिका तसेच युरोपीय देशांनी बौद्धिक संपदेबाबत मोठी झेप घेतली आहे. चीनही त्याच वाटेने जात आहे. या क्षेत्रात भारतालाही मोठा वाव आहे. आजच्या (ता.२६) जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्ताने या क्षेत्रातील वास्तवाविषयी.

संयुक्त राष्ट्रांच्या अनेक शाखा-उपशाखा आणि त्याला अनुसरून आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत असतात. त्यापैकीच बौद्धिक संपदा या विषयाला अनुसरून जागतिक बौद्धिक संपदा संस्था ही जीनिव्हा येथे कार्यरत आहे. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, भौगोलिक चिन्हांकन (जीआय) या विषयांना एकत्रितरित्या ‘बौद्धिक संपदा’ असे म्हणतात.

मानवाच्या बुद्धीतून निर्माण झालेल्या या संपदा असल्याकारणाने त्यांना ‘बौद्धिक संपदा’ असे संबोधण्यात येते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जागतिक बौद्धिक संपदा संस्था’ अस्तित्वात आहे.संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीत या संस्थेची निर्मिती करण्यात आली आणि ज्या दिवशी या संस्थेची स्वीकृती करण्यात आली तो २६ एप्रिल हा दिवस ‘जागतिक बौद्धिक संपदा दिवस’ म्हणून जगात साजरा करण्यात येतो.

बौद्धिक संपदेचे जागतिक स्तरावरील सामाजिक आणि आर्थिक योगदान महत्त्वाचे आहे. बौद्धिक संपत्तीविषयी जगभरात जागरुकता व्हावी, नागरिकांमध्ये सजगता येऊन त्यांचे त्यासाठी प्रयत्न वाढावेत, या उद्देशाने जागतिक बौद्धिक संपदा दिवसाचे नियोजन केले जाते.

दरवर्षी जगासमोरील एखादा महत्त्वाचा विषय घेऊन त्या विषयाला अनुसरून बौद्धिक संपदा दिवसाची संकल्पना (थीम) तयार केली जात असते. ही संकल्पना जगभरात सर्वदूर पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम आखले जातात. यंदाच्या जागतिक बौद्धिक संपदा दिवसाची मुख्य संकल्पना आहे ‘बौद्धिक संपदा, संयुक्त राष्ट्रांचे शाश्‍वत विकासाचे उद्दिष्ट आणि भविष्यातील वाटचाल’.

संयुक्त राष्ट्राचे १९४ सदस्यदेश आहेत. या सभासद देशांच्या अनेक प्रश्नांवर संयुक्त राष्ट्रे काम करतात. जगात शांतता कशी नांदेल, जगातील सर्व देशांची आणि घटकांची प्रगती कशी साधता येईल, यावर सतत विचारमंथन होत असते. अशा विचारमंथनातून विविध उद्दिष्टे समोर आली. संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये अशी सतरा उद्दिष्टे किंवा गोल निश्‍चित केले आहेत.

त्याला ‘शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे’ (सस्टेनबल डेव्हलपमेंट गोल) असे नावही देण्यात आले आहे. ही उद्दिष्टे २०३० पर्यंत साध्य करायची, असे निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टांमध्ये गरिबी नष्ट करणे, भूकबळी दूर करणे, उत्तम आरोग्य, उत्कृष्ट शिक्षण यांच्यापासून ते शांतता, न्याय आणि पर्यावरणसंरक्षण तसेच पाण्याचे संवर्धन व उत्तम आंतरराष्ट्रीय सलोखा जगभरात निर्माण होणे इत्यादी घटकांचा समावेश आहे.

या उद्दिष्टांमध्ये विशेष करून संशोधनातून उद्योग व्यवसायाची प्रगती साधत हरित ऊर्जा निर्माण करणे आणि त्या अनुषंगाने उत्तम व पर्यावरणपूरक शहरीकरण करण्यावर भर देणे यांचा समावेश आहे. या उद्दिष्टांना धरून जगभरात वेगवेगळ्या स्तरावर कार्य सुरू आहे. या उद्दिष्टांना महत्त्वाची साथ बौद्धिक संपदेतून मिळत आहे, असे निदर्शनास आले.

शाश्‍वत विकास

वेगवेगळ्या देशांमध्ये आणि विशेष करून प्रगत देशांमध्ये हरित ऊर्जेवर जे संशोधन झाले त्यामध्ये अनेक पेटंट्स घेतले गेले, ते पेटंट इतर सभासद देशांमध्ये पोहोचवण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संस्थेने एक डाटाबेस तयार केला आहे. यंदाच्या बौद्धिक संपदा दिवसाच्या माध्यमातून तो डाटा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्याला ‘पेटंट आणि शाश्‍वत विकास उद्दिष्ट अहवाल’ असे संबोधण्यात आले आहे.

भारतातही अशी अनेक पेटंट जी हरित पर्यावरणाला पूरक आहेत, ती ग्राह्य धरलेली आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास ऊर्जानिर्मिती विशेष करून दोन प्रकाराने होत असते- एक पाण्याच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती केली जाते, तर दुसऱ्या प्रकारात प्रकल्पात कोळसा किंवा तत्सम इंधनाचे ज्वलन करून औष्णिक विजेची निर्मिती केली जाते.

या प्रकल्पामध्ये ऊर्जानिर्मितीसाठी जेवढी सामग्री (इनपूट) वापरली जाते त्याच्या ४५ ते ६० टक्केच ऊर्जा (आउटपुट) निर्माण होऊ शकते. या अडचणीवर मात करीत पुण्यातील दोन अभियंत्यांनी ऊर्जानिर्मितीचे आउटपुट ऐंशी टक्क्यांपर्यंत नेले आहे, जेणेकरून कमी खर्चात अधिक प्रमाणात ऊर्जानिर्मिती होऊ शकेल. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारचे पेटंटही मिळाले आहे.

शिवाय, त्यांचे हे संशोधन जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या डाटाबेसचादेखील एक भाग आहे. त्यामुळे त्यांचे संशोधन जगभरात पोहोचत आहे, अमेरिकेमध्ये सत्तर टक्के वीजनिर्मिती औष्णिक प्रकल्पांच्या माध्यमातून केली जाते. अशा वेळेला भारतात केले गेलेले संशोधन, म्हणजेच हे पेटंट अमेरिकेमध्ये उपयुक्त ठरू शकते.

त्यामुळे स्वस्तात वीज निर्मिती होईलच; शिवाय इंधनाचा वापर निम्मा झाल्याने पर्यावरण प्रदूषणाच्या प्रश्नावर देखील मोठ्या प्रमाणात मात होईल. थोडक्यात पेटंटसारख्या बौद्धिक संपदा या संयुक्त राष्ट्राच्या शाश्‍वत विकास अभ्यासासाठी अत्यंत पूरक आहेत आणि त्याचा फायदा जगभरातील देशांनी घ्यावा, असा महत्त्वाचा संदेश या वर्षीच्या जागतिक बौद्धिक संपदा दिवसानिमित्त निश्‍चित करण्यात आला आहे.

भारताला वाव

पेटंटबरोबर अजून एक महत्त्वाची बौद्धिक संपदा जिच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांचे शाश्‍वत विकास उद्दिष्ट साध्य करणे सुकर झाले आहे, ती म्हणजे भौगोलिक चिन्हांकन किंवा जिऑग्राफिकल इंडिकेशन (जीआय). या बौद्धिक संपदेमध्ये पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे शेतीजन्य पदार्थ अथवा निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी मंडळींकडून तयार केली जाणारी वस्तू; मग ती बांबूची असो किंवा मातीची असो, त्याला ‘जीआय’ मानांकन मिळते.

युरोपमध्ये अशा ‘जीआय’ नोंदी जवळपास साठ हजार झाल्या आहेत. तसेच चीनमध्येसुद्धा जवळपास अकरा हजार ‘जीआय’ नोंद झाल्या आहेत. भारताची वाटचाल ही केवळ सातशे ‘जीआय’पर्यंत झालेली आहे. ‘जीआय’ हा पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि समूहाचा बौद्धिकसंपदा अधिकार असल्याने त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसह संयुक्त राष्ट्रांचे शाश्‍वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होते.

अशाप्रकारे वेगवेगळ्या बौद्धिक संपदांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेली शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे साध्य होत आहेत आणि ठरवलेल्या २०३० या कालावधीपर्यंत ते साध्य होऊ शकेल, असा संदेश घेऊन यंदाचा बौद्धिक संपदा दिवस साजरा होतो आहे.

ज्या देशांपर्यंत बौद्धिक संपदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्‍वत विकासाच्या उद्दिष्टांबाबतची माहिती पोहोचली नसेल तिथे ती पोहोचविण्याचे तसेच त्याचा पुरेपूर विनियोग करण्याचे उद्दिष्टही यंदाच्या जागतिक बौद्धिकसंपदा दिवसाचे आहे. भारत सरकारही त्यादृष्टीने पावले उचलेल आणि बौद्धिक संपदेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट गाठण्यात योगदान देईल, अशी आशा करूया!

(लेखक पेटंटविषयक तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com