‘श्रीमंत’ करणारा भाषांचा अभ्यास

hrutvik gajendragadkar
hrutvik gajendragadkar

भाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात. जेवढी दारे उघडाल तेवढ्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात. मातृभाषेसह वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपला पैस विस्तारू शकतो. जागतिकीकरणामुळे लोकल-ग्लोबल जवळ आले आहे. अशा वेळी परदेशी भाषा आत्मसात करणे तर मला खूप मोलाचे वाटते. केवळ व्यवसायभिमुख दृष्टिकोनातून हे मी म्हणत नाही, तर व्यावसायिकतेपलीकडचे भाषाविश्व तुम्हाला जगाच्या अधिक जवळ घेऊन जाणारे असते, म्हणून सांगतो. लहानपणापासूनच घरात साहित्याचे आणि संगीताचे वातावरण अनुभवत आल्यामुळे वाचनाची, संगीत ऐकण्याची आवड आपोआपच निर्माण झाली. दहावीत उत्तम गुण मिळूनही मी कलाशाखा निवडली. शाळेबाहेर जर्मन भाषा शिकलो. पुढे स्पॅनिश भाषाही शिकायला सुरवात केली.
युरोपियन संस्कृती आणि साहित्याशी माझी खरी ओळख झाली ती स्पॅनिश भाषेतून. पुढे जर्मनमधून पदवी घेताना खूप काही शिकायला मिळाले. एखादी साहित्यकृती कशी वाचायची, एका मोठ्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कालखंडात तिचे मूल्यमापन कसे करायचे, हे मला कळत होते. शिवाय भाषेची किती रूपे असतात, विविध विषयांसाठी विशिष्ट शब्द आणि शब्दरचना कशा वापरायच्या, अशा अनेक गोष्टी शिकता आल्या. पण हे पुरेसे नाही हे दिल्लीत जेएनयूमध्ये आल्यावर कळले. आत्तापर्यंत जे शिकलो, ही फक्त साहित्याची तोंडओळख कशी आहे आणि ज्या पद्धतीने आपण ते शिकलोय ती पद्धतच मुळात सखोल अभ्यास करण्यासाठी कशी पुरेशी नाही हे समजायला आणि त्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करायला शिकण्यातच पहिले चार महिने गेले. आपण आपल्या शिक्षण पद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे करू शकतो, व्यवस्थेवर बोट रोखू शकतो, हे भाषेचा अभ्यास करताना जेएनयूमध्ये शिकलो. ‘जेएनयू’मधल्या या काळात भाषेकडे आणि एकूण या क्षेत्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खूप बदलला. आपल्याकडे शिक्षण घ्यायचे ते रोजगारावर, त्याच्या पॅकेजवर लक्ष ठेवून अशी रीत झाली आहे. मीही वेगळा नव्हतो. भाषा शिकायला सुरवात करताना मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनुवादक म्हणून चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळू शकते, याच्या आकर्षक गोष्टी आजूबाजूच्यांनी सांगितल्या खऱ्या; पण जसजसा एका नव्या संस्कृतीचा, एका वेगळ्या प्रांतातल्या साहित्याचा, त्या साहित्याचा इतर देशातल्या साहित्यकारांवर असलेल्या प्रभावाचा अभ्यास पुढे जाऊ लागला, तसतसा अशा नोकऱ्या, तिथे होत असणारा भाषेचा फक्त तांत्रिक अनुवादासाठी केला जाणारा उपयोग, या गोष्टी आपल्यासाठी नाहीत हे मला समजायला लागले. भाषेच्या पैल असलेला भाषेचा पैस मला खुणावू लागला.

सतत नवीन वाचण्याची इच्छा असणाऱ्या, स्वतःचा विचार आपल्या लेखनातून मांडू पाहणाऱ्या, आपल्या अभ्यासातून आतापर्यंत अनोळखी किंवा दुर्लक्षित राहिलेल्या मुद्द्यांवर प्रकाश टाकू पाहणाऱ्या सगळ्यांना भाषासंशोधनाचा मार्ग खुला आहे. हा मार्ग जरी खडतर असला, तरी भाषेवर विलक्षण प्रेम असणाऱ्या सगळ्यांना ह्या मार्गात येणारे अडथळे हे अडथळे न वाटता आव्हाने वाटतील आणि त्या आव्हानांचा स्वीकार करत पुढे जाण्यातला आनंदही लौकिक गोष्टींपेक्षा किती जास्त आहे, हे नक्कीच जाणवेल. साहित्य क्षेत्रातल्या संशोधनाबद्दल मला जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे कुठल्याही भाषेतल्या अभिजात साहित्याची खोल समज असल्याशिवाय त्या भाषेतल्या समकालीन साहित्याची चिकित्साही कृत्रिमच होते. जसें अभिजात शास्त्रीय संगीताची बैठक नसताना चित्रपट किंवा सुगम संगीत गाणे कठीण जाते, तसेच अभिजात साहित्याचा अभ्यास असल्याशिवाय समकालीन लेखक कुठल्या परंपरांमध्ये बसतो किंवा कुठल्या परंपरा तो मानत नाही हे समजणे कठीण जाते. अभिजात म्हणजे जुने, तेच किती काळ चघळायचे, यांसारखे प्रश्न विचारून आपण आपल्यावरच मर्यादा तर घालत नाहीत ना, याचा विचार करायला हवा. आपण भूतकाळाचा आणि परंपरेचा भाग आहोत म्हणूनच वर्तमानात आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे, हे हान्स गेओर्ग गादामर या विसाव्या शतकातल्या प्रख्यात जर्मन विचारवंताचे शब्द वाचले तरी स्वतःकडे, भूतकाळाकडे आणि आपल्या वर्तमानाकडे नव्या नजरेने पाहणाऱ्या देशोदेशीच्या विद्वानांना जोडणारा एक सामान धागा आपल्याला स्पष्ट दिसतो. भूतकाळ, परंपरा आणि वर्तमान यांचे एक पूर्ण वेगळे समीकरण गादामरसारखे सगळेच लेखक-विचारवंत आपल्यासमोर ठेवतात, तेव्हा साहित्यातून समाजाला विधायकतेकडे नेणारी त्यांची दृष्टी जाणवते. थोडक्‍यात सांगायचे तर भाषेकडे, भाषेच्या अभ्यासाकडे कुठल्याही व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. हा अभ्यास कधीच न संपणारा आहे आणि आपल्याला वेगळी श्रीमंती देणाराही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com