अवयवदानाला नवे बळ!

जगात अवयव प्रत्यारोपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही लाखो लोकांना त्याची उपलब्धता वेळेवर होत नाही.
India ranks third in organ transplants in the world health human body
India ranks third in organ transplants in the world health human bodysakal

- डॉ. गायत्री पंडित

जगात अवयव प्रत्यारोपणात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही लाखो लोकांना त्याची उपलब्धता वेळेवर होत नाही. हे लक्षात घेऊन स्थानिकत्वाची अट रद्द करण्यापासून काही महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळू शकतो.

स रकारने नुकतीच अवयवदानासाठी स्थानिकत्वाची अट काढून टाकल्याने ही चळवळ अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, तसेच अधिकाधिक व्यक्तींना त्याचा फायदा होऊन त्यांच्या जीवनात नवे आशेचे पर्व निर्माण होईल, असे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच अवयवदान आणि प्रत्यारोपण याविषयी सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाली. त्याविषयी जनसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत ही माहिती पोहोचवून त्याबद्दलची जागरूकता वाढावी, या हेतूने हा लेख लिहिला आहे. त्यामुळे आणखी काहींचे आयुष्य वाचण्यास हातभार लागू शकेल, अशी आशा आहे.

अवयवदान दोन प्रकारचे असते. १) जिवंत व्यक्तींकडून घेतलेले किंवा त्याने केलेले अवयवदान २) मृत व्यक्ती किंवा ब्रेनडेड/मेंदू मृत व्यक्तीकडून केले गेलेले अवयवदान. यापैकी जिवंत व्यक्तीकडून केलेले अवयवदान हे त्याने पूर्ण शुद्धीत असताना आणि दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत संमती देऊन करावयाचे असते.

त्याचबरोबर या प्रकारच्या अवयवदानासाठी विशेष समितीचीदेखील संमती गरजेची असते. तर मेंदू मृत व्यक्तीकडून केलेले अवयवदान या प्रकारात मेंदू मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांच्या (आई, वडील, पत्नी, पती, अपत्ये) संमतीने दान केले जाते.

अथवा त्या व्यक्तीने स्वतः हयात असताना तसे प्रतिज्ञापत्र लिहिले असेल तर अवयवदान करता येते. या दोन्ही प्रकारच्या अवयवदानासाठी अवयवदान व प्रत्यारोपण याबाबत ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्‍यक असते. तसेच संबंधित दवाखान्यात/हॉस्पिटलमधील समाजकार्य विभागात जाऊन नोंदणीही करता येते.

कोणत्या अवयवांचे दान शक्य?

अनेकदा नागरिकांकडून कोणते, कोणते अवयव आपण दान करू शकतो, असा प्रश्‍न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर मेंदू मृत व्यक्तीचे अवयव असल्यास १) हृदय २) फुफ्फुस ३) यकृत ४) मूत्रपिंड (किडनी) (दोन्ही) ५) स्वादूपिंड ६) कॉर्निया ७) त्वचा ८) हाडे यांचे दान करू शकतो. जिवंतपणी- एक किडनी, यकृत व स्वादूपिंडाचा काही भाग दान करू शकतो.

काही लोक देहदानाचादेखील स्वीकार करतात. अशा प्रकारे दान केलेला देह हा वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणांसाठी वापरता येतो. आजकाल आपण अनेकदा ‘अवयव दान, श्रेष्ठ दान’ ‘अवयव दान, जीवन दान’ अशा घोषणा ऐकतो.

बऱ्याच जनजागृतीच्या शॉर्टफिल्मही बघतो; परंतु अजूनही आपल्याकडे याबाबत पुरेशी जागरूकता झालेली नाही. अवयवदानाचे प्रमाण वाढावे आणि जनजागृती व्हावी यासाठी सरकार, अनेक संस्था, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) वेळोवेळी उपक्रम राबवत असते.

आरोग्य विभागही अशा उपक्रमाला हातभार लावत असतोच आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहनसुद्धा देत असतो. याचेच पुढचे पाऊल म्हणजे या वर्षीच्या नऊ जानेवारी रोजी झालेली आरोग्य विभागाच्या केंद्रीय आणि राज्य आरोग्य सदस्यांच्या बैठकीची प्रथम फेरी.

या बैठकीत त्यांनी काही अटी शिथिल केल्या आहेत किंवा काही नियमांमध्ये बदलसुद्धा केले आहेत. हा झालेला बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यामुळे तरुण पिढीला अवयवदानाचे महत्त्व कळेल आणि देशभरात या चळवळीला चालनाही मिळेल. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

काही स्वागतार्ह निर्णय

१) वयोमर्यादेचे निर्बंध ः आजकालच्या राहणीमानामुळे आणि वैद्यकीय सोयीमुळे आयुष्याची वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे पूर्वीचे ६५ वर्षांनंतर अवयवदानाला किंवा प्रत्यारोपणाला निर्बंध असलेला नियम काढून टाकला आहे. हे अत्यंत स्वागतार्ह आहे.

आमचे मार्गदर्शक डॉ. जगदीश हिरेमठ आम्हाला नेहमी सांगतात की, साठीनंतरचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे. कारण या वयातच आपण खऱ्या अर्थाने स्वतःसाठी थोडे तरी जगतो; नाहीतर तोपर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचेच काम सुरू असते. म्हणूनच वयोमर्यादेचे बंधन हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

२) स्थानिकत्वाची अट रद्द ः आपण नेहमी ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे म्हणतो, ‘हम सब एक हैं,’ असेही म्हणतो. याचा शब्दशः अर्थ प्रत्यक्षात उतरवून सरकारने देखील ‘एक देश, एक धोरण’ असा विचार केला आणि तो विचार वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यामुळे पूर्वीचे प्रादेशिक अवयवदान व प्रादेशिक प्रत्यारोपण म्हणजेच महाराष्ट्रातील माणूस हा महाराष्ट्रातच दान करू शकेल किंवा प्रत्यारोपण करू शकेल, असे आता न राहता संपूर्ण देशात कुठेही अवयवदान अथवा प्रत्यारोपण कुठल्याही राज्यातील व्यक्ती करू शकेल.

ज्यामुळे अवयवदान करण्यास अथवा प्रत्यारोपण करण्यास अधिक प्रोत्साहन मिळू शकेल. या निर्णयामुळे या चळवळीला बळ मिळून ती अधिक विस्तारू शकेल. सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय जरी घेतला असला तरी त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्याप संबंधित संस्थांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्या यथावकाश पोहोचल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला आणि अंमलबजावणीला सुरवात होईल.

३) नावनोंदणी शुल्क ः या आधी अवयव प्रत्यारोपणासाठी नावनोंदणी शुल्क आकारले जायचे. ते पाच ते दहा हजार रुपयांदरम्यान असायचे. बऱ्याचदा रुग्ण ‘आमच्याकडे एवढेही पैसे नाहीत’ असे म्हणायचे. अशा गरजू लोकांना आशेचा नवा किरण मिळण्याची शक्‍यता आहे. शिवाय एक राज्यातून दुसऱ्या राज्यात नाव स्थानांतरित करताना देखील भरलेले नावनोंदणी शुल्क वाया जाण्याचे भय राहणार नाही.

४) नोटो - नॅशनल ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लान्ट ऑर्गनायझेशन ः सर्व अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया या ‘नोटो’च्या अखत्यारित होत असतात.

५) शालेय अभ्यासक्रमात समावेश ः भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा अवयव प्रत्यारोपण करणारा देश आहे. देशात २०१३ मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या चार हजार ९९० प्रक्रिया पार पडल्या होत्या. त्या उत्तरोत्तर वाढत गेल्या.

२०२२मध्ये प्रत्यारोपणाचा आकडा १५ हजार ५६१वर पोहोचला आहे. लोकांमध्ये जनजागृती नक्कीच झाली आहे. तरीदेखील अजून अनेक असे रुग्ण आहेत, ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची अत्यंतिक गरज आहे. पण अवयवदात्यांअभावी ही प्रत्यारोपणे होऊ शकत नाहीत.

नुसत्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या गरजू रुग्णांची संख्या दरवर्षी दीड ते दोन लाखांपर्यंत असते. प्रत्यक्षात मात्र एक दशांशच प्रत्यारोपणे होत असतात. त्यामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपण या दोन्हीही बाबतीत अधिकाधिक जनजागृती गरजेची आहे.

अवयवदात्यांची संख्या वाढायला यामुळे मदत होईल. सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे आणि इतर उपाययोजनांमुळे येत्या काही वर्षांत अवयवदान करणे तसेच प्रत्यारोपण करून घेणे ही प्रक्रियाही अधिक सुकर, सुलभ व सोपी होऊ शकते.

सरकारने अवयवदानाची संकल्पना बालपणीपासूनच नवीन पिढीमध्ये रूजवण्यासाठी त्याबाबतची जुजबी आणि मूलभूत प्राथमिक माहिती देणारे धडे अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याचे ठरविल्यामुळे येणारी पिढीही सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी या भावनेने अवयवदानाकडे पाहू लागेल.

हळूहळू या चळवळीची पाळेमुळे घट्ट रूजून भविष्यात अवयवदान आणि प्रत्यारोपण यांच्या चळवळीला बळ मिळेल. त्यामुळे अनेकानेक गरजूंच्या जीवनात सुखासमाधानाचे क्षण अवतरतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com