आखाती मैत्रीचे धागे

पश्‍चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती (यूएई), कतार, सौदी अरेबिया यांसह अनेक महत्त्वाच्या देशांशी भारताचे संबंध दृढ होताना दिसत असून, त्याबाबतीत एक नवे पर्व सुरू झाले आहे.
India relationship with gulf countries getting stronger diplomatic efforts
India relationship with gulf countries getting stronger diplomatic efforts Sakal
Updated on

जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही

सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही

— संत कबीर

भारताचे आखाती देशांशी मैत्रीचे धागे दृढ होत असून त्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना विशेष महत्त्व आहे.

पश्‍चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती (यूएई), कतार, सौदी अरेबिया यांसह अनेक महत्त्वाच्या देशांशी भारताचे संबंध दृढ होताना दिसत असून, त्याबाबतीत एक नवे पर्व सुरू झाले आहे. या देशांशी केवळ द्विपक्षीय सहकार्य, संबंधाचे करारमदार करून न थांबता प्रादेशिक सहकार्य वाढवणे,

त्याच्या बळावर जागतिक भूमिकेत संयुक्तपणे कृतिकार्यक्रम ठरवणे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिले आहे. सध्याच्या बदलत्या जागतिक सत्तारचनेत एकध्रुवीय वा द्विध्रुवीय जागतिक रचनेला आव्हान मिळत असून, ती बहुकेंद्री होण्याकडे कल आहे. तो प्रवाह बळकट करण्यासाठीदेखील अशा प्रयत्नांची गरज आहे, हे लक्षात घेतले तर या घडामोडींच्या व्यापक परिमाणाची कल्पना येते.

इस्राईल-हमास युद्धाची ठिणगी पडली तेव्हापासून अरब देश आणि भारताचे संबंध यांच्याबाबत विविध तर्ककुतर्क लढवले जात होते. त्याला विराम देण्याचे काम मोदींच्या सध्याच्या संयुक्त अरब अमिराती आणि त्यानंतर होत असलेल्या कतार दौऱ्याने होईल. कतारमध्ये नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा झालेली होती. पण त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यात भारताला यश मिळाले, ही बाब भारत-कतार संबंधांतील एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.

भारतातील परकी गुंतवणुकीत ‘यूएई’चा क्रमांक वरचा आहे. उभयतांमधील व्यापार ८५अब्ज डॉलरचा असून, २०३०पर्यंत तो शंभर अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यांतच त्याबाबतच्या दहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

त्यावर नजर टाकल्यास त्यातील अर्थकारणापासून सांस्कृतिक सहकार्यापर्यंतचे वैविध्य लक्षात येते. केवळ खनिजतेल पुरवठ्यावरच न थांबता ग्रीन हायड्रोजन, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतर, पायाभूत सुविधांचा विस्तार अशा अनेकविध क्षेत्रांचा यात समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या तत्काळ पेमेंटच्या ‘यूपीआय’ सेवेचे ‘यूएई’च्या ‘एएनआय’ देशांतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच भारताच्या ‘रुपे’ कार्डला ‘यूएई’च्या ‘जयवान’ला जोडणे अशा दोन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआय) कार्यव्याप्ती विस्तारणार आहे.

भविष्यात ‘रुपे’ आणि ‘जयवन’ हातात हात घालून आर्थिक सुविधा देतील. संरक्षणाच्या आघाडीवर आपण ‘यूएई’बरोबर केलेल्या संयुक्त सरावात फ्रान्सदेखील सहभागी झाला होता. शिवाय, दिल्लीत झालेली ‘जी-२०’ देशांची परिषद, ‘ब्रिक्स’, शांघाय सहकार्य परिषद अशा जागतिक व्यासपीठांवर भारताच्या साथीने ‘यूएई’चा वाढणारा वावर केवळ द्विपक्षीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक सहकार्याच्या नव्या पर्वाची नांदी ठरत आहे.

चीनने आपल्या उद्योग-व्यावसायिकांच्या निर्यातप्रधानतेला वाव देण्यासाठी ‘ड्रॅगन मार्ट’ ही संकल्पना राबवली आहे. आपण त्या धर्तीवर ‘यूएई’मधील जेबेल अली फ्री-झोनमध्ये एक लाख चौरस मीटरवर ‘भारत मार्ट’ची उभारणी करत आहोत.

ते कार्यान्वित झाल्यावर सूक्ष्म-लघु उद्योगांसह सर्व प्रकारच्या उद्योगांना आपल्या उत्पादनाची साठवणूक, विपणन, कार्यालये थाटणे, डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणे शक्य होणार आहे. आखाती देशात लाखोंच्या संख्येने भारतीय आहेत. दौऱ्यात ‘अलहन मोदी’ (नमस्ते मोदी) कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. ‘यूएई’मध्ये उभारण्यात आलेले स्वामिनारायण मंदिर हे उभयतांमधील सांस्कृतिक सौहार्दाचे प्रतीक ठरेल.

मोदी यांची दहा वर्षांतील ‘यूएई’ला ही सातवी भेट आहे. त्याचा चांगला परिणाम उद्योग-व्यापारासह राजनैतिक स्तरावरील विस्तारणाऱ्या द्विपक्षीय संबंधातून दिसत आहे. याच दौऱ्यांत पंतप्रधानांनी जागतिक पातळीवरील सरकारी परिषदेला (वर्ल्ड गव्हर्नमेंट समीट) लावलेली हजेरी जागतिक पातळीवरील भारताचे महत्त्व अधोरेखित करते.

प्रशासकीय सुधारणा, त्यात ‘एआय’सह तंत्रज्ञानाचा वापर, नवी जागतिक समीकरणे व त्यातील सहभाग, नागरीकरणाचे आणि आरोग्य संवर्धनाचे आव्हान अशा अनेक बाबींवर विमर्श यात होत आहे. ‘भारत- पश्‍चिम आशिया- युरोप आर्थिक कॉरिडॉर’ची संकल्पना प्रत्यक्ष उतरण्यासाठी कतारचेही सहकार्य मोलाचे आहे.

इस्राईल-हमास पेचावर तोडग्यासाठीही कतार भूमिका बजावत आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून भारत ‘यूएई’, कतारसह सौदी, अरेबिया, जॉर्डन, इस्त्राईल यांच्यासह युरोपला जोडला जाणार आहे.

चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड उपक्रमाला शह देत युरोपपर्यंत पोचण्याचा हा राजमार्ग बहुराष्ट्रीय सहकार्य आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराला व्यापक परिमाण देऊ शकतो. हा संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पश्‍चिम आशियातील देशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या आतापर्यंतच्या राजनैतिक प्रयत्नांची पायाभरणी यासाठी कामी येणार आहे. त्याला मोदी यांच्या या दौऱ्याने अधिक बळ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com