जगण्यातील नवलाई

मोठं सुख शोधताना आयुष्यात येऊन गेलेल्या लहान लहान सुखांकडे दुर्लक्ष होत गेलं.
Enjoy
Enjoy

आजवर आपण खूप धावलो. साहजिकच प्रवासाची साधनं, संवादाची साधनं, आपल्याला लागणारी यंत्रं फक्त वेगाची ‘सबसे तेज’ भाषा बोलत होती. रोज लागणाऱ्या वस्तूसुद्धा ‘झटपट आराम’, ‘बस दो मिनट में तैयार’, ‘बंटी, तुझा साबण स्लो आहे का’ असं म्हणत आपल्या बरोबरीने पळत होत्या. ‘फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट’ हे जमलं तरच या जगात ‘हॉट सीट’ मिळते रे बाबा, हे सांगत आपण मुलांनाही धावायला शिकवतो. कोरोना आपत्तीने या शर्यतीला करकचून ब्रेक लावला आहे. चढावर अचानक ब्रेक लावला की, आपोआप घरंगळत मागे येतो. तसे मागे येताना आपण आपल्याच जगण्याकडे नवलाईने बघायला लागलो आहोत. मग जाणवतं की, धावपळीत वाटेतले अनेक सुंदर थांबे बघायचेच राहून गेले. निगुतीने करायच्या बऱ्याच गोष्टी सुटून गेल्या. छंद अपूर्ण राहिले. मोठे सुख शोधताना आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा अजूनही भोवताली असलेल्या लहान लहान सुखांकडे दुर्लक्ष होत गेलं. (Jagnyatil Navalai article in column of Ya Jagnyavar by Mohini Modak)

एक लोककथा आहे. गळ्यात लोखंडी साखळी घालून एक माणूस परीस शोधायला निघाला. वाटेतला प्रत्येक दगड त्या साखळीला लावून ती सोन्याची होते का हे बघत आणि नसेल तर तो दगड फेकत भराभर पुढे जात राहिला. त्या नादात ती साखळी केव्हा आणि कोणत्या दगडामुळे सोन्याची झाली, हे त्याला कळलंच नाही. त्याच्यासारखीच आपल्याला घाई होती, इतकी की आपण श्वास सुद्धा पुरेसा दीर्घ घेत नव्हतो. १९८०च्या सुमारास सुरु झालेली स्लो फूड चळवळ आतापर्यंत फारशी महत्वाची वाटत नव्हती. भौतिक समृद्धी आणि आंतरिक समाधानाचा समन्वय साधण्याऐवजी भव्यदिव्य यश म्हणजे सुख हे आपण ठरवून टाकलं होतं. त्या टप्प्यावर पोचेतो ‘भव्यदिव्य’ची व्याख्या पुन्हा बदलत होती. आता मागे येता येता आपण नोंद न घेतलेले सुखाचे चिमुकले स्त्रोत लख्ख दिसताहेत. एखाद्या कलेच्या अद्वितीय अविष्कारापासून नि:शब्द शांततेपर्यंत, विज्ञानातल्या रहस्याचा स्वत:ला उलगडा होण्यापासून एखाद्या अनामिक पक्षाची शीळ ऐकण्यापर्यंत, एखाद्या पुस्तकातल्या शब्दाने, विचाराने झपाटून जाण्यापासून हळव्या स्पर्शापर्यंत, मृद्गंधाच्या दरवळापासून बाळाच्या निरागस हास्यापर्यंत, मदतीसाठी पुढे केलेल्या हातापासून टाळीसाठी पुढे केलेल्या हातापर्यंत ते कुठेही विखुरलेले असू शकतात. याचे निकष प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे वेगळे असतात. ते वेगळे असण्यातच मजा आहे. पण शोधण्याची असोशी मात्र तीच असते. अशी छोटी सुखं खिसा भरलेला किंवा हलका असला तरी तितकीच तृप्तता देतात. पण केव्हा! तो अनुभव, तल्लीनतेमधलं ते सौंदर्य मनातल्या अवकाशात मुरवत त्याचा तब्येतीने आस्वाद घ्यायला वेळ असेल तरच. स्वच्छ, शांत मन आणि अशा रुपेरी क्षणांच्या स्वागतासाठी सताड उघडं ठेवलेलं त्याचं दार, एवढं यासाठी पुरेसं आहे. याने जग बदलत नाही पण आपण जगण्याच्या प्रेमात नक्कीच पडतो.

कुछ ना कुछ तो छुटेगाँही...

एका प्रसिद्ध सिनेमातलं दृश्य आहे. नायक नायिका एका पर्यटन स्थळावर गेले आहेत. कड्यावर निवांत बसून ती त्याच्या साक्षीने सूर्यास्त बघते आहे. त्याच्या हातात तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची यादी आहे. त्याचं म्हणणं असतं- सूर्यास्त सगळीकडे सारखाच दिसतो, त्यात किती वेळ घालवायचा. अंधार पडेल मग बाकीची स्थळं बघणं राहून जाईल, चल निघूया! त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करून दरीत भिरकावत ती म्हणते, "लाईफमें कुछ ना कुछ तो छुटेगाँही, तो जहाँ हैं, वही का मजा लेते हैं." जिथे आहोत तिथेच भिरभिरणारी सुखाची इवलीशी फुलपाखरं बघायला हवी असलेली उसंत आता आपल्याला मिळालीय. आकाशातल्या चंद्राच्या कला बघण्यात आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारण्यात कितीही मौज असली तरी शेवटी भाकरीच्या चंद्रामागे प्रत्येकाला अपरिहार्यपणे धावावंच लागते. पण आधीसारखं उर फाटेस्तो नाही, एवढं एव्हाना आपल्याला कळलंय. गती हवीच पण किती! तोल राखता येईल आणि जगण्यात कुतूहलाने डोकावत रमतगमत पुढे जाता येईल एवढीच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com