esakal | दडपशाहीचे बेलारूस मॉडेल
sakal

बोलून बातमी शोधा

Roman Protasevich Arrested

दडपशाहीचे बेलारूस मॉडेल

sakal_logo
By
जतीन देसाई

विरोधातील तरुण पत्रकार रोमान प्रोतासेविच (२६) यांना अटक करण्यासाठी बेलारूसच्या अध्यक्षांनी आपल्या हवाई हद्दीवरून जाणाऱ्या विमानाला राजधानी मिन्स्क येथे उतरण्यास भाग पाडले. याचे जगभर संतप्त पडसाद उमटत आहेत.

बेलारूसचे अध्यक्ष (खरंतर हुकूमशहा) अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी लोकशाहीवादी तरुण पत्रकार रोमान प्रोतासेविच (२६) यांना अटक करण्यासाठी जे केलं, त्याची कल्पना करणंही कठीण आहे. बेलारूसच्या हवाई हद्दीवरून जाणाऱ्या ‘रायनएअर’च्या विमानाला बळजबरीने राजधानी मिन्स्क येथे उतरण्यास बेलारूसने भाग पाडले आणि विमानातील १२६ प्रवाशांचा जीव धोक्यात आणला. या कृतीचे जगात संतप्त पडसाद उमटले. बेलारूसच्या विरोधात युरोपीय देश आर्थिक निर्बंध लादण्याची चिन्हे आहेत.

लुकाशेन्को हे युरोपचे शेवटचे हुकूमशहा. ते १९९४पासून सत्तेवर आहेत. सत्तेचा गैरवापर करून देशात त्यांनी दहशत निर्माण केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत आपला प्रचंड विजय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. पण, बेलारूसच्या लोकांचा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा त्यावर विश्वास नव्हता. हजारोंचे मोर्चे निघाले. लुकाशेन्कोच्या विरोधात स्वेतलाना यांनी निवडणूक लढवली होती. स्वेतलानाला प्रचंड जनसमर्थन होतं. तिचा पराभव होणं शक्य नव्हतं. बेलारूसच्या लोकांच्या म्हणण्यानुसार स्वेतलानाला ७० ते ८० टक्के मतदान झालं होतं. पण अध्यक्षांना सत्ता सोडायची नव्हती. त्यांनी अनेकांची हत्या घडवून आणली. तीस हजारांहून अधिक लोकांना तुरुंगात डांबले. स्वेतलाना यांनी शेजारच्या लुथिआनिया देशात आश्रय घेतला. जगात सगळे विरोध करत असताना लुकाशेन्को यांचा मित्रदेश रशियाने लुकशेन्को यांना मदत केली.

लोकशाहीसाठी धडपड करणाऱ्यात रोमानही पुढे होते. ‘नेक्सटा’ नावाच्या त्याच्या ‘टेलिग्राम’ वरच्या चॅनेलला प्रचंड प्रतिसाद होता. युरोपमधल्या या लहानशा देशात त्यांचे २० लाख ग्राहक होते.त्या देशातील अत्याचारांची भयावह स्थिती त्यातून समोर येत होती. पोलंड व लिथुआनियातून ते मोहीम चालवत असत. ‘रायनएअर’च्या विमानातून लिथुआनियाची राजधानी विल्नीयसला ते निघाले होते. अथेन्सहून निघण्यापूर्वी ‘माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याचा संशय आहे’ असे त्यांनी म्हटले होते. ग्रीस आणि बेलारूस हे दोन्ही देश ‘नाटो’चे सदस्य आहेत.

ग्रीस येथे एका परिषदेसाठी रोमान गेले होते. आर्थिक विषयावरील त्या परिषदेत स्वेतलानाही उपस्थित होत्या. लुकाशेन्कोच्या दहशतीमुळे रोमान यांनी २०१९मध्ये बेलारूस सोडलं आणि पोलंडचा आश्रय घेतला. पोलंडने त्याला राजकीय आश्रय दिला. तेथून तो अनेकदा लिथुनिआला जायचा. बेलारुसमध्ये लोकशाहीसाठी लढणाऱ्या अनेक नेते-कार्यकर्ते यांना लिथुआनियानी आश्रय दिलेला आहे. त्यांना भेटणं आणि भविष्याची रणनीती ठरवण्यासाठी लिथुआनिया जाणं त्याला आवश्यक होतं. आपल्या आई-वडिलांना पण तिथे बोलावून घेतलं. समाज माध्यमांवर रोमान अतिशय प्रभावी पद्धतीने बेलारुस येथील अत्याचार आणि तिथे लोकशाहीसाठी सुरू असलेल्या संघर्षाबद्दलची माहिती लोकांसमोर ठेवत. या बंडखोर तरुणाच्या प्रभावामुळे लुकाशेन्को अस्वस्थ होते. दहशतवादी कृत्याशी संबंधित व्यक्तींच्या यादीत गेल्यावर्षी बेलारूस सरकारने रोमानचा समावेश केला होता. त्याला १२ वर्ष किंवा अधिक काळाचा तुरुंगवास होऊ शकतो. अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बेलारुस सरकारने रोमान यांनी आपला गुन्हा कबूल केला असल्याचं जगाला दाखवलं. प्रचंड शारीरिक अत्याचार किंवा अत्याचाराच्या भीतीमुळे रोमान यांनी अशा स्वरूपाचं निवेदन केलं असणार, यात शंका नाही.

सुटकेची मागणी

स्वेतलाना यांनी रोमान यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली आहे आणि ‘इंटरनॅशनल सिविल एव्हिएशन ओर्गेनायझेशन’ने बेलारूस्याविरुद्ध तत्काळ कारवाई केली पाहिजे, असंही म्हटलं आहे. विमानाला पळवून नेण्याच्या प्रकाराबद्दल या संस्थेने चिंता व्यक्त करून म्हटले आहे की शिकागो परिषदेच्या संकेतांचं बेलारूसकडून उल्लंघन करण्यात आलं आहे. पोलंडच्या पंतप्रधानांच्या सल्लागारांनी सांगितलं की पोलंड युरोपियन युनियनच्या देशांना बेलारूसच्या हवाई हद्दीचा वापर न करण्याचा आणि बेलारूसची एअरलाइन ‘बेलाविया’ला युरोपात बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील लुकाशेन्कोचा निषेध केला आहे.

युरोपियन समुदायातील २७ राष्ट्रांनी लुकाशेन्को यांचा निषेध केला आहे. युरोपात बेलारूस एकमात्र राष्ट्र असे आहे, की जिथे कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा अस्तित्वात आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदायावर प्रामुख्याने दोन जबाबदाऱ्या आहेत. एक तर बेलारूसवर दबाव वाढवून रोमान यांची मुक्तता आणि दुसरी म्हणजे बेलारुसच्या जनतेची लोकशाहीची आकांक्षा पूर्ण करणे. सर्व आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून लुकाशेन्को यांनी रोमान यांना अटक केली. यापूर्वी इतिहासात एका तरुण मुलाच्या अटकेसाठी विमान बळजबरीने उतरवण्याचा प्रकार घडलेला नाही. जगात अनेक देशांच्या हवाई हद्दीचा उपयोग करून विमाने जात-येत असतात. आपल्या हवाई हद्दीतून अशा प्रकारे यापुढे विमान पळवून नेण्यात येणार नाही, हे पाहणे आवश्‍यक आहे. लुकाशेन्को यांच्यावर जेवढा दबाव वाढेल तेवढा तो रशियाच्या जवळ जाईल. विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी पण लुकाशेन्को यांच्या विरोधात कारवाई होणं आवश्यक आहे.

माझी हत्या करण्याचा कट - रोमान

‘रायनएअर’चं विमान बेलारूसच्या हवाई हद्दीचा उपयोग करून विल्नीयसला उतरणार होतं. बेलारूसच्या हवाई हद्दीच्या बाहेर पडण्याच्या काही मिनिटांपूर्वी हवाई वाहतूक नियंत्रकांनी वैमानिकाला कळवलं, की विमानात बॉम्ब असण्याची शक्यता असल्याने विमान तुम्ही मिन्स्क येथे उतरवा. त्याचवेळी ‘मिग २९’ लढाऊ विमान त्याच्या जवळ आलं. ‘रायनएअर’च्या विमानाला मिन्स्क येथे उतरण्यास भाग पाडण्यात आलं. विमानतळावर रोमान यांना त्याच्या मैत्रिणीसह पकडण्यात आलं. विमानातील सहप्रवाशांनी सांगितलं, की विमान जेव्हा मिन्स्कच्या दिशेने जायला लागलं, तेव्हा रोमान अक्षरशः हादरले होते. ‘माझी बेलारूसमध्ये हत्या करण्यात येईल’, असं तो विमानात सांगत होता. बहुतेक सहप्रवासी लिथुआनियाचे होते. काही अमेरिकीही त्यात होते. बेलारूसने नंतर सांगितले, की ‘हमास’ या दहशतवादी संघटनेकडून विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. पण, आजपर्यंत ‘हमास’ने असा प्रकार कधीच केलेला नाही. ‘हमास’ने देखील लगेच हे स्पष्ट केलं. बेलारूसने ही खोटीच आवई उठवली होती.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)