चौकशी १६ वर्षे, खर्च ३३ कोटी, शिक्षा तिघांनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pol pot

कंबोडियातील ख्मेर रूज राजवटीच्या काळातील अत्याचाराची चौकशी करण्यासाठी लवाद नेमण्यात आला. त्याचे कामकाज सोळा वर्षे चालले, त्यावर ३३ कोटी डॉलर खर्च होऊन फक्त तिघांना शिक्षा झाली.

चौकशी १६ वर्षे, खर्च ३३ कोटी, शिक्षा तिघांनाच

- जतिन देसाई

कंबोडियातील ख्मेर रूज राजवटीच्या काळातील अत्याचाराची चौकशी करण्यासाठी लवाद नेमण्यात आला. त्याचे कामकाज सोळा वर्षे चालले, त्यावर ३३ कोटी डॉलर खर्च होऊन फक्त तिघांना शिक्षा झाली. डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार. तथापि, त्याच्या कामकाजातून मानवतेला काळिमा फासणाऱ्या कारकिर्दीचे ऐतिहासिक दस्तावेजीकरण झाले एवढेच.

आग्नेय आशियातील कंबोडिया पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याच कंबोडियात १९७५ ते १९७९ दरम्यान ख्मेर रूज राजवटीतल्या नरसंहारात १७ लाखांहून अधिक जण मृत्युमुखी पडले होते. ही राजवट अतिशय क्रूर, अत्याचारी होती. त्या काळातील अत्याचारी नेत्यांवर कारवाईसाठी संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) मदतीने स्थापन करण्यात आलेल्या लवादाचे (ट्रिब्युनल) काम २२ सप्टेंबरला पूर्ण झाले. या लवादाने १६ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले, त्यावर ३३ कोटी ७० लाख डॉलरचा खर्च झाला आणि केवळ तीन जणांना शिक्षा दिली गेली.

संयुक्त राष्ट्र आणि कंबोडिया सरकारने लवादाची संयुक्त जबाबदारी घेतली होती. पॉल पॉट या क्रूर राजवटीचा सर्वेसर्वा होता. लोक ख्मेर रूजच्या अत्याचाराने हैराण होते. अति डाव्या विचाराच्या ख्मेर रूज राजवटीविरोधात बोलायची कोणाची हिंमत नव्हती. काही कारण नसताना लोकांना पकडलं जायचं आणि तुरुंगात पाठवलं जायचं किंवा ग्रामीण भागात काम करण्यासाठी जबरदस्तीने पाठवलं जायचं. त्यांना पुरेसे अन्नदेखील दिले जात नसे. उपाशीपोटी त्यांचा मृत्यू व्हायचा. हजारो लोकांना मृत्यूची शिक्षा दिली गेली. या राजवटीविरोधात जगभर वातावरण होते. तो काळ शीतयुद्धाचा होता. चीनने पॉल पॉटचं समर्थन केलं होतं, तर रशिया आणि व्हिएतनाम यांनी विरोध केला होता. शेवटी १९७९ मध्ये व्हिएतनामने कंबोडियावर हल्ला करून ७ जानेवारी रोजी राजधानी नोम पेन्ह शहरावर कब्जा मिळवला होता. ख्मेर रूज राजवट व्हिएतनामविरोधी असल्याचं सांगून व्हिएतनामनी कंबोडियावर हल्ला केला आणि पोल पॉट सरकारला सत्ताच्युत केले.

अनेक वर्षे चाललेल्या लवादावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही टीका झाली. त्यावरील प्रचंड खर्चाचं कसं समर्थन होऊ शकतं, असा प्रश्न देखील अनेकांनी केला. भ्रष्टाचाराचा तसेच कंबोडियाच्या पंतप्रधान हुन सेन यांच्या दबावाला लवाद बळी पडल्याचा आरोप केला जातो. हुन सेन स्वतः एकेकाळी ख्मेर रूजचे कार्यकर्ते होते, पण १९७७ मध्ये ते पॉल पॉटचे विरोधक झाले. व्हिएतनाममध्ये जाऊन ख्मेर रूजच्या विरोधात त्यांनी कामाला सुरुवात केली. चौकशी अधिक व्यापक होऊ नये, असं हुन सेन यांना वाटत असे. तीन जणांनाच लवादाने शिक्षा दिली तरी त्यातून त्या काळातील अत्याचाराचा महत्त्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. लवादासमोर अत्याचार सोसलेल्यांनी दिलेली माहिती अस्वस्थ करणारी आहे. त्या अत्याचाराची आपण कल्पनाही करू शकत नाही.

अत्याचाराचा हा दस्तावेज इतिहासाची कायम साक्ष देईल. मात्र लवाद कमी काळात यापेक्षा अधिक प्रभावी काम करू शकला नसता काय, हा प्रश्न राहतो. लवादाच्या न्यायाधीशांनी २००६च्या जुलै महिन्यात शपथ घेवून कामाची सुरुवात केली. त्यात काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय न्यायाधीश होते. त्यापूर्वी १९९७ मध्ये कंबोडियाने संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना पत्र पाठवून ख्मेर रूजच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना शिक्षा देण्यासाठी लवाद बनविण्यास मदत करण्याची विनंती केली होती. क्रूर राजवटीने केलेल्या नरसंहार आणि मानवतेच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यांची चौकशी आणि त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी लवादाचीच होती. पॉल पॉट यांचा मृत्यू लवादाच्या आधीच वयाच्या ७२व्या वर्षी १९९८मध्ये जंगलात झाला.

माझा मृत्यू तुरुंगातच!

लवादाने शेवटच्या दिवशी खियू संफान (९१) यांच्या अपीलवर सुनावणी केली. संफान यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ख्मेर रूज सरकारमधील, कदाचित, ते शेवटचे जिवंत असण्याची शक्यता आहे. त्यांचे अपील नाकारण्यात आले आणि नरसंहाराच्या आरोपाखाली त्यांना देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. त्यांनी सांगितलं, ‘इतर नेत्यांनी केलेल्या क्रूर गुन्ह्यांची मला माहिती नव्हती.’ पण त्यावर कोण आणि कशासाठी विश्वास ठेवणार? संफान यांनी असंही म्हटलं, ‘तुम्ही काहीही ठरवा, माझा मृत्यू तुरुंगातच होणार.’ साहजिकच लवादाने त्यांचे कुठलेही मुद्दे मान्य केले नाहीत. ते असंख्य लोकांच्या मृत्यूला जबाबदार होते. त्यांना २००७ मध्ये अटक केली होती.

केवळ बाराच जण जिवंत

संफान सोबत त्या काळात असलेल्या नुओन ची देखील नरसंहारात सहभागी असल्याचा लवादाने आधीच निकाल दिला होता. २००७ मध्ये नुओन यांना अटक केली होती. २०१८ मध्ये संफान आणि नुओन यांना जन्मठेप सुनावण्यात आली. २०१९ मध्ये वयाच्या ९३व्या वर्षी तुरुंगात नुओन यांचा मृत्यू झाला. पोल पॉटचा तो अतिशय जवळचा आणि विश्वासू सहकारी होता. नोम पेन्हच्या कुप्रसिद्ध तुरुंग एस-२१ची जबाबदारी कांग लाक ल्यू यांच्याकडे होती. सर्वात आधी कांग यांच्या विरुद्ध खटला चालला. त्या तुरुंगात वीस हजारपेक्षा अधिक लोक होते. त्यातील केवळ बाराच जण जिवंत राहिले. कांग यांनाही जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. त्यांचा २०२०मध्ये मृत्यू झाला. लेंग सेरी परराष्ट्रमंत्री होते. त्यांची पत्नी लेंग थिरित समाजकल्याण मंत्री होत्या. २००७मध्ये दोघांना अटक करण्यात आली. सेरीविरुद्ध खटल्याचा निकाल येण्यापूर्वीच त्यांचा २०१३ मध्ये मृत्यू झाला. मानसिक आजारपणामुळे थिरित यांना २०१२ मध्ये सोडण्यात आले. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे २०१५मध्ये निधन झाले. अजूनही जग पोल पॉट यांच्या काळातल्या अत्याचाराला विसरलेलं नाही. असे नरसंहार कुठेही होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.