राज्याराज्यांत -  जम्मू-काश्‍मीर : गुलाबी थंडीचे काटेरी प्रश्‍न

श्रीनगरलगतचा बर्फाने आच्छादलेला पर्वतीय भाग.
श्रीनगरलगतचा बर्फाने आच्छादलेला पर्वतीय भाग.

काश्‍मिरात ‘छेल्ला कलान’मध्ये पर्यटकांना मनोहारी वाटणारा हिमवर्षाव होतो; पण काश्‍मिरींचा झगडा सुरू होतो तो समस्यांना तोंड देण्याचा. बंद महामार्गामुळे ठप्प झालेली वाहतूक, विमान प्रवासाचे वाढलेले भाडे आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते.

गेली तीन दशके काश्‍मीर सातत्याने चर्चेत आहे, या वेळी २०२१ मध्ये काश्‍मीर चर्चेत आहे ते वेगळ्याच कारणांमुळे. स्थानिक मंडळी म्हणतात, त्या ‘छेल्ला कलान’ला (अतिथंडीचे ४० दिवस) प्रारंभ होत असताना काश्‍मीर टोकाच्या थंडीच्या लाटेत गारठून गेला असल्याने सगळ्या प्रकारचे जनजीवनही ठप्प झालेले आहे. २१ डिसेंबर रोजी अतिथंडीचे ४० दिवस सुरू होतात आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीला ही शीतलाट निघून जाते. अलीकडच्या काळातील अत्यंत टोकाच्या थंडीचा अनुभव काश्‍मीर घेत आहे. राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये दोन फूट उंचीचे बर्फाचे थर होते आणि टोकावरच्या दुर्गम भागात, तसेच अतिउंचावर ते सहा फुटांपर्यंत वाढले होते. श्रीनगरमधील जगप्रसिद्ध दल सरोवर गेले दोन आठवडे थंडीने पूर्णतः थिजून गेलेले आहे आणि हे वार्तापत्र लिहीत असतानाही त्याची ती स्थिती कायम आहे. या घटनेवरून काश्‍मिरात किती तीव्रतेची थंडी आहे आणि हिम साचलेले आहे, याची कल्पना येते.

सावधगिरीच्या सूचना
या असामान्य स्थितीमुळे प्रशासनाला, खास करून तरुणांना सरोवराच्या गोठलेल्या पृष्ठभागावर भटकू नका, असा सल्लाच देणे भाग पडले आहे. या गोठलेल्या दल सरोवरावर मुले, मुली अशी सगळी तरुणाई सायकलची रपेट, क्रिकेट, फूटबॉल, बॅडमिंटन आणि इतर खेळांचा आस्वाद घेण्यासाठी उतरते आणि तोबा गर्दी करत असते. आजच्या गोठलेल्या या सरोवराने साठच्या दशकातील आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्या वेळी जम्मू-काश्‍मीरचे तत्कालीन पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांनी सरोवरात तीन फूट जमलेल्या बर्फावरून जीपमधून फेरफटका मारला होता. याबाबतचे छायाचित्र इम्तियाज बक्षींनी सोशल मीडियावर व्हायरल केले असून, त्यात बक्षींच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी, मुख्य सचिवांसह अनेक जण सरोवराच्या गोठलेल्या पाण्यावर उभे असल्याचे दिसत आहे. यापूर्वी हिवाळ्यात दल सरोवर १९५९-६०, १९६४ आणि १९८६ मध्ये गोठलेले होते. हिमवर्षावामुळे होणारी करमणूक बाजूला ठेवली तरी या असाधारण स्थितीने काश्‍मीर खोऱ्यातील नागरिकांना डझनभरापेक्षा अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. केवळ दल सरोवर किंवा इतर तळी, विहिरीच नव्हे, तर शून्याखाली गेलेल्या तापमानाने घराघरांत पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नळही आटून जातात. कारण आतले पाणी थिजलेले असते. काश्‍मिरातील अतिहिमवृष्टीने पहिल्यांदा फटका बसतो तो वीजपुरवठ्याला. हिवाळ्यात राजधानी श्रीनगरमध्येदेखील सकाळपासून ते सायंकाळपर्यंत दररोज वीजपुरवठा ८ ते १० तास खंडित होतो. हिमवर्षावाने विजेच्या पुरवठ्यात कपात केली जाते. या वेळी मात्र, प्रतिकूल स्थिती असतानाही वीजपुरवठा खात्याने हिमवर्षाव असूनही तत्परेने पुरवठा सुरळीत ठेवलेला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठप्प वाहतूक, प्रवास महागला
श्रीनगर-जम्मू महामार्गाचा विचार करता या वेळीही हिमवर्षावाने काही कृपा केलेली नाही. काश्‍मीरला उर्वरित देशाशी जोडणाऱ्या या महामार्गावर हिवाळ्याने वाताहत झालेली आहे. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीपासून ते संरक्षणापर्यंत अनेक बाबीत अडथळे उभे आहेत. जोराची हिमवृष्टी आणि हवामानविषयक इतर समस्यांमुळेही हवाई वाहतूक आठवडाभर स्थगित ठेवावी लागली. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्यांनीही नेहमीप्रमाणे काश्‍मिरी लोकांची लूट करण्याची संधीदेखील सोडली नाही. महामार्ग बंद होण्याचीच खोटी, की श्रीनगरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गांवरील हवाई प्रवासाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडू लागतात. काश्‍मिरातील तिकीट माफियांना वेसण घालण्यात प्रशासनही हतबल ठरते. 

पुरवठ्याअभावी हाल
सातत्याने महामार्ग बंद राहणे आणि हवाई वाहतूकही ठप्प होणे यामुळे सहाजिकच जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागतो आणि मग सुरू होते त्यांच्या किमती सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाणे. त्यात भर पडते ती प्रशासनाच्या निष्क्रियतेची. प्रशासन पेंगायला लागलेले असते. हिवाळी आणि हिमवर्षावाशी संबंधित समस्यांनी घेरलेल्या जनतेच्या प्रश्नांपासून ते रस्ते आणि महामार्ग खुले करण्यासही ते असमर्थ ठरते. विनोदानेच सांगायचे तर, जून-जुलैमध्ये अधिकारी हिवाळा आणि हिमवर्षावाला तोंड देण्याच्या कृती कार्यक्रमावर बैठका घेतात आणि जेव्हा प्रत्यक्षात हिवाळा येतो आणि या अधिकाऱ्यांकडून कृतीची गरज असते, तेव्हा मात्र ते बेपत्ता असतात. 

बर्फाचे दुतर्फा लावलेले थर किंवा हिमवर्षाव यामुळे श्रीनगरमधील वाहतुकीचा खोळंबाही ठरलेलाच असतो. वाहतूक कोंडीवर तोडग्यासाठी दिल्लीसारखी येथेही सम-विषम पद्धतीच्या कार्यवाहीची कल्पना मांडली गेली होती.काश्‍मीर खोऱ्यातच वाहतुकीची समस्या आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com