कलाबहर : कलेतील सर्जनाचा आत्मस्वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Art
कलाबहर : कलेतील सर्जनाचा आत्मस्वर

कलाबहर : कलेतील सर्जनाचा आत्मस्वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- जयंत भीमसेन जोशी

अनेक साधी मर्मसूचक एलिमेंट्स आणि मूल्ये कालबाह्य म्हणून तुडवली जात आहेत. प्रचंड कोलाहलात आणि प्रखर प्रकाशातल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या सादरीकरणात कलेची नजाकत, वेलांट्या आणि हळवे प्रवाह थिजल्यासारखे झाले आहेत. अनेकजण जगाला बुजून आपली निर्मिती करताहेत असं दिसतं. खूप मोठ्या समूहाला संबोधित करायच्या नादात कलाविष्काराच्या उच्चारातली सुस्पष्टता गुळगुळीत झाली आहे. अशावेळी आविष्कारांची पुनरावृत्ती होणे अटळ आहे. कलेतले मापदंड आपल्या वैयक्तिक गुणसूत्रांपासून फार दूर गेले आहेत. अशा वेळी कलावंतांनी आपल्या स्वतःच्या कलाभाषेबद्दल, शैलीबद्दल अत्यंत प्रामाणिक असणे जरुरीचे आहे.

तुमची शैली ही तुमच्या डीएनएइतकी, हस्ताक्षरासारखी आणि आवाजाइतकी वैयक्तिक आहे/असते. कळपात राहून, केवळ लौकिक यशाचा विचार करत, विकल्या जाणाऱ्या रूपांचा अनुनय करत निर्मिती करत राहणे ही स्वतःच्या प्रेरणांशी प्रतारणा आहे. कलाविषयक संदर्भ सार्वकालिक असतात. पण भविष्यकालीन संदर्भ निर्माण व्हावेत इतकी तडफ नव्या चित्रांमध्ये अभावाने दिसते. परदेशात कुणीतरी निशाण फडकवतय आणि सगळेजण त्यामागे धावताहेत असच चित्र दिसतंय. दृश्यकला क्षेत्रात क्रांती घडावी असा अनेकांचा प्रामाणिक प्रयत्न आहे; पण प्रस्थापित व्यवस्थेच्या कोष्टकातली आर्थिक गणिते जोपर्यंत बदलत नाहीत, तोपर्यंत अनेक कलावंतांची स्वप्ने वास्तवात उतरण्याआधी विस्मरणसृष्टीत जमा होणार आहेत. कलेतील नवा विचार बाजूलाच; पण फक्त कलेतल्या कारागिरीकडे बघा असेही काहीजण मोठ्यांनी सांगत आहेत. नव्या तंत्रज्ञानातला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या आवाजाला क्षीण करतोय, असेही चित्र दिसतंय. मी, माझ्यासारखे अनेक, चित्रांमधल्या नव्या सुरावटी आणि नव्या बंदिशींच्या निर्मितीसाठी, नवे आवाज ऐकायला उत्सुक आहोत. आज नवे घडेल, उद्या नवे दिसेल, ही आशाच कलावंताच्या जगण्याचा प्राण आहे.

चित्रकलेतला आनंद समजतो त्या क्षणापासून जगण्यात एका नव्या आनंदपर्वाची सुरुवात होते. तो आनंद चित्रे पहाताना होतो आणि स्वत:ची नवी चित्रनिर्मिती करतानाही होतो. गाणे, चित्र काढणे या विधांशी खेळताना जगण्यातला एक वेगळा रोमान्स तुम्ही अनुभवता. ज्याला कला समजते अशा व्यक्तीच्या सहवासाने तुमचे जगणे समृद्ध होऊ शकते. पण त्यासाठी नवे समजून घेण्याचा आणि नवे काही निर्माण करण्याचा ध्यास असायला हवा. त्याग करण्याची मानसिकता हवी. सुरुवात तुम्ही स्केचिंगने करु शकता. त्यासाठी फार काही लागत नाही. फक्त कागद आणि जाड शिसाची पेन्सिल. ड्राॅईंग हा पेंटिंगचा आत्मा आहे. ड्राॅईंगमधे सरावाने हळुहळू सफाई येते आणि या सफाईबरोबर तुमच्यात विचारांत स्पष्टता येते. फार मोठे आहे रंग, आकार आणि रेषांचे जग. या जगाच्या परिचयामुळे तुमच्या जाणीवा श्रीमंत होतात.

कविता,पेंटिंग,कल्पना ब्लू प्रिंट्स असतात, एका नव्या जगाचे, एका वेगळ्या दृष्टिकोनाचे, वास्तवाच्या न दिसलेल्या मितीचे, काळाच्या बदलत्या रूपाचे. नवे असते सर्व काही. प्रस्थापित व्यवस्था ही स्वतःच्या हिताला धक्का लागू नये, यासाठी दक्ष असते आणि त्याला बाधा पोहोचू शकणारे सर्व नवे शोध,नवे विचार हे हुशारीने आणि निर्दयपणे नष्ट करत असते. व्यवस्थेतल्या तांत्रिक सुधारणा हळूहळू का होईना अमलात येतात; पण आमूलाग्र बदल स्वीकारले जात नाहीत. कितीही उपयुक्त,लोककल्याणकारी असले तरीही. कला, संगीत यांना आध्यात्मिक शेल्फात टाकून दिले आहे. कला व्यवहार हे रुक्ष व्यावहारिक जगण्याला खरा अर्थ देतात. म्हणून त्यांच्या मर्माचे शास्त्रीय अध्ययन आवश्यक आहे. याच तरल आध्यात्मिक संवेदनांशी सुसंगत राहिल्यामुळे समाज अधिक निर्मितीक्षम, प्रामाणिक, प्रगल्भ, सुजाण, शक्तिशाली आणि सभ्य होणार आहे. आध्यात्मिक जीवनशैली म्हणजे संन्यस्तवृत्ती,विरक्ती अशी गल्लत करू नये.

रसनिष्पत्ती होऊन भरपूर आनंदमय आयुष्य सर्वांनी भोगावे असे वाटत असेल तर सर्व नव्या विचारांचे मोकळ्या मनाने स्वागत करायचे आहे. परंपरेतले सर्व जड,अतार्किक आणि बेढब यांचा आपण लवकर त्याग करु शकलो, तर कला, संशोधन, व्यासंग हे फुलून येण्यासाठी उत्तम सामाजिक मानसिकता तयार होईल.

loading image
go to top