
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे जगभरात पडसाद उमटले. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रही यापासून दूर नाही.
- जयेंद्र लोंढे
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे जगभरात पडसाद उमटले. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रही यापासून दूर नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, जागतिक फुटबॉल संघटना (फिफा) यांसारख्या संघटनांपासून जगभरातील खेळाडूंनीही रशियाला विरोध केला. याचा फटका रशियाला बसला. रशियातील काही महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या, काही पुढे ढकलल्या. या सर्व कारणांमुळे याआधी अंमली पदार्थ सेवनात अडकलेल्या रशियातील क्रीडा क्षेत्राचा पाय आणखी खोलात गेला. हे सर्व घडत असतानाच एक खेळाडू चक्क रशियाविरोधात युद्धाच्या रणांगणात उभा ठाकला आहे. युक्रेनमध्येच जन्मलेल्या या पठ्ठ्याचे नाव सर्गेई स्टॅखोव्हस्की. खेळाच्या मैदानात लढणारा खेळाडू देशाला वाचवण्यासाठी गरज पडल्यास हातात बंदूकही घेऊ शकतो, हे त्याने दाखवून दिले.
सर्गेईचा जन्म ६ जानेवारी १९८६ रोजी किवमध्ये झाला. आता हे शहर युक्रेनची राजधानी आहे. क्रीडापटू हा त्याने मैदानात केलेल्या कामगिरीवरून ओळखला जातो; पण सर्गेईला टेनिसपटू म्हणून भरीव कामगिरी करता आलेली नाही. एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटांत एकूण आठ जेतेपदे त्याने पटकावली. मानाच्या टेनिसच्या ग्रँडस्लॅममध्ये त्याला तिसरी फेरी ओलांडता आलेली नाही. रॉजर फेडरर, इर्नेस्ट गुलबीस व स्टॅन वावरिंका या दिग्गज टेनिसपटूंना त्याने नमवण्याची करामत केली आहे. टेनिस कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी! या वर्षी, म्हणजे २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याला जेफ्री जॉन वोल्फकडून हार पत्करावी लागली. यानंतर त्याने व्यावसायिक टेनिसला अलविदा केला. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर त्याने टेनिस सोडण्याचा निर्णय घेतला.
सर्गेईची पत्नी रशियाची नागरिक आहे. दोघांना तीन मुलं आहेत. २०१४ पासून हे कुटुंब हंगेरीमधील बुडापेस्ट शहरात वास्तव्याला आहे. २०१८ पासून सर्गेई दारूच्या व्यवसायात आहे. त्याचा हा व्यवसाय हंगेरी, स्लोवाकिया आणि रुमानिया या देशांच्या सीमारेषांनजीक आहे. सर्गेई, त्याची पत्नी व मुलं हंगेरीमध्ये सुरक्षित व आनंदी जीवन जगत होते. सर्व सुरळीत असतानाच त्याने युक्रेनसाठी रशियाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला पत्नीचा विरोध होता, पण सर्गेई आपल्या मतावर ठाम राहिला. एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना तो म्हणाला, ‘‘माझी क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द मी स्वतःच घडवली. युक्रेन सरकार किंवा संबंधितांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, पण म्हणून मी देशासाठी काहीही करायचे नाही, असे नाही. या भूमीवर माझे पूर्वज जन्मले आहेत. माझाही येथेच जन्म झाला. रशिया युक्रेनला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास मी माझ्या मुलांना काय सांगणार? वडील, आजोबा यांचा जन्म ज्या देशात झाला तो देशच अस्तित्वात नाही, ही बाब वेदना देणारी आहे. याचमुळे पत्नीचा विरोध असूनही मी युक्रेनसाठी लढायला सज्ज झालो आहे.’’ सध्या सर्गेई किव येथे आहे. रस्त्यांवर कोणतीही युद्धजन्य परिस्थिती नाही. त्यामुळे सुरक्षित आहे. अर्थात हवाई हल्ला झाल्यास परिस्थिती बदलू शकते, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे. सर्गेई आता कुटुंबाला सोडून युक्रेनमध्ये आला आहे. त्याला कुटुंबाची काळजी भेडसावते आहे. युक्रेनमधील नागरिकांकडून त्याला लढण्याची प्रेरणा मिळाली. तिथला प्रत्येक नागरिक रशियाशी लढण्यास सज्ज आहे, हे पाहूनच प्रोत्साहन मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.