esakal | ‘नाम’मुद्रा : पर्यावरण चळवळीचा राजकीय चेहरा I German Politics
sakal

बोलून बातमी शोधा

Analina Barebok

‘नाम’मुद्रा : पर्यावरण चळवळीचा राजकीय चेहरा

sakal_logo
By
जयवंत चव्हाण

जर्मनीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १६ वर्षे सत्ताधीश असलेल्या ॲंजेला मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनला मागे टाकत सोशल डेमोक्रॅट पक्षाने निसटता विजय मिळवला आहे. पण सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना मदत लागणार आहेच. यंदा तेथील पर्यावरणवादी ग्रीन पक्षानेही बऱ्यापैकी मते घेतलेली आहेत. त्यामुळे आता ग्रीन पक्षाच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. मर्केल यांची जागा घेण्यासाठी ग्रीन पक्षाने निवडणूक प्रचारात बरीच कंबर कसली होती. ॲनालिना बेअरबॉक यांना ग्रीन पक्षाने चॅन्सलर पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी जगाचे लक्षही वेधून घेतले होते. बेअरबॉक २०१३ पासून जर्मन पार्लमेंटमध्ये निवडून येत आहेत. २००९ पासून त्या ग्रीन पक्षाच्या सदस्य आहेत; काही वर्षे त्या पक्षाच्या कौन्सिलवरही होत्या.

लहानपणापासूनच ॲनालिना पर्यावरण चळवळीत सक्रीय होत्या. ग्रीन पक्षाच्या अणू उर्जेविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शाळेत असताना खेळांमध्ये त्यांना जास्त रुची होती. हॅम्बर्ग विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र आणि सार्वजनिक कायदे यांचा अभ्यास केला आहे. नंतर काही काळ पत्रकारिताही केली आहे. शिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अभ्यास केला.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, २००५ च्या सुमारास त्यांनी ‘ग्रीन’च्या कामाला सुरुवात केली. २००८ मध्ये पक्षाच्या कार्यकारी समितीवर नियुक्त झाल्या. संसदीय पक्षाच्या आंतरराष्ट्रीय आणि सुरक्षा धोरणांच्या सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. शिवाय, ग्रीन पक्षाच्या प्रवक्तेपदावर काही काळ काम केले. जागतिक आर्थिक परिषदेच्या कामातही त्यांचा सहभाग होता. २०१३ ला पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या पार्लमेंटच्या सदस्य झाल्या. त्यांच्या कामाचा वेग प्रचंड आहे. पार्लमेंटच्या युरोपीय व्यवहार, ऊर्जा, आर्थिक व्यवहार समितीवर त्या सदस्य होत्या. वातावरण धोरणाबाबत त्या कायमच ठाम भूमिका घेत असतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलाच्या अनेक परिषदांमध्ये त्या सहभागी होत असत. त्याचबरोबर अनेक राजकीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. जर्मनीतील अनेक निवडणुकांमध्ये तसेच पक्षाच्या पातळीवरही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असे.

पक्षाच्या २०१८ च्या बैठकीत ॲनालिना यांना पक्षात महत्त्वाचे स्थान मिळाले. तेव्हा त्यांना ६४ टक्के, तर नंतरच्या २०१९ च्या पक्षांतर्गत निवडणुकीत ९७ टक्के मते मिळाली. ग्रीन पक्षाचे नेते रॉबर्ट हाबेक यांच्या समकक्ष नेत्या त्या बनल्या. याचमुळे यंदाच्या निवडणुकीत चॅन्सेलर पदाच्या उमेदवार म्हणून पक्षाने बेअरबॉक यांचे नाव जाहीर केले. विशेष म्हणजे परंपरेला छेद देत प्रथमच पक्षाने एकाच उमेदवाराचे नाव या पदासाठी पुढे केले. चाळीस वर्षीय ॲनालिना यांनी नंतर चॅन्सेलर पदासाठी झंझावाती प्रचार केला. ॲनालिना यांच्या प्रचारात कायम पर्यावरण, हवामान बदल असे मुद्दे होते. प्रचारात नेहमीप्रमाणे अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले. तरीही लोकांना ग्रीन पक्षाचे मुद्दे भावले.

कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करणे, पर्यावरणपूरक वाहनांची सक्ती असे अनेक मुद्दे त्या मांडत असतात. हवामान धोरण हे आर्थिक धोरणाशी सुसंगतच हवे, यावर त्यांचा कायम भर असतो. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अनेक बाबींचा ॲनालिना यांचा विशेष अभ्यास आहे. जर्मनीसाठी त्यांनी अनेक उद्दिष्टे निश्चित केली आहेत. मात्र सध्याच्या स्थितीत ती किती तडीस जातील, हे पाहावे लागेल. आता नव्या सरकारमध्ये ग्रीन पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सध्या तिथे राजकारणात रंगत आहे. पण सत्तास्थापनेनंतरच चित्र स्पष्ट होईल.

loading image
go to top