‘नाम’मुद्रा : साहित्यातून सत्याचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anita Desai
‘नाम’मुद्रा : साहित्यातून सत्याचा शोध

‘नाम’मुद्रा : साहित्यातून सत्याचा शोध

sakal_logo
By
जयवंत चव्हाण

प्रसिद्ध कादंबरीकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अनिता देसाई यांच्या गाजलेल्या ‘इन कस्टडी’ कादंबरीवर सिनेमा आला होता. १९८४ मध्ये ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या कथेतील नायक देवेन उर्दू कवी नूर यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांना भेटतो. अनेक प्रयत्नांनंतर शेवटी कवी नूर मुलाखतीसाठी तयार होतात. तेव्हा ते म्हणतात, तू माझी मुलाखत लिहून घेणार का... आता तर कॅसेट प्लेअरचा जमाना आहे. कोण वाचतो, सगळे पाहतात आणि ऐकतात. तेव्हा तू रेकॉर्ड कर... कथानायक देवेन मग आर्थिक स्थिती नसताना कसाबसा कॅसेट प्लेअर मिळवतो आणि अनेक दिवस नूर यांच्याशी बोलून मुलाखत रेकॉर्ड करतो. पण रेकॉर्ड करणाऱ्याला ते तंत्र काही जमत नाही आणि मुलाखत चांगली रेकॉर्ड होत नाही. अखेर नूर यांची प्रकृती बिघडते आणि त्यातच त्यांचे निधन होते... अशी ही कथा. अनिता देसाई यांनी तत्कालीन काळात हे लिहिले होते.

आता मोबाईलच्या काळात वाचनाकडे दुर्लक्ष होत असताना, सकारात्मक बाब म्हणजे अनिता देसाई यांना नुकताच ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’तर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.  त्यांच्या साहित्य कारकिर्दीवर पुन्हा एकदा मानाची मोहोर उमटली आहे. अनिता देसाई सध्या ८४ वर्षांच्या आहेत. १९३७ ला मसुरी येथे त्यांचा जन्म झाला. आई जर्मन आणि वडील बंगाली अशा वातावरणात त्या वाढल्याने त्यांना जर्मन, बंगाली, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या मजुमदार. शाळेत गेल्यावरच त्या  इंग्रजी शिकल्या. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. विसाव्या वर्षी त्यांची पहिली लघुकथा प्रसिद्ध झाली. स्वातंत्र्यानंतरचा तो काळ होता. तेव्हा इंग्रजी भाषा संपणार आहे... आता ब्रिटिश गेले. त्यामुळे कशाला इंग्रजीतून शिकायचे आणि लिहायचे, असे अनेक सल्ले त्यांना मिळाले. मात्र, इंग्रजीत त्यांना रस निर्माण झाला आणि त्यातच त्यांनी लिखाण करण्याचे ठरविले. त्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी ‘क्राय द पीकॉक’ ही पहिली कांदबरी लिहिली. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील महिलांचे प्रश्न त्यांनी मांडले होते. त्यापूर्वी  त्यांनी ‘रायटर्स वर्कशॉप’ नावाची एक प्रकाशन संस्थाही  स्थापन केली होती. दरम्यान अश्विन देसाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

८० च्या सुमारास त्यांनी ‘क्लिअर लाईट ऑफ द डे’ ही कादंबरी लिहिली. विशेष म्हणजे, ती त्यांच्याच जीवनावर आधारित होती. या कादंबरीला बुकर नामांकन मिळाले. नंतर १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इन कस्टडी’ तर ‘फास्टिंग फिस्टिंग’ कादंबरीला १९९९ साली बुकर नामांकन मिळाले होते. या कादंबरीने देसाई यांना अफाट लोकप्रियता मिळाली. ‘झिगझॅग वे’, ‘द आर्टिस्ट ऑफ डिसअॅपिअरन्स’ यांनाही मोठी लोकप्रियता मिळाली. ‘मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थे’त त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले. शिवाय माऊंट होलयो कॉलेज, बरुच कॉलेज, स्मिथ कॉलेजमध्येही त्यांनी अध्यापन केले. विविध साहित्यिक संस्थांवर त्या कार्यरत आहेत. रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट ॲण्ड लेटर्सच्याही त्या सदस्य आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्याचा गौरव झाला आहे. देसाई यांच्या लेखनात विविध संस्कृतींचे दर्शन होते. ‘माझ्यासाठी लेखन प्रक्रिया ही एक अनुभव, एक विचार असतो. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यात असतो’ असे त्या सांगतात. विशेष म्हणजे आपल्या मुलीला, किरण देसाई यांनाही त्यांनी साहित्याचे बाळकडू दिले. किरण यांना २००६ चा बुकर पुरस्कार मिळाला.

अलिबागजवळ थळ येथे मुलांनी अनिता देसाई यांना सुटीसाठी नेले होते, तेव्हा त्यांनी ‘द व्हिलेज बाय सी’ ही कादंबरी लिहिली होती. त्यासाठी त्यांना ‘गार्डियन चिल्ड्न्स फिक्शन प्राईज’ मिळाले होते. ‘फायर ऑन माऊंटन’साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच २००७ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली होती. सरकारने ‘पद्मभूषण’ने त्यांना गौरविले. कादंबरी, लघुकथा आणि बाल साहित्य अशा विविध प्रांतांत त्यांनी मुशाफिरी केली. सत्याचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.

loading image
go to top