‘नाम’मुद्रा : सर्जनशील ‘संवादक’

पराग अग्रवाल हे तसे ट्विटरमध्ये आणि ट्विटरबाहेरही अनेकांना फारसे परिचित नाव नाही. गेली दहा वर्षे ते ट्विटवरमध्ये काम करीत आहेत.
Parag Agarwal
Parag AgarwalSakal

ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल नियुक्तीनंतर लगेचच एका जुन्या ट्विटवरून वादात सापडले. असे वाद ट्विटरसाठी नवे नाहीत. भविष्यात असे अनेक वाद सोडवत किंवा अंगावर घेत पराग यांना ट्विटरला नव्या उंचीवर न्यायचे आहे. यासाठी ते नक्कीच सज्ज असावेत. मुक्त आणि चांगला संवाद घडवणे हा ट्विटरचा मुख्य उद्देश आहे, असे एका मुलाखतीत पराग यांनी म्हटले, पण मग अपमाहितीचे काय असा प्रश्न पडतो. हानिकारक ठरणारी चुकीची माहिती टाळणे हाही त्यांचा प्रयत्न आहे. माहितीच्या महाजालात ही अपमाहिती ओळखणे महाकठीण आहे, असेही मत ते मांडतात. पण तरीही चांगल्या संवादासाठी आग्रही राहण्यावर ते ठाम आहेत.

पराग अग्रवाल हे तसे ट्विटरमध्ये आणि ट्विटरबाहेरही अनेकांना फारसे परिचित नाव नाही. गेली दहा वर्षे ते ट्विटवरमध्ये काम करीत आहेत. मूळचे मुंबईचे निवासी. राजस्थानच्या अजमेरमध्ये त्यांचा जन्म झाला. वडील अणुऊर्जा विभागात असल्याने नंतर ते मुंबईत आले. ‘अॅटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांची आई ‘व्हीजेटीआय’मध्ये प्राध्यापक होती. लहानपणापासूनच पराग अभ्यासात हुशार. वेगाने प्रश्न सोडवणे आणि कल्पनाशक्तीचा योग्य वापर यामुळे शाळेत ते शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते.

शाळेत असतानाच भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पराग यांनी सुवर्णपदक मिळवले. संगणकशास्त्र अभियांत्रिकीची पदवी त्यांनी आयआयटी मुंबई येथून घेतली. आयआयटीमध्ये असतानाच त्यांची दोन नामांकित कंपन्यांमध्ये निवडही झाली होती, पण पराग यांनी मात्र पुढील शिक्षणाची कास धरली. सहा परदेशी विद्यापीठांमध्ये त्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यापैकी पाच विद्यापीठांनी त्यांची निवड केली. पराग यांनी मात्र अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाची निवड केली आणि संगणकशास्त्रातून पीएच.डी. घेतली. संगणक आणि कारबाबत पराग यांना लहानपणापासूनच रुची होती. त्यामुळे प्रवासात असताना पराग कायम या विषयांवरची मासिके, पुस्तके वाचण्यास प्राधान्य देतात.

मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि ‘याहू’मध्ये काही काळ काम केल्यानंतर २०११ मध्ये पराग ट्विटरमध्ये आले. एक अभियंता म्हणून नोकरीस लागलेल्या पराग यांनी ट्विटरमध्ये वेगवान प्रगती केली. अल्पावधीत ते वरिष्ठ पदावर गेले. नुकतेच पायउतार झालेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनीही पराग यांच्यातील गुण हेरले. पराग तेव्हा कंपनीच्या जाहिरात उत्पादनांवर काम करत होते. त्यांच्या यूजर टार्गेटेड जाहिरात तंत्रामुळे भारावलेल्या डोर्सी यांनी त्यांची नियुक्ती मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदावर केली. मग पराग यांनी कंपनीतील अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले. पासवर्ड सुरक्षेचा मुद्दा त्यांनी हाताळला. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा समाज माध्यमांसाठी खुले आणि विकेंद्रित धोरण आखले. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून अग्रवाल यांच्या विविध प्रकल्पांपैकी ब्लूस्काय हा महत्त्वाचा प्रकल्प होता.

ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी अॅमेझॉन आणि गुगलप्रमाणे ट्विटरनेही अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर स्वतःचे सर्व्हर वापरण्यास सुरुवात केली. तेव्हा काही वेळा लोक चर्चा करायचे... ट्विटरचा प्रभाव कमी आहे... पराग यांना ही टीका जिव्हारी लागायची; पण ती नकारात्मक न घेता हेच आपले आव्हान आहे, असे मानून त्यांनी तांत्रिक क्रांती घडवून ट्विटरला उंचीवर नेले. त्यामुळेच डोर्सी यांनी पराग यांचे वर्णन करताना उत्सुक, चौकस, तर्कशुद्ध, सर्जनशील, जागरूक आणि नम्र अशी अनेक विशेषणे वापरली आहेत. म्हणूनच पराग अग्रवाल यांची या कंपनीच्या प्रमुखपदी निवड केल्याचे डोर्सी म्हणतात. कोणतीही कंपनी कायम संस्थापकाच्या प्रभावाखाली असू नये, ती तिच्या पायावर उभी राहावी, असे त्यांचे मत आहे. त्यासाठीच पराग अग्रवाल यांच्या हातात त्यांनी सूत्रे दिली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com