‘नाम’मुद्रा : स्वप्न साकारण्याचा आत्मविश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Shekhar Sharma
‘नाम’मुद्रा : स्वप्न साकारण्याचा आत्मविश्वास

‘नाम’मुद्रा : स्वप्न साकारण्याचा आत्मविश्वास

अलिगडजवळच्या लहान गावातून, हरदुआगंजमधून विजय शेखर शर्मा दिल्लीत आले. त्यांचे वडील शालेय शिक्षक होते. शर्मांच्या कुटुंबात अनेक जण शिक्षक आहेत. एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या कुटुंबाप्रमाणेच ते होते. विजय शेखर यांचे शालेय शिक्षण हिंदीतून झाले. नंतर दिल्लीतल्या महाविद्यालयातून इंजिनियरिंग केले. त्यापूर्वी त्यांनी इंजिनियरिंगची इंटरमिजिएट परीक्षा वयाच्या चौदाव्या वर्षीच उत्तीर्ण केली होती. शालेय शिक्षण हिंदीतून झाल्यामुळे इंग्रजीचा प्रश्न बिकट असल्याने त्यांनी त्यावर प्रचंड मेहनत घेतली. इंग्रजीतून हिंदीत भाषांतर झालेली पुस्तके ते वाचत. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दोन्ही पुस्तके एकाच वेळी वाचनाचा हा अनोखा फंडा होता. शिवाय रॉक गाणी ऐकूनही त्यांनी इंग्रजी आत्मसात केली. हे विजय शेखर म्हणजे सध्या सर्वतोमुखी नाव असलेल्या पेटीएम कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी.

४३ वर्षीय विजय शेखर यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण सुरू असताना कंपनी सुरू केली होती. इंजिनियरिंगनंतर त्यांनी अशाच प्रकारची काही कामे केली; पण उत्पन्न जेमतेम दहा हजारांच्या आसपास मिळत राहिले. एवढ्याशा पगारात लग्न कसे होणार? वडीलही म्हणाले, की त्यापेक्षा एखादी नोकरी कर, त्यात तीस हजार पगार मिळाला तरी खूप झाले. पण विजय शेखर यांना व्यवसायच करायचा होता. शर्मांच्या गावात मात्र ज्याला नोकरी मिळत नाही, काही जमत नाही, तो व्यवसायाकडे वळतो, अशी मानसिकता होती. त्यामुळे याला काही करता येणार नाही, अशी कुटुंबाची धारणा झाली होती. स्थापन केलेली कंपनी विजय शेखर यांनी दोन वर्षांनी दहा लाख डॉलरला विकली. नंतर २००० मध्ये त्यांनी ‘वन ९७ कम्युनिकेशन’ ही कंपनी स्थापन केली.

मोबाईलवर बातम्या, क्रिकेट स्कोअर, जोक्स, रिंगटोन पाठवण्याचे काम ही कंपनी करत असे. त्यांनी २०१० मध्ये पेटीएमची स्थापना केली. सुरुवातीला पेटीएमची फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र, २०१६ ला नोटाबंदी झाल्यानंतर पेटीएमचे ग्राहक एकदम वाढले आणि ती फॉर्मात आली. पेटीएमचे ४० कोटी ग्राहक आहेत, दररोज २५ कोटी व्यवहार त्यावरून होतात. या कंपनीत वॉरन बफे, अलिबाबा, सॉफ्टबॅंक यांनीही रस घेतला. विजय शेखर काय काम करतात, हे त्यांच्या आई-वडिलांना कळत नव्हते. पेपरमध्ये आलेली बातमी वाचून त्यांच्या आईने एकदा विचारलेही, एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे?

कधी काळी दहा हजारांचे उत्पन्न असणारे विजय शेखर आता अब्जावधीत खेळताहेत. २०१७ मध्ये त्यांना फोर्ब्जने तरुण अब्जाधीश म्हणून गौरविले होते. त्याच वर्षी जगातील प्रभावशाली शंभर व्यक्तींमध्येही ‘टाइम’ साप्ताहिकाने त्यांना स्थान दिले होते. नुकताच त्यांनी शेअर बाजारात सर्वाधिक मोठा आयपीओ आणला. मात्र कंपनीच्या नफा, भविष्यकालीन योजनांबाबत शंका असल्याने तो आपटला. पण विजय शेखर निराश झालेले नाहीत. त्यांना कंपनीबाबत आत्मविश्वास आहे. कंपनी विस्ताराच्या अनेक योजना आहेत, असे ते सांगतात. त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना एलन मस्क यांचे उदाहरण देऊन भविष्यकालीन संधींसाठी सज्ज राहण्याचा आत्मविश्वास दिला. त्यांना भविष्यात पेटीएमचा विस्तार करायचा आहे. तंत्रज्ञानाचे फायदे समजायला वेळ लागतो, असेही ते म्हणतात. स्वप्न पाहणे हे बंधन आहे आणि ते सत्यात उतरवणे हा खरा जीवनाचा आनंद आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण आणि अपार कष्ट घ्यायची तयारी पाहिजे, हे विजय शेखर यांचे ब्रीद.

loading image
go to top