विशीतील बंडखोर नायक

संजय जाधव
रविवार, 23 जून 2019

हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग.

हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची सरकारला जनमताच्या रेट्यामुळे अखेर लवकर सुटका करावी लागली. 

हाँगकाँगमधील सध्या सुरू असलेल्या निदर्शनामागे कारण आहे वादग्रस्त विधेयक. या विधेयकामुळे हाँगकाँगमधून गुन्हेगारांचे थेट चीनमध्ये प्रत्यार्पण करणे शक्‍य होणार आहे. याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, लाखो लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत. चीनची वाढती पोलादी पकड येथील जनतेला नको आहे. हाँगकाँगमधील शांततापूर्ण नागरी आंदोलनाचा जोशुआ ‘पोस्टर बॉय’ बनला आहे. पहिल्यांदा तो २०१४ मध्ये आंदोलनात नेता बनला, तेव्हा त्याचे वय होते १७ वर्षे. त्या वेळी मुक्त वातावरणात निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी दोन महिने आंदोलकांनी शहरातील रस्ते ठप्प केले होते. जोशुआ याचा मार्ग आहे नागरी कायदेभंगाचा. त्या वेळी झालेल्या आंदोलनासाठी सुनावलेल्या दोन महिन्यांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच सरकारने त्याची मुक्तता केली. मुक्तता झाल्यानंतर तो थेट आंदोलकांमध्ये पोचला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांच्या राजीनाम्याची मागणी त्याने केली. आंदोलनाबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘मी आणि हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी संपूर्ण तरुण पिढी सामान्य नागरिकांपासून बंडखोर बनविली याचा मला आनंद आहे. याची किंमत कॅरी लॅम आणि चीनला मोजावी लागेल.’’ 

जोशुआ हा मध्यमवर्गीय ख्रिश्‍चन कुटुंबातील. लहानपणीच तो गतिमंद असल्याचे निदान झाले. यावर मात करीत त्याने नेतृत्व आणि संभाषण कौशल्ये विकसित केली. हाँगकाँग आणि चीनशी जोडल्या जाणाऱ्या अतिवेगवान लोहमार्गाला त्याने वयाच्या १३ व्या वर्षी विरोध केला. चीनधार्जिणा राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रम रद्द करावा, या मागणीसाठीही तो आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरला होता आणि हे आंदोलन यशस्वी ठरले. त्याची आंदोलनाची पद्धती हाँगकाँगवासीयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अंगीकारली. याआधी अनेक वेळी शांततापूर्ण मोर्चे काढून सरकार दखल घेत नव्हते. जोशुआ याने अहिंसक नागरी कायदेभंग करीत रस्ते ताब्यात घेण्याच्या आंदोलनाची दिशा दाखविली. या आंदोलनामुळे सरकारला शरण येण्याखेरीज पर्यायच राहत नसल्याचे चित्र आहे. 

जोशुआ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डेमोसिस्टो हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. तो या पक्षाचा सरचिटणीस आहे. सध्या त्यांची मागणी चीनपासून स्वातंत्र्य ही नसून, अधिक स्वयंनिर्णयाचा अधिकार ही आहे. त्याच्या मागण्या या अतिशय रास्त आहेत. हाँगकाँगची लोकसंख्या सत्तर लाख असून, वीस लाख लोक निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत. यावरून या आंदोलनाची तीव्रता लक्षात यावी. चीन सरकारच्या दबावतंत्राला झुगारून नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी लोकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याबद्दल जनतेत नाराजी आहे. ब्रिटनने १८४२ मध्ये युद्धानंतर हाँगकाँग ताब्यात घेतले. ब्रिटनने १९९७ मध्ये ते चीनच्या हवाली सोपविले. त्या वेळी हा देश ५० वर्षे स्वतःचा कारभार स्वतः पाहील हा निर्णय झाला होता. मात्र, २०४७ पर्यंत चीन प्रतीक्षा करण्यास तयार नसल्याचे दिसते. हाँगकाँग हातातून पूर्ण निसटण्याआधी तो ताब्यात घेण्याचा चीन सरकारचा प्रयत्न आहे. 

जगातील प्रभावी नेत्यांमध्ये समावेश 
जोशुआ २२ वर्षांचा असून, त्याचे नाव अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. टाइम नियतकालिकाने २०१४ मध्ये सर्वांत प्रभावशाली मुलांमध्ये त्याचा समावेश केला. तसेच, २०१४ मध्ये ‘पर्सन ऑफ द इयर’साठी त्याचे नामांकन झाले होते. फॉर्च्युन नियतकालिकाने तर त्याला जगभरातील आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थान दिले. त्याचे २०१७ मध्ये शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठीही नामांकन झाले होते. अगदी त्याच्यावर नेटफ्लिक्‍सने ‘टीनएज व्हर्सेस सुपरपॉवर’ हा माहितीपटही प्रदर्शित केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joshua Wong Hong Kong student activist