जगाच्या पटावर नात्यांचा कॅलिडोस्कोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगाच्या पटावर नात्यांचा कॅलिडोस्कोप

वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यांचे वेगळे पदर मांडणारा ‘हिज फादर्स व्हॉईस’ हा चित्रपट इंग्रजीसह तब्बल दहा जागतिक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘कावडी प्रॉडक्‍शन’ बॅनरच्या या चित्रपटाची निर्मिती अश्‍विनी प्रतापराव पवार यांनी केली आहे. कार्तिकेयन किरूभाकरन हे दिग्दर्शक व लेखक आहेत.

जगाच्या पटावर नात्यांचा कॅलिडोस्कोप

वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यांचे वेगळे पदर मांडणारा ‘हिज फादर्स व्हॉईस’ हा चित्रपट इंग्रजीसह तब्बल दहा जागतिक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘कावडी प्रॉडक्‍शन’ बॅनरच्या या चित्रपटाची निर्मिती अश्‍विनी प्रतापराव पवार यांनी केली आहे. कार्तिकेयन किरूभाकरन हे दिग्दर्शक व लेखक आहेत.

जागतिक पातळीवरची गोष्ट मांडणारा; पण तरीही सच्च्या नात्याचा कॅलिडोस्कोप असणारा हा चित्रपट ‘विमिओ’ या डिजिटल प्लॅटफॉर्म (Vimeo-on Demand, Digital Platform) वर पाहता येईल. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर हॉलिवूडमध्ये झाला. त्यानंतर क्वालालम्पूर आणि चेन्नईत झाला. आता या चित्रपटाचा प्रीमियर पुण्यातील नॅशनल फिल्म अर्काईव्हच्या ऑडिटोरियममध्ये येत्या रविवारी (ता.११) होणार आहे. यानिमित्ताने स्नेहल सांबरे यांनी चित्रपटाच्या निर्मात्या व अभिनेत्री अश्‍विनी पवार आणि लेखक-दिग्दर्शक कार्तिकेयन किरूभाकरन यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्‍न - हा चित्रपट जागतिक पातळीवरची गोष्ट सांगत असला, तरी भारतीय संस्कृती हा या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. या दोन गोष्टींचा मेळ घालावा, असं का वाटलं?
कार्तिकेयन - जगात कुठंही गेलं तरी नात्यांचे ताळमेळ तेच असतात. भारतीय संस्कृती व नृत्य जगात आपली छाप पाडतेच. मी स्वत- या संस्कृतीच्या खूपच जवळ असल्यानं ही कथा जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला.

तुमच्या मनातली ही कल्पना पडद्यावर उतरवताना भारताची आणि त्यातही दक्षिण भारताची निवड केली आणि स्थानिक नृत्य, संगीत, चित्र हे एकत्रितपणे मांडलंत. या साऱ्यांच्या तयारीत किती काळ गेला?
कार्तिकेयन - हे सर्व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कलाकार, लोकेशन व नियोजन करण्यात साधारण सात-आठ महिने लागले. 

ही मेहनत पडद्यावर दिसते आहेच. दक्षिण भारताचं सौंदर्य छान पद्धतीनं मांडलंय तुम्ही. त्या सुंदर दृश्‍यांबरोबर कानावर पडणारं संगीतही स्थानिक आणि खूप गोड, तरीही ते जागतिक पातळीवरचं वाटतं, ही किमया कशी काय साधलीत?
कार्तिकेयन - याचं श्रेय संगीतकार वेदांत भारद्वाजला द्यायला पाहिजे. तो आमच्यासोबत सुरवातीपासूनच होता. संगीताचा योग्य वापर कुठं, केव्हा करायचा, याची त्याला उत्तम जाण आहे. त्यामुळे या चित्रपटाला उंचीवर नेण्यात यश आलं. 

हा चित्रपट वडील आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल बोलतो. या नात्याला भावनिकतेचे वेगवेगळे पदर आहेत. हे सारे एकत्र आणताना काय अडचणी आल्या?
कार्तिकेयन - तुम्ही म्हणता तसा हा सिनेमा भावनिक गुंतागुंत मांडतो. पण, इथं मी दिग्दर्शकाची भूमिका न सोडता तिथंच थांबलो, हे सिनेमासाठी महत्त्वाचं आहे. कोणत्याही नात्याच्या सुसंवादासाठी ते आवश्‍यक ठरतं.

या चित्रपटातली नृत्ये उत्कृष्ट झाली आहेत. या कलाकारांना भरतनाट्यम शिकवण्यासाठी फार वेळ द्यावा लागला असेल?
कार्तिकेयन - नृत्यात शरीर व मन दोन्ही एकत्रच आणावं लागतं. चित्रपटातील कलाकार मुळातच उत्तम नर्तक आहेतच. परंतु, ते उत्तम अभिनेतेही आहेत, हेच या चित्रपटानं सिद्ध केलं. 

तुमच्या मनात ही कथा अनेक दिवसांपासून घोळत होती, हे तुम्ही सांगितलंच; पण ती मनात नेमकी आली कशामुळे?
कार्तिकेयन - आई-वडिलांमध्ये जे गैरसमज होतात त्याचा मुलांवर कसा परिणाम होतो, हे बघताना मला प्रश्‍न पडला- प्रेमाची व्याख्या काय आहे? नवरा-बायकोनं एकमेकांवर निखळ प्रेम करणं व समजून घेणं, हे महत्त्वाचं आहे. कारण, प्रेम ही खऱ्या अर्थानं देण्याची गोष्ट आहे. कसलीही अपेक्षा न करता ते फक्त देत राहायला हवं. प्रेमात अपेक्षा ठेवणं उपयोगी नाही. समजूतदारपणाही हवाच. हे सगळं माझ्या मनात साचत गेलं; मग ते असं पडद्यावर अवतरलं.

या चित्रपटात एक मराठमोळं गाणं आहे, त्याचं काही खास कारण? 
कार्तिकेयन - भारतीय संस्कृतीला अनेकविध पदर आहेत. वेगवेगळ्या भाषा, सणवार आहेत. ते मांडण्यासाठीच हे गाणं आहे. नीता पाटील यांच्यात दडलेली कवयित्री या गाण्याच्या निमित्तानं बाहेर आली. दोन पिढ्यांच्या मातृत्वाची भूमिका मांडणारं हे गाणं आमच्या संगीतकारालाही खूप आवडलं. त्यानं ते बिंदूमालिनीकडून अशा पद्धतीनं गाऊन घेतलंय, की त्यामुळे कोणत्याही आईच्या हृदयाची तार छेडली जाईल. संगीताला भाषेचा अडसर कधीच नसतो, हेच हे गाणं सिद्ध करेल.

हा चित्रपट पडद्यावर खूप छान दिसलाय. रंगसंगती, लोकेशन्स फार छान पद्धतीनं आलेत यात, हे कसं शक्‍य झालं?
कार्तिकेयन - चित्रपट पडद्यावर चांगला दिसण्यासाठी त्यात एकजिनसीपणा असणं आवश्‍यक असतं आणि यामध्ये मदत झाली अश्‍विनीची. ती स्वत-च कलाकार असल्यानं तिनं लोकेशन्स, कलाकाराची वेशभूषा, पर्यावरण याकडे बारकाईनं लक्ष दिलं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात एकाही ओळीचं डबिंग नाही. सारे खरेखुरे आवाजच यात आहेत. 

‘हिज फादर्स व्हॉईस’ चित्रपट रसिकांना मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार? 
कार्तिकेयन - कधीही. रसिक म्हणतील तेव्हा त्यांना तो थिएटरमध्ये पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी त्यांना एक गोष्ट करावी लागेल. या सिनेमासाठी आम्ही बनवलेल्या फेसबुक पेजवर साइनअप करावं लागेल. (http://eepurl.com/gx2KKv) भारतातल्या कोणत्याही शहरात आम्ही याचा शो आयोजित करू. अट मात्र तीच असेल. ज्यांना तो ऑनलाइन पाहायचाय त्यांना तो ‘विमियो’वर उपलब्ध आहेच. (http://www.vimeo.com/ondemand/hisfathersvoice)

तिहेरी कसरत - अश्‍विनी पवार 
प्रश्‍न - निर्माता म्हणून आणि अभिनेत्री म्हणूनही तुमचा हा पहिलाच प्रयत्न. पण, तो पहिला वाटू नये इतका चांगला झाला आहे. पण, तुम्हाला यातलं जास्त आव्हानात्मक काय वाटलं, अभिनय की निर्मिती?
अश्विनी पवार - माझा हा पहिलाच प्रयत्न चांगला झाला असेल, तर त्याला कारण आमचे दिग्दर्शक. त्यांनी माझ्यातली अभिनेत्री आणि निर्माती म्हणून माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवला. चित्रपटाचं प्री-प्रॉडक्‍शन आणि पोस्ट प्रॉडक्‍शन हे फारच वेळ घेणारं आणि मेहनतीचं काम होतं. चित्रीकरण संपल्यानंतर माझ्या मनात अभिनय आणि प्रोफेशनल कलाकारांबद्दल आदर अधिकच वाढला. माझ्यासाठी निर्माती, अभिनेत्री आणि एक पत्नी म्हणून तिहेरी कसरत होती. दिग्दर्शकाला मोकळेपणा देणं व त्यांच्याकडून अधिकाधिक चांगलं काम होईल हे पाहणं, हे या तिन्ही भूमिकांमध्ये आवश्‍यक होतं.

येत्या रविवारी पुण्यात प्रीमियर
‘हिज फादर्स व्हॉईस’ या चित्रपटाचा प्रीमियर येत्या रविवारी (ता. ११) पुण्यातील लॉ कॉलेजसमोरील नॅशनल फिल्म अर्काईव्हच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी १०.४५ वा. होईल. प्रथम येणाऱ्या अडीचशे प्रेक्षकांना या चित्रपटाचा शो मोफत पाहता येईल.

Movie Website
www.hisfathersvoice.film 
Vimeo-on-demand
http://www.vimeo.com/ondemand/hisfathersvoice 
Sigh In To Facebook page
http://eepurl.com/gx2KKv 
Subscribe to Youtube channel
http://www.youtube.com/c/HisFathersVoiceTheFilm