‘ऑस्कर’चा आनंद वेगळाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Award

ऑस्कर पारितोषिकांची बातमी ऐकल्यानंतर विशेष आनंद याकरिता झाला, की एम. एम. किरवानी हे मानकरी ठरले आहेत. ते माझे आवडते संगीतकार. आमची वैयक्तिक ओळखही आहे.

‘ऑस्कर’चा आनंद वेगळाच!

ऑस्कर पारितोषिकांची बातमी ऐकल्यानंतर विशेष आनंद याकरिता झाला, की एम. एम. किरवानी हे मानकरी ठरले आहेत. ते माझे आवडते संगीतकार. आमची वैयक्तिक ओळखही आहे. काही दिवसांवपूर्वी जेव्हा ‘बाहुबली’ चित्रपट मराठीमध्ये डब केला, तेव्हा संगीताची जबाबदारी माझ्यावर होती. त्या वेळी किरवानींनी मला भेटायला बोलवले होते. तेव्हा ते ‘आर.आर.आर.’चे संगीत करत होते. मला हे जाणून आनंद झाला, की किरवानींना मराठी संगीताबद्दल प्रचंड आकर्षण आहे.

मी ज्या दिवशी त्यांना भेटायला गेलो, त्या दिवशी त्यांनी मला ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘तुला पहिले मी नदीच्या किनारी’, ‘लाभले अम्हांस भाग्य’ ही तीन गाणी गाऊन दाखवली. म्हणून त्यांच्या ऑस्कर जिंकण्याने मला वैयक्तिक आनंद झाला आहे. हा विजय भारतीय संगीतासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने फायद्याचा आहे. आपण जे मराठी चित्रपट करतो, ते फक्त मराठी लोकांनीच पाहिले पाहिजेत असे नाही. मराठी भाषेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय चित्रपट करतोय. आपण हिंदी चित्रपट करतो तो फक्त हिंदी भाषिकांसाठीच असा विचार करायला नको. एस. एस. राजमौलींसारखे चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी हे फार मनावर घेतले आहे. विशेषतः ‘आर.आर.आर.’ला ऑस्कर मिळणे जास्त चांगले; कारण ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी प्रॉडक्शन हे बाहेरचे होते.

एका आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची दखल घेतली जाणे म्हणजेच भारतीय चित्रपट आणि संगीत वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचणेे. यामुळे आर्थिक परिणामसुद्धा भारतीय चित्रपटसृष्टीवर होईल. आर्थिक पर्यावरण मिळणे हेसुद्धा फार गरजेचे असते. संगीतातून गोष्ट सांगण्याची आपली परंपरा आहे. त्याबद्दल एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान असायलाच हवा. गाण्यातून गोष्ट सांगण्याच्या या समृद्ध परंपरेची लोक दखल घ्यायला लागले आहेत. आपण जसे पाश्चिमात्य गोष्टी इंटरनेटमुळे जाणू लागलो, तसे तेही आता भारतीय गोष्टी समजून घेत आहेत.

आधुनिकीकरण ही एकेकाळी पाश्चात्य देशातून पूर्वेकडे येणारी गोष्ट होती; पण आता दोन्ही बाजूंनी दळणवळण सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’साठीसुद्धा ऑस्कर मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या टीमचेसुद्धा अभिनंदन! मराठी गाण्यांना किंवा चित्रपटांना ऑस्कर मिळत नाही म्हणून आपण मागे पडलोय, असा विचार आपण करायला नको. चित्रपट लोकांपर्यंत पोहचतो की नाही हे महत्त्वाचे. आपण उत्तम कथा सांगतोय. ऑस्कर ॲवॉर्ड ही फक्त गुणवत्तेची पावती नसून ती लोकप्रियतेची पावती आहे. लोकप्रियतेसाठीदेखील बऱ्याचशा गोष्टी आवश्यक असतात.

तेलुगू लोक चित्रपटगृहात जाऊन, पैसे खर्च करून चित्रपट बघतात. चित्रपटांचे एक पर्यावरण तयार होते, ते मराठीत झाले की मग ऑस्करपर्यंत पोहोचणे सहजशक्य आहे. चित्रपट ही जेवढी कला आहे, तेवढाच तो व्यवसायही आहे. बरेच लोक हे म्हणतील, की ‘नाटू नाटू’ हे किरवानींचे किंवा ‘जय हो’ हे ए. आर. रेहमानचे सर्वोत्कृष्ट गाणे नाही. सर्वोत्कृष्ट गाण्यालाच ॲवॉर्ड मिळेल असे नसते. आम्ही तुमची दखल घेतो याची ती पावती असते. त्यामध्ये तेलुगू माणसांचा मिळालेला सपोर्टसुद्धा आहे. या सर्व गोष्टींना मिळालेले ते ॲवॉर्ड आहे. या सर्व गोष्टी मराठी माणसांनीसुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. ‘बाहुबली’सारखा चित्रपट करण्याचे धैर्य तेलुगूत करू शकतात. कारण त्यांना खात्री असते, की लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतील. आपल्याकडेसुद्धा ही सवय होत आहे. ‘सैराट’सारखे चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. जे लोकप्रिय नाही, तेसुद्धा करण्याचे धारिष्ट्य आपल्या लोकांमध्ये आहे.

वेगवेगळ्या कथा सांगणे, ऑफबिट विषय घेणे, लोक येतील की नाही याचा विचार न करता सिनेमे बनवणे याची आपल्याकडे परंपरा आहे. शास्त्रीय संगीतावरचा ‘मी वसंतराव’ किंवा ‘बालगंधर्व’सारखे चित्रपट हिंदीत फार कमी आढळतील. त्यामुळे मराठी लोकांनी हे सुरू ठेवावे. आता मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांपुरते मर्यादित न राहता इतर लोकांनाही आकर्षित करीत आहेत. अनेक पाश्चिमात्त्य पुरस्कार सोहळ्यांत मराठी चित्रपट जातात. त्यांना सन्मान मिळतो. मराठी चित्रपट कमी पडतो आहे, असे समजू नये. माझी आणि किरवानींची मैत्री झाली, कारण त्यांनी मराठी संगीत ऐकले. तेलुगू गाण्याला मिळालेल्या ऑस्करचा फायदा हा भारतातील मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपटांना होणारच आहे.

(शब्दांकन - संयुक्ता सातपुते)