‘विक्रमी’ धावेचे इंगित काय?

Srinivasa Gowda
Srinivasa Gowda

नुकतीच बातमी आली होती, की कर्नाटकातील ऐकलाच्या कंबाला शर्यतीत, २८ वर्षांच्या श्रीनिवास गौडाने जागतिक विक्रमवीर उसेन बोल्टच्या १०० मीटर धावण्याच्या विक्रमापेक्षाही सरस कामगिरी केली. दोन म्हशींना ताब्यात ठेवून १४२.५ मी. अंतर धावण्याची ही शर्यत. विजय मिळवताना गौडाने १३.६२ सेकंद एवढी वेळ नोंदवली, म्हणजे त्याने शंभर मी. अंतर केवळ ९.५५ सेकंदांत कापले होते. म्हणून त्याची कामगिरी हा जागतिक विक्रमच होता, असे बातमीत म्हटले होते. दोन दिवसांनी बातमी आली, की निशांत शेट्टी या तरुणाने वेनुर येथील कंबालला शर्यतीतच गौडाचा विक्रमही मागे टाकला. त्याने १०० मी.चे अंतर ९.५१ सेकंदांत पार केल्याचे बातमीत म्हटले होते. म्हणजे लागोपाठ दोनदा भारतात जागतिक विक्रमाहून सरस कामगिरी नोंदली गेली.

तसे पाहिल्यास ही बाब अभिमानास्पद म्हणायला हवी. पण... त्याआधी अनेक बाबींचा विचार करावा लागतो. ऑलिंपिकमधील शर्यत ही स्टेडियममध्ये सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावपट्टीवर) होते. ते अंतर काटेकोरपणे आणि वेळ अगदी अद्ययावत तंत्राने मोजलेली असते. त्यामुळे तेथील कामगिरीबाबत काही प्रश्‍नच निर्माण होत नाही. पण कंबाला शर्यतीची गोष्ट वेगळी आहे. त्या या हंगामात कर्नाटकाच्या वेगवेगळ्या गावांमध्ये होतात. भाताच्या खाचरांतून चिखलपाण्यातून स्पर्धकांना धावायचे असते. स्पर्धेचे चित्रण पाहिले तर आपल्याला दिसते, की चक्क चिखलपाणी उडत आहे; म्हशींबरोबर गौडा आणि (दुसऱ्या चित्रणामध्ये) शेट्टी धावत आहेत. म्हणजे यात म्हशींच्या वेगाचाही प्रश्‍न आहे.

स्पर्धेतील मेख
तांत्रिक बाबींविषयी सांगायचे, तर आयोजक के. गुणपाल कदंब यांनी सांगितले, की स्पर्धेचा शेवट आणि वेळ आम्ही अगदी लेझर तंत्राने घेतली; पण यातली मेख अशी, की ते पुढे म्हणतात ः स्पर्धा सुरू होण्याच्या जागी मात्र अशी काही व्यवस्था शक्‍य नव्हती. अर्थातच ही वेळ संशयास्पद मानता येते. ते पुढे सांगतात, की गौडा गेली दहा वर्षे कंबाला ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहे ते ठीक आहे. त्याला त्या प्रशिक्षणाचा फायदा नक्कीच झाला असणार. शिवाय म्हशींना काबूत ठेवून चिखलातून धावायचे त्याचे तंत्रही कौतुकास्पदच आहे. गौडा म्हणतो, की ऑलिंपिकमध्ये लोक चौड्यांवर, टोजवर, भर देऊन धावतात; पण आम्ही येथे टाचांवर भर देऊन धावतो. आता विचार करा, पाहिजे तर प्रयत्न करून बघा. असे धावणे कितपत वेगामध्ये करता येईल? तेही चिखलपाण्यातून. चिखलातून साधे चालणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. म्हशींबरोबर राहायचे म्हणून तो टाचांचा वापर करत असेल. मग वेगाने घसरत जात असेल, असे म्हणावे तर चित्रणात तो धावतानाच दिसतो. (चांगला उतार नसेल तर घसरण्याचा वेग तसा कमीच असतो. येथे तर भातखाचरातच ही शर्यत. म्हणजे उताराचा प्रश्‍नच नाही.)

कुणीही सांगेल, की चिखलातून धावायला प्रयास जास्त पडतात. पण त्यामुळे त्याने पायाचे स्नायू बळकट होतात, म्हणून काही खेळांसाठी चिखलातून किंवा वाळूतून धावायचा सराव करून घेतात. तेथे पायाची ताकद वाढवायची असते. वेगाचा प्रश्‍न नसतो. मुळात आपल्याकडे ऑलिंपिक वा जागतिक विक्रमांविषयी फारशी माहिती नसते. त्यामुळे असे विक्रम केल्याचा वा विक्रम करण्याचा प्रयत्न होणार असल्याच्या बातम्या येतात. गंमत अशी, की हे विक्रमवीर खऱ्या जिल्हा वा राज्य पातळीवरील स्पर्धा शर्यतींमध्येही दिसत नाहीत. असे का? त्यामुळे हे सारे केवळ प्रसिद्धीपोटी तर केले जात नाही ना, असा प्रश्‍न पडतो.

गौडाबाबत शशी थरूर, आनंद महिंद्र अशा लोकांनी त्याला उत्तेजन, प्रशिक्षण द्यावे असे सुचवले, (खरे तर २८ व्या वर्षी धावपटू निवृत्तीच्या गोष्टी करतात), तर केंद्रीय क्रीडामंत्री रिजिजू यांनी त्याची चाचणी साईच्या बेंगळुरू येथील केंद्रात घेण्यात येईल, असे म्हटले आहे. त्या केंद्राने गौडाला आम्ही रेल्वेचे तिकीट पाठवले आहे, तो सोमवारी येथे पोचेल. दोन दिवस त्याला स्थिरस्थावर होण्यासाठी देऊन नंतर त्याची चाचणी घेऊ, असे जाहीर केले. हे चांगलेच आहे. मात्र तो सोमवार (९ फेब्रुवारी) होऊनही चार दिवस झाले. गौडा तेथे गेला की नाही, काहीच बातमी नाही. त्याने ‘तूर्त मी जाणार नाही,’ असे म्हटल्याचीही वार्ता आहे. एकूणच खरे काय खोटे काय, हेच उमगत नाही.

पैशांच्या व्यवहाराबाबत लोकांनी अर्थसाक्षर व्हायला पाहिजे असे म्हटले जाते, तसेच आता आपल्या लोकांनी खऱ्या अर्थाने ‘क्रीडा साक्षर’ व्हायला हवे, हेच खरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com