गणित विषय आमच्या आवडीचा!

केतकी जोशी
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?’, अशी बालगीते आपल्याकडे लिहिली जातात. कोणी म्हणेल, त्याकडे गमतीचा भाग म्हणून पाहा. ते मान्यच आहे, तरीसुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा हा, की एकूणच गणिताविषयीचे मनातील अपसमज त्यामुळे आणखी घट्ट होतात.

‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?’, अशी बालगीते आपल्याकडे लिहिली जातात. कोणी म्हणेल, त्याकडे गमतीचा भाग म्हणून पाहा. ते मान्यच आहे, तरीसुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा हा, की एकूणच गणिताविषयीचे मनातील अपसमज त्यामुळे आणखी घट्ट होतात. दुसरे म्हणजे गणिताविषयीची नावड निर्माण होईल, अशा पद्धतीने आपल्याकडे शिकविले जाते का, याचाही विचार करायला हवा. त्यामुळेच बाल व युवकमित्रांबरोबर संवाद साधताना मी गणिताविषयी काही सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. लहानपणी गणिताचा पेपर म्हटला की हमखास या गाण्याचा विचार यायचा आणि परीक्षेपासून पळ काढण्याची वेगवेगळी कारणे शोधली जायची. याचे कारण गणित म्हणजे पाढे, आकडेमोड, सूत्र, अवघड परीक्षा असे समीकरण आपल्या मनात घट्ट बसलेले असते.नकळतपणे तो आपला प्रांतच नाही, असेही वाटत असते. 

सध्याच्या जगात अनेकांना गणिताबद्दलची भीती आढळून येते. याची काही कारणे अशी असू शकतात की, गणित सोडवल्यावर येणारे उत्तर हे पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक असल्यामुळे गणित सोडवताना वाटणारी भीती, गणित शिकताना असणारा मजेचा अभाव तसेच आपलं नेहमीचं आयुष्य आणि गणित हे दोन्ही पूर्ण वेगळं आहे असं वाटणं. खरे तर निसर्गातील प्रत्येक गोष्टीत गणित आढळून येते. याबाबत महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी असे म्हटले आहे की, ‘Mathematics is the cradle of all creations and that the laws of nature are written in the language of mathematics‘.  निसर्गाचे नियम गणिताच्या भाषेत लिहिले जातात. म्हणजेच विश्वातील प्रत्येक गोष्ट ही गणिताच्या नियमांनी बांधली गेलेली आहे. अंतरिक्षातील ग्रहताऱ्यांपासून अणुरेणूंपर्यंत प्रत्येक समतोल गणितातील अचूकतेनेच साधला गेलेला आहे.

निसर्गात सगळीकडे गणित दिसून येते. फुलांच्या पाकळ्यांची संख्या, त्यांमधील सममिती, मधमाश्‍यांच्या पोळ्याची तसेच समुद्रातील शंख शिंपल्यांची भौमितिक रचना, पक्ष्यांच्या घरट्यांची रचना याचबरोबर निसर्गाच्या ऋतुचक्रातदेखील गणिती पॅटर्न आढळून येतो. खरेतर प्रत्येक व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत नकळतपणे गणिताचा आधार घेत असते. स्वयंपाकघरात कोणतेही पदार्थ तयार करताना त्यात लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण, रहदारीतून चालताना व गाडी चालवताना लागणारा वाहनांच्या वेगाचा अचूक गणिती अंदाज आपण नकळतपणे बांधतच असतो. संगीत, वाद्ये अशा कोणत्याही कलांमध्ये असलेली स्वररचना म्हणजे गणितातील कॉम्बिनॅटरिक्‍स (combinatorics) ही संकल्पना! कोणत्याही खेळामध्ये उत्तमता येण्यासाठी मैदानाचे स्वरूप, खेळाडूंच्या क्षमता या व अशा माहितीचे विश्‍लेषण यासाठी संख्याशास्त्र लागते. एवढेच नाही तर दुसऱ्याशी बोलताना समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज हादेखील गणितानेच बांधला जातो. शेतकरी, व्यापारी, डॉक्‍टर, लष्कर, इंजिनिअर्स, आर्किटेक्‍टस व अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गणिताचा वापर होतो. मग जे आपल्या अवघ्या जीवनाला व्यापून राहिले आहे, त्या गणिताची भीती का? गणित ही केवळ आकडेमोड नव्हे. लहानपणापासून संकल्पना समजून न घेता गणिताची पद्धत, रीत समजून घेण्यावर भर दिला जातो. म्हणूनच विद्यार्थी गणित विषयाचा त्यांच्या खऱ्या जीवनाशी संबंध लावू शकत नाहीत. तार्किक क्षमता, सर्जनशीलता, कारणमीमांसा, अमूर्त विचार यांचा विकास गणिताने होतो. खेळ, कोडी यांच्या माध्यमातून लहानपणीच मुलांना आपण गणिताची गोडी लावू शकतो. भौमितिक प्रतिकृतींमधून गणिताच्या काही संकल्पना मुलांना समजणे सोपे जाऊ शकते. नेहमीच्या वापरातील वस्तूंच्या लांबी- रुंदीच्या मोजमापातून घनफळ, पृष्ठफळ, क्षेत्रफळ या संकल्पना सहज समजू शकतात व एकक परिमाण यांचा अंदाज येऊ शकतो. तसेच नफा, तोटा, व्यापार यांच्या संकल्पना खऱ्या व्यवहारांमधून मुलांना अधिक स्पष्ट होऊ शकतात. 

गणितातील एखाद्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत अनेक बाजूंनी कसे पोचता येऊ शकते, हे बुद्धिबळ या खेळाद्वारे मुलांना समजू शकते व यातून मुलांचा तर्कविचार विकसित होऊ शकतो. अशाप्रकारे आपल्या नेहमीच्या आयुष्यात इतक्‍या सहजतेने आपण गणिताशी जोडले गेले आहोत, याची जाणीव मुलांना करून दिली की आपोआपच गणित विषयाची भीती जाऊन त्याची आवड मुलांमध्ये निर्माण होईल आणि गणिताचा पेपर कधी एकदा येतो आणि मी तो सोडवितो किंवा सोडविते, अशी इच्छा होईल. हे होणे आवश्‍यक आहे, याचे कारण समाजाच्या विकासाचे ‘गणित’ही त्यावर अवलंबून आहे, असे मला वाटते.

(लेखिका गणिताचे अध्यापन करतात)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ketki joshi article writes math

टॅग्स