गांधीविचारांचा नंदादीप

गांधीविचारांचे बोट धरून आपापल्या क्षेत्रात फारसा गाजावाजा न करता काम करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची फळी देशात अजूनही आहे.
ilaben bhat
ilaben bhatsakal
Summary

गांधीविचारांचे बोट धरून आपापल्या क्षेत्रात फारसा गाजावाजा न करता काम करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची फळी देशात अजूनही आहे.

गांधीविचारांच्या प्रकाशात अथक सामाजिक कार्य करणाऱ्या इला भट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या समर्पित कार्याची नोंद.

गांधीविचारांचे बोट धरून आपापल्या क्षेत्रात फारसा गाजावाजा न करता काम करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची फळी देशात अजूनही आहे. यात आपल्या कामाने गांधी विचारांचा नंदादीप शांतपणे तेवत ठेवणाऱ्या इला भट यांचा समावेश होतो. गांधी विचारशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांचे स्थान अंमळ वरचे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीत ‘अमे पार करीशू’ हे त्यांनीच शब्दबद्ध केलेले गीत गाणाऱ्या ‘सेवा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. हे स्फूर्तिगान ‘सेवा’ संघटनेचे जणू आत्मगानच.

जगातील सर्व जटिल समस्यांवर गांधी विचारांवर आधारित सोपे उत्तर उपलब्ध आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास. विचारांचा हा साधेपणा राहणीमानात झिरपला तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हे सौंदर्य त्यांच्या जगण्या-वागण्यात पदोपदी दिसायचे. त्यांच्या साध्या घरातील एका खोलीत तबलाही होता. दररोज किमान दोन तास शास्त्रीय गायनाचा रियाझ त्या करायच्या. योगाभ्यास हाही त्‍यांच्या नित्यकर्माचा भाग होता. विधी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदाबाद या आपल्या कर्मभूमीत १९५५मध्ये त्यांनी वस्त्रोद्योग कामगार संघटनेत काम सुरू केले. ही संघटनाही गांधी विचारांची प्रेरणा घेऊन अस्तित्वात आलेली तेव्हाची सगळ्यात जुनी संघटना.

असंघटितांसाठी काम

गांधी विचारांवर चालणारी ‘सेवा’ ही असंघटित कामगारांच्या हक्कांसाठीची संघटना १९७२ मध्ये त्यांनी सुरू केली आणि तीच पुढे त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय ओळख ठरली. ही संघटना त्यांनी स्थापन केली तेव्हा जवळपास नव्वद टक्के कामगार असंघटित या कोष्टकात गणले जायचे. कामगारांना आणि विशेषतः महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्यादृष्टीने त्यांनी सहकारी बँकेची स्थापना केली. या बँकेमार्फत महिलांना लघुकर्जे देण्यास सुरवात झाली. पुढे त्या ‘वुमन्स वर्ल्ड बँकिंग’ या ‘मायक्रो फायनान्स’ क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेच्या सहसंस्थापक झाल्या. ऐंशीच्या दशकात चार वर्षे त्या या संघटनेच्या अध्यक्ष होत्या. या साऱ्या वाटचालीत आपल्या कृतीमधून त्यांनी गांधी विचारांना कुठेही धक्का लागू दिला नाही, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल.

सन २०१४ मध्ये केंद्र सरकारने पथरीवाल्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कायदा केला. ते ‘सेवा’ या त्यांच्या संघटनेने केलेल्या पाठपुराव्याचे फलित होते. याचा लाभ पुढे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरिबांना झाला. निम्मे जग असलेल्या महिला आपल्या कर्तृत्वाला पुरेशा गांभीर्याने बघत नाहीत ही त्यांची खंत होती. ‘सेवा’ संघटनेच्या अलीकडेच झालेल्या अर्धशतकी महोत्सवात बोलताना ही भावना त्यांनी बोलून दाखवली होती. या निम्म्या जगाकडे दुर्लक्ष करून प्रगतिपथावर आपली दमदार पावले पडणार नाहीत, असे त्यांनी ठासून सांगितले. महिला या नेत्या नाहीत, हे तर सोडाच आपल्याला कामगार म्हणूनही ओळखले जात नाही, अशी खंतही बोलून दाखवली.

विनम्र भूमिका

व्रतस्थ अशा या जीवनप्रवासात त्यांना विविध सन्मानांनी गौरविण्यात आले. पद्‍मश्री, पद्‍मभूषण, मॅगसेसे तसेच फ्रान्स सरकारच्या पुरस्कारासह न्य पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. परंतु, हा आपल्या कर्तृत्वाचा नव्हे तर गांधी विचारांच्या मार्गाने जाणाऱ्या माझ्यासारख्या लाखो महिलांचा सन्मान आहे, अशी त्यांची विनम्र भूमिका राहिली. महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक सहिष्णू आहेत, त्या बचत करून पै-पै गाठीशी बांधतात, त्या सामुदायिक शक्तीच्या मूलाधार असल्याने महिलांना सशक्त करण्यासाठी सहकाराचा विचार घेत पुढे जायला हवे, असा मंत्र त्यांनी दिला होता. धोरणकर्त्यांनी हा विचार पुढे नेत तो प्रत्यक्षात आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com