
देवडोह, देवनदी, देवकुंड असो नाहीतर देवराई- त्यांचा आणि जनजीवनाचा, निसर्ग संवर्धनाचा निकटचा संबंध आहे. आख्यायिका आणि प्रथांनी माणूस त्याच्याशी जोडला जाऊन, त्यांना वेगळे स्थान आहे.
निसर्गाशी नाते सांगणारे देवडोह
- प्रा. किशोर सस्ते
देवडोह, देवनदी, देवकुंड असो नाहीतर देवराई- त्यांचा आणि जनजीवनाचा, निसर्ग संवर्धनाचा निकटचा संबंध आहे. आख्यायिका आणि प्रथांनी माणूस त्याच्याशी जोडला जाऊन, त्यांना वेगळे स्थान आहे. तथापि, विकासाचा वरंवटा आणि प्रदूषण यामुळे हे वैभव नामशेष होऊ लागले आहे.
देवडोह म्हणजे नदीतील एक खोलगट जागा असते, देवासाठी राखून ठेवलेले डोह म्हणून ‘देवडोह’ असे नाव पडले आहे. येथे मासेमारी करत नाहीत. दुष्काळामध्येही देवडोहांचे पाणी आटत नाही, असे म्हणतात. कोकणातील काही देवडोहांमधल्या माशांना ‘देवाचे बाल’ म्हणजे देवाचे बाळ असे म्हणतात. जंगलामध्ये देवराईमध्ये जसं वेगळेपण आणि वैविध्य असतं त्याचप्रमाणे या डोहांमध्ये देखील जैवविविधतेबरोबरच पाण्यात औषधी गुणधर्म असतात. जस देवराई मध्ये वृक्ष तोडीस बंदी असते, तशीच देवडोहात मासेमारीस बंदी असते.
भिवाई, कुंडाई, मळगंगा, ओझराई, तिळसेश्वर ही नावं तिळसा माशावरून पडली आहेत. महादेव, दर्याबाई, कडजाई, गिरजाई या जलदेवता देवडोहांचं संरक्षण करतात, अशी श्रद्धा आहे. देवडोहांवरील जत्रा, आख्यायिका यात्रा आणि उत्सवांद्वारे मनुष्य हा नदी, नाले, तळी आणि कुंड यांच्याशी जोडला जातो. साहजिकच तो जलस्त्रोतांचे आणि माशांचे संगोपन आणि संवर्धन करतो.
डोहसंपन्न पुणे
पुणे जिल्ह्यात असे अनेक देवडोह आहेत. उदा. होळकर डोह, जेजुरी. खेड तालुक्यातील भिमा नदीत सर्वात जास्त डोह आहेत. गडद नारायण डोह, काहूगाव. वृंदावन डोह, दोंदे. पिंपळ डोह, कोयाळी. मढेश्वर डोह, मोहकळ. तिफणवाडी आणि गोरेगावचा बांध, उंबर डोह, कडधे. वालड, निमगाव आणि शिरोली येथील डोह, सुरकुंडीचा धाम, महादेव डोह, चांडोली, वेताळे आणि पांगारी. कळंबेश्वर येथील निरा नदीवरील भिवाई डोह, ओझरे येथील ओझराई देवीचा डोह. इंद्रायणी नदीमध्ये कुंडाई देवी मंदिर परिसरातील कुंडमळा, जेथे रांजण खळगे आहेत. चिंचवड येथील पवना नदीवरचा मोरया गोसावी देवडोह इत्यादी.
प्रथांचे कोंदण
पुणे जिल्ह्यात देवडोहांच्या अनेक प्रथा आहेत. नीरा नदीच्या कडेला असलेल्या भिलाई देवी मंदिराशेजारी जो डोह आहे, तेथे लग्न ठरल्यावर लग्नाच्या आधी नवरा किंवा नवरीला लाकडाच्या तेंच्यावर बसवून देवडोहातून पलीकडे देवीच्या दर्शनासाठी नेले जाते. जुन्नर तालुक्यात चिल्हेवाडी धरण परिसरात महादेव कोळी बांधवांची दर्याबाई नावाची देवी आहे. तेथेच मांडवा नदीवर हाळवंडीचा डोह आहे. या डोहात आंघोळ केली की खरुज आणि नायटा बरा होतो, अशी श्रद्धा आहे. अशा ठिकाणी गंधकाचे प्रमाण जास्त असते. माघ पौर्णिमेस देवीचा भक्त डोहात आंघोळ करतो. देव अंगात संचारल्यावर तो देवीचे दर्शन घेऊन जमिनीत नैवेद्याच्या दिशेने डोळ्यांच्या दगड-गोट्यातून धावत जातो. जेथे नैवेद्य पुरला आहे ती जागा उकरतो. ज्या बाजूने नैवेद्य खराब झाला आहे, त्या दिशेला दुष्काळासारखी नैसर्गिक संकटे येतात, असे म्हणतात.
देवमासा देहूमधल्या संत तुकारामांच्या अभंग गाथांचा स्पर्श झाल्यावर निर्माण झाला आहे, अशी आख्यायिका आहे. या डोहाला ‘आनंद डोह’ किंवा ‘माशांचा डोह’ असे देखील म्हणतात. या माशाला नाकाला नथनी आहे, पण ही नथनी म्हणजे प्राणीशास्त्र भाषेत ‘बारबेल्स’ आहेत. देवमासा किंवा महाशीर मासा हा वारकरी संप्रदायाशी इतका समरस झाला आहे की माशांचे वर्णन, स्थलांतर आणि प्रत्येक हालचालीवर त्याने मौखिक ओव्या रचल्या आहेत.
तुकारामाच्या गाथा तरल्या डोहाला सोन्याची नथनी इंद्रावणीच्या माशाला
आपण ज्यावेळी आळंदीला जाऊ त्यावेळेस माशाला काहीतरी पंचपक्वान्न घेऊन जाऊ म्हणून पुढील ओवीत माशांचे संगोपन आणि संवर्धन दिसते.
पंढरीपासुनी जातो आळंदी देशाला साखरीचं लाडु इंद्रावनीच्या माशाला
आळंदीमध्ये भगवान विष्णूंनी चक्रासुराचा वध केला. त्यामुळे त्या नदीतील डोहास चक्रतीर्थ असे म्हणतात. तेथे सर्व लोक अस्थी विसर्जन करतात. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात ‘हे असे नित्य साक्षी अस्थी नासती उदकी’. देहूवरून निघालेला देवमासा चक्रतीर्थ येथे येऊन, मत्स्यतीर्थाला भेट देऊन परत देहूला जातो, अशी आख्यायिका आहे. या दोन्ही तीर्थांचा उल्लेख स्कंद पुराणात आहे.
देहूचा मासा आळंदीला जातो कसा साधुचा नेम तसा
माशापासून मिळणारी उत्पादने घेण्यासाठी काही रुढी आणि परंपरा होत्या. उदा. अहिर मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो औषधी चिकट द्रव बाहेर टाकतो. भोई समाजातील बांधव फक्त शनिवारीच हा मासा पकडायचे आणि त्याची माफी मागून, डोक्याला शेंदूर लावून पुजा करायचे. चिकट द्रव घेतल्यानंतर परत हा मासा सोडून दिला जायचा. परंतु आज हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पुणे जिल्ह्यातील काही देवडोहातील माशांच्या आख्यायिका देखील आहेत. अशीच कथा पुणे जिल्ह्यातील राहू पिंपळगाव येथील वावस माशाची आहे. एकदा सीता नदीमध्ये आंघोळ करत असताना हा मासा सीतामाईच्या पायाला चावला आणि त्याच्या तोंडात राहिलेल्या मांसाचे लोण्याच्या गोळ्यात रूपांतर झाले, अशी आख्यायिका आहे. रांजणखळगे असणाऱ्या प्रत्येक देवडोहात स्वयंपाकासाठी भांडी निघत होती, अशी देखील आख्यायिका आहे.
देवडोह, देवनदी, देवकुंड आणि झरे ही पर्यावरण संरक्षणाची संकल्पना आजकाल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तीर्थांच्या ठिकाणी केवळ प्रदूषण आणि अर्थमाहात्म्य वाढत आहे. देवडोहांवरील श्रद्धा नामशेष झालेली असून, विकास कामांमुळे आणि प्रदुषणामुळे बरेच डोह नामशेष झालेले आहेत. देवडोह येथे माशांचे प्रजनन होते. देवडोहांवर आजपर्यंत कोणतंही संशोधन झालेले नाही. अनेक डोहांमधले मासे प्रदुषणाला बळी पडत आहेत. काही मासे हे येथील प्रदेशनिष्ठ मासे आहेत, त्यांची प्राणीशास्त्रीय ओळख पटवून संगोपन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.
(लेखक देवराई अभ्यासक आणि जैवविविधतातज्ज्ञ आहेत.)