esakal | बदलती गावे : उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचे बेट
sakal

बोलून बातमी शोधा

बदलती गावे : उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचे बेट

बदलती गावे : उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचे बेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डेरवण म्हटले, की तेथील शिवसृष्टी ही पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरली आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठीचे कोकणातील हे अत्याधुनिक केंद्रही बनले आहे. डेरवणचा चेहरामोहरा बदलला आहे. कोकणातील माळरानावरील दुर्गम खेडे ते १९९६मध्ये रुग्णालय सुरू झाल्यानंतरचे रूप, हा प्रवास कमालीचा लक्ष वेधून घेणारा आहे. दिगंबरदास महाराज यांचे स्वप्न अशोक जोशी उर्फ काका महाराज यांनी प्रत्यक्षात उतरवताना रग्णालय सुरू केले आणि आधुनिक सुखसोयी, तंत्रज्ञान आणि आरोग्य यंत्रणेने संपन्न असे डेरवण नावाचे बेटच बनले. उत्कृष्ट शैक्षणिक संकुल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण ही त्यावरील कडी.

‘भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर हॉस्पिटल’ अवघ्या २० खाटांसह सुरू करण्यात आले. अगदी प्रारंभीपासूनच तेथे सीटीस्कॅन, एक्स-रे आणि सोनोग्राफी तपासणीच्या सुविधा होत्या. सर्प, विंचूदंशाचे रुग्ण येत असल्याने डायलिसिस युनिटही होते. पाठोपाठ पॅथॉलॉजी लॅबही सुरू झाली. १९९८पासून वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर तेथे येऊ लागले. कर्करोगावरील उपचारांसाठी नावाजलेले डॉ. बाणावली त्यांच्या पथकासह येथे उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी यायला लागले आणि येथील माहिती सर्वत्र पोहोचू लागली. सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदानच ठरले आहे. १९९६ पासून हॉस्पिटलने वेगवेगळी शिबिरे सुरू केली. त्यातून कुपोषणाचा प्रश्न समोर आला. प्रसूती विभागात प्रथमपासून मोफत सेवा दिली जात होती. त्यापुढे जाऊन बाळांची देखभाल, त्यांच्यावर विशेष उपचार सुरू झाले. आजूबाजूच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दातांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेण्यात आली. त्या माध्यमातून हजारो शाळकरी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयामधून विद्यार्थी उच्च शिक्षणही घेत आहेत.२००३ पासून ‘टाटा’बरोबर हॉस्पिटलने कर्करोगावरील उपचारासाठी प्रकल्प सुरू केला. मुख, स्तन व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांवर मोफत उपचार करण्यात आले. कर्करोगावरील उपचारासाठी पूर्णवेळ सर्जन तसेच मेडिकल आँकोलॉजिस्ट नेमले. २०१४ पासून देशभरातील ग्रामीण भागातील डॉक्टर येथे शिकायला येऊ लागले. डॉ. अनिल काकोडकर यांच्या पुढाकाराने संशोधनासाठी सल्लागार समितीने डेरवणच्या क्षमतेची चाचणी घेतली आणि दिशा दिली.

‘मेट्रोनॉमिक्स केमोथेरपी’ ही अत्यंत कमी खर्चात उपचाराची पद्धत येथेच विकसित झाली, असे डॉ. बाणावली आग्रहाने नमूद करतात. म्हणूनच उत्कृष्ट वैद्यकीयसेवा ही डेरवणची नाममुद्रा ठरली आहे. त्यामुळेच येथील शिक्षणाचाही विकास झाला. येथे शाळांत प्रवेशासाठी पालक विशेष पसंती देत आहेत. हजारावर विद्यार्थी या परिसरात शिक्षण घेत आहेत. त्यांच्याभोवती फिरणाऱ्या अर्थकारणाने डेरवणचे रुपडे बदलले आहे. याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंगच्या ५ शाखा, पदव्युत्तर अभ्यास, ओटी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन आणि दोन विषयांतील बीएस्सी अभ्यासक्रम तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे चार अभ्यासक्रम सुरू झाल्याने डेरवणची ओळखच बदलून गेली. हॉस्पिटल व या निमित्ताने येथे येणारे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सेमिनारसाठी येणारे परदेशी अभ्यासक, संशोधनासाठी येणारे दिग्गज, ‘रॉयल कॉलेज ऑफ इंग्लंड’कडून चालवली जाणारी स्किल लॅब व त्यासाठी भारतभरातून येणारी मुले यांसह परदेशातून येणारे डॉक्टर, या साऱ्यांनी हा परिसर गजबजून जातो. या जोडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे उभारले आहे. परदेशी स्पर्धांत भाग घेणारे खेळाडू येथे सरावाला येतात.

loading image
go to top