
संजय साताळकर
‘लबुबू’ या खेळण्याची मूळ संकल्पना ही २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘The Monsters’ या चित्रपुस्तकातील आहे. हाँगकाँगमधील प्रसिद्ध कलाकार कासिंग लुंग यांची ही निर्मिती होय. ‘नॉर्स’ या पौराणिक कथांवर आधारित एका छोट्याशा राक्षसासारख्या पात्राचे हे नाव होते ‘लाबुबू’, सुरुवातीला केवळ काही निवडक कलारसिकांपुरते मर्यादित होते. खरी क्रांती आली २०१९ मध्ये; जेव्हा चीनमधील ‘पॉपमार्ट’ या व्यावसायिक कंपनीने याचे हक्क विकत घेतले आणि अगदी व्यावसायिक पातळीवर त्याचा कायापालट घडवून आणला. या कंपनीने ‘ब्लाइंड बॉक्स’ ही संकल्पना बाजारात आणली. एखादी ‘लाबुबू फिगर’ (वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे उत्पादन) विकत घेताना ग्राहकाला नेमकी कुठली मिळणार आहे, हे ठरविता येत नाही. प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे ‘लाबुबू’ असतात.