एक जिवंत अन्‌ लोभस दंतकथा!

‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीप्रमाणे पुण्यातील ‘मराठवाडा मित्रमंडळ’ या शैक्षणिक संस्थेचा विशाल संसार निरपेक्ष वृत्तीने प्राचार्य भाऊसाहेब जाधव सांभाळत आहेत.
Bhausaheb jadhav
Bhausaheb jadhavsakal

‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीप्रमाणे पुण्यातील ‘मराठवाडा मित्रमंडळ’ या शैक्षणिक संस्थेचा विशाल संसार निरपेक्ष वृत्तीने प्राचार्य भाऊसाहेब जाधव सांभाळत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करणे सातत्याने चालू आहे. सामाजिक संस्थांशी नाते जोडणारे प्राचार्य जाधव आज (ता. दोन नोव्हेंबर) वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत.

पुण्यात आख्ख्या मराठवाड्यासाठी एक विशाल व सर्वार्थाने विस्तीर्ण असा वटवृक्ष गेली कित्येक दशके ताठपणे उभा आहे, ज्याच्या छायेत शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या प्रत्येक गरजू मुला- मुलीला सहजतेने आणि हक्काने मदतीसाठी जाता येते. हा कर्णाचा आधुनिक अवतार कुणालाही निराश करत नाही. तो काही कुबेर नाही, पण तरीही प्रत्येक विद्यार्थ्याची तो कशी मदत करू शकतो (तेही कोणतीही वाच्यता न करता) हे न उलगडणारे रहस्य आहे.

त्यामुळेच तो हयातीतच एक जिवंत दंतकथा झाला आहे. या जिवंत व लोभस दंतकथेचे नाव आहे प्राचार्य भाऊसाहेब जाधव! `तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता` या उक्तीप्रमाणे ‘मराठवाडा मित्र मंडळ’ या शैक्षणिक संस्थेचा विशाल संसार निरपेक्ष वृत्तीने ते सांभाळत आहेत. उद्याचे उत्तम विवेकी व विज्ञाननिष्ठ नागरिक घडविणारे भाऊसाहेब महाराष्ट्राचे भूषण आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

आपण ज्या क्षेत्रात काम करतो व जे पद भूषवितो त्याला तर शंभर नाही, दोनशे टक्के न्याय दिला पाहिजे आणि ज्यांच्यासाठी पद व अधिकार मिळाला आहे, त्यांची अहर्निश काळजी घेतली पाहिजे, हे मी प्रशासकीय सेवेत असताना, ज्यांना पाहून शिकलो आहे आणि माझ्यापरीने आचरण्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मोजक्या आदर्शांमध्ये भाऊसाहेब जाधव सर अग्रस्थानी आहेत. महात्मा गांधींनी विश्वस्तपणाची जी संकल्पना मांडली त्याचे भाऊसाहेब जाधव हे एक शैक्षणिक क्षेत्रातले आदर्श उदाहरण आहे.

त्यांचा एकही दिवस असा मावळला नसेल, ज्या दिवशी त्यांच्या हातून विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली नाही वा त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले नाही.लातूर भागातील दुष्काळी पट्ट्यात, जेथे रोज नव्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तेथे उच्च शिक्षण सोडा; पण साधे शालेय शिक्षण घेणे गरिबीमुळे जमत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः घेतला असल्याने त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत व मार्गदर्शन करणे निश्चित केले.

आव्हानात्मक काम

अवघ्या महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर काळातल्या सुरवातीच्या दशकात पुणे हाच उच्च शिक्षणाचा पडाव असायचा.मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा त्याला अपवाद नव्हता. पण पुण्यात राहण्याची सोय हा कळीचा प्रश्न असायचा. तो ओळखून शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आदी मराठवाड्याच्या दृष्ट्या नेत्यांनी आणि स. मा. गर्गे यांच्यासारख्या शिक्षणतज्ज्ञांनी, डॉ. माधवराव सूर्यवंशी, शिवाजीराव गणगे, अण्णासाहेब मुंगळे यांनी पुण्यात प्रथम ‘मराठवाडा सदन’ हे हॉस्टेल सुरू केले व त्यापाठोपाठ आर्किटेक्टचर कॉलेज सुरू करून शैक्षणिक संस्थांची ‘मराठवाडा मित्र मंडळ’ या नावाने मुहूर्तमेढ रोवली.

त्या काळात पुण्यात हडपसरच्या अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये विद्यार्थीप्रिय असणाऱे निष्णात प्राध्यापक भाऊसाहेब जाधव या हिऱ्यावर चव्हाण-गर्गे यांची रत्नपारखी नजर पडली आणि त्यांनी भाऊसाहेबांना संस्थेत आणून वाणिज्य महाविद्यालय स्थापन करण्याचे मोठे आव्हान असणारे काम सोपवले.बीएमसीसी परिसरात नवे कॉलेज स्थापून ते नावारूपास आणणे व प्रतिष्ठित करणे सोपे नव्हते.

पण जाधव सरांच्या जनसंवादी व विनयशील व्यक्तिमत्त्वाची जादू आणि काय करायचे याची पक्की जाणीव यामुळे अल्पावधीतच मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या अव्वल बनले आणि त्यांच्या भाग्यरेषेने शिक्षण क्षेत्रातली एक अदभुत दंतकथा लिहायला सुरुवात केली. भाऊसाहेबांना हे माहीत आहे की, मराठवाड्यातून आपली शैक्षणिक करिअर घडविण्यासाठी आलेला बहुसंख्य विद्यार्थी हा गरीब आहे, त्याला पुण्यात राहणे व शिकणे परवडणारे नसते.

पण उच्च शिक्षणाची तीव्र आस त्याला/तिला इथे घेऊन आलेली असते. अशांना हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून देणे, फी माफी किंवा कमी करणे, तीही सोयीच्या हप्त्याने भरण्याची सवलत देणे, अशा गोष्टींची फार आवश्यकता असते. एकीकडे विद्यार्थ्यांची नड भागवतानाच संस्थेची आर्थिक स्थितीही सक्षम राखणे हे दुहेरी आव्हान भाऊसाहेब पेलत राहिले.

सरांच्या मदत व प्रेमाचा परीसस्पर्श झालेले शेकडो विद्यार्थी आहेत. त्यातील अनेकजण माझे चांगले परिचित व मित्र आहेत. जाधव सर हे हाडाचे पुरोगामी, सेक्युलर, विवेकी आणि विज्ञाननिष्ठ आहेत. मुंबईच्या ‘हुंडाविरोधी चळवळी’चे मामा कुलकर्णी यांच्या कामाशी सरांनी जोडून घेतले. जनजागृती केली.

त्यांच्या दृष्टीने मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हाच सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे. मराठवाड्याची अभावग्रस्तता व मागासलेपणामुळे आलेल्या अवनत अवस्थेमुळे लख्खपणे झाली असणार. कारण शेती पिकत नाही आणि उद्योग व सेवाक्षेत्र अविकसित अशा मराठवाडा भागात जगण्यासाठी व परिस्थितीशी दोन हात करीत प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे भाऊसाहेबांचे मत भोगलेल्या परिस्थितीने बनले असणार.

विशेष नैपुण्यासह पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आणि प्राध्यापकाच्या करिअरमध्ये स्थिरावल्यावर त्यांची शैक्षणिक माध्यमातून समाजसेवा करण्याची उपजत प्रेरणा उफाळून आली असणार आणि मग एकदा वाणिज्य कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारल्यावर मग पुन्हा कधी त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नवतरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात ते आजही कार्यरत आहेत.

(लेखक माजी प्रशासकीय अधिकारी, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com