Cultural Entrepreneurship : उद्योजकतेचा सांस्कृतिक पैलू

सांस्कृतिक, कलाक्षेत्र याकडे एक उद्योग-व्यवसाय म्हणून पाहून ते उद्योगक्षेत्रात गणले जाऊ शकते
Entrepreneur
Entrepreneursakal

- ललितागौरी कुलकर्णी

‘सवाई गंधर्व महोत्सवा’पासून ‘वसंतोत्सव’, ‘विनोद दोशी नाट्यमहोत्सव’, नाट्य-नृत्य-काव्य संमेलने ते अगदी नाटक कंपनीतर्फे प्रायोगिक नाटके, अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची लोकप्रियता एआय, नेटफ्लिक्सच्या जमान्यातही टिकून आहे.

या वारशाशी जोडणारी एक नवीन संकल्पना म्हणजे सांस्कृतिक उद्योजकता. सांस्कृतिक, कलाक्षेत्र याकडे एक उद्योग-व्यवसाय म्हणून पाहून ते उद्योगक्षेत्रात गणले जाऊ शकते. हे कार्यक्रम बरेचदा देणगीदार, विश्वस्त यांच्यावर अवलंबून असतात.

त्याच्या आर्थिक उलाढालीवर लक्ष केंद्रित केले गेल्यास त्यांच्याकडे एक खास उद्योगक्षेत्र म्हणून विचार केला जाऊ शकतो. पॉल डिमॅगिओ यांनी १९८२ मध्ये ही संकल्पना मांडली. परंतु त्यानंतर जवळ जवळ २० वर्षांनी २००० च्या दशकापासून जगभरात सांस्कृतिक उद्योजकतेची ओळख वाढत आहे.

सांस्कृतिक उद्योजकता म्हणजे नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, पाककला इत्यादी सांस्कृतिक आणि सर्जनशील कलांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या लाभदायक असा व्यवसाय निर्माण करणे.

सांस्कृतिक मूल्यांबरोबरच आर्थिक महसूलही निर्माण करण्याची क्षमता सांस्कृतिक उद्योगात आहे. साधारणपणे कलेशी व्यवसायाचा काही संबंध नसावा,असे मानले जाते.परंतु.सांस्कृतिक उद्योगासाठीदेखील भांडवल लागते. ते गुंतवणारा उद्योजक लागतो.

आणि मग त्या भांडवलदाराला फायद्याची अपेक्षा असते. म्हणजे सांस्कृतिक उद्योगक्षेत्राकडे इतर उद्योगक्षेत्रांसारखेच पाहता येते. तरीदेखील तुलनेने सांस्कृतिक उद्योजक वेगळे असतात. त्यांचा मूळ उद्देश पैसे कमावणे नसून कलेला व्यासपीठ मिळावे, कलाकारांना मोबदला मिळावा, यासाठी तो व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सबळ असावा हा असतो.

अनेक देश सांस्कृतिक उद्योजकता, कलेची निर्यात यांचा वापर ‘मृदू मुत्सद्दीपणाचे धोरण’ म्हणून करत आहेत. उदा. दक्षिण कोरियाचा ‘के पॉप आणि की ड्रॅमा’ जगभरात इतका लोकप्रिय झाला आहे, की आता भारतातही जागोजागी तरुण मुले कोरियन शिकता आहेत.

हा केवळ योगायोग नाही. कोरियन सरकारने संस्कृतीच्या प्रसारावर कोट्यवधी डॉलर खर्च केले आहेत. काही देशांमध्ये या उद्योजकतेला वाव मिळावा यासाठी परिपूर्ण धोरणे राबविली आहेत. थायलँडमधल्या बल्लवाचार्यांना देशाबाहेर व्यवसाय सुरु करण्यासाठी थायलंड सरकारची ३० लाख डॉलरची कर्जे मंजूर झाली आहेत. आपल्या ‘ग्लोबल थाई’ चळवळीद्वारे जगभरातील लोकांना आपल्या पाककला संस्कृतीद्वारे आपलसं करण्याची त्यांची मनीषा आहे.

आजमितीला इतर आशियाई देशांच्या तुलनेत सांस्कृतिक कलांच्या निर्यातीच्या बाबतीत भारत मागे पडत आहे. लक्षवेधक बाब ही की, तरुण पिढी, जी काहीतरी नवे करण्याच्या इच्छेने पछाडलेली आहे ती या सांस्कृतिक उद्योजकतेकडे आकर्षित होत आहे.

भारतात २०१९मध्ये सांस्कृतिक स्टार्ट अप्स १३० होते, तर २०२१मध्ये ते ६४० झाले. भारतीय सांस्कृतिक क्षेत्राचा आवाका अखंड आणि अनंत आहे. यात पुरातन आणि आधुनिक कला समाविष्ट होतात. यात मूर्त स्वरुपाची सांस्कृतिक उत्पादने जसे शिल्पे, वस्त्रकला, समाविष्ट होतात; तसेच संगीत,नाट्य-नृत्य अशा अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक सेवाही समाविष्ट होतात.

सरकारतर्फे सांस्कृतिक मंत्रालयाच्या विविध योजना आहेत; परंतु या कालबाह्य आणि आधुनिक संकल्पनांसाठी तुटपुंज्या वाटतात. बऱ्यचशा योजना पारंपरिक अभिजात सांस्कृतिक कलांसाठी आहेत.

परंतु साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प यातील नवनवीन प्रयोग, आधुनिक कला, त्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांना पाठिंबा याविषयी एकूण उदासीनता दिसते. त्यामुळे या सर्व क्षेत्राचा सांस्कृतिक उद्योजकता म्हणून वेगळा विचार होऊन त्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि सूक्ष्म लघुमध्यम उद्योग मंत्रालय या दोन्ही मंत्रालयांनी एकत्रितपणे उद्योजकांना प्रेरणा देणारी धोरणे बनवण्याची नितांत गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com