शिक्षणदिशा : समरसतेसाठी भाषाशिक्षण

महाराष्ट्र राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदीखेरीज इतर कोणतीही भाषा शिकण्याची सक्ती नाही.
Education
Educationsakal

महाराष्ट्र राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदीखेरीज इतर कोणतीही भाषा शिकण्याची सक्ती नाही. तरीदेखील त्या त्या भाषेवरील प्रेमामुळे, आवडीमुळे शालेय शिक्षणाचाच एक भाग म्हणून लोक निरनिराळ्या भाषा शिकतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणाऱ्या अमराठी भाषक मुलांना आपली मातृभाषा शिकता यावी म्हणून अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये - विशेषतः माध्यमिक स्तरावर - गुजराती, कन्नड, उर्दू वगैरे आधुनिक भारतीय भाषा शिकण्याचीही सोय असते.

या माध्यमिक शाळा बहुधा त्या त्या समाजाच्या लोकांनी चालवलेल्या असल्याने ही सोय तेथे आवर्जून उपलब्ध करून दिली जाते. इतर शाळांमध्ये ती सहज पाहायला मिळत नाही. अभिजात भाषांबद्दलही तसेच म्हणता येईल. मराठी, हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये संस्कृत, काही मराठी शाळांमध्ये पाली आणि अर्धमागधी, तर उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये पर्शियन आणि अरेबिक भाषा लोकप्रिय असल्याचे दिसते.

फ्रेंच, जर्मन, रशियन अशा ‘परकीय’ भाषा शिकण्याची सोय इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असते, तशी इतर शाळांत अपवादानेच आढळते. थोडक्यात सांगायचे, तर या निरनिराळ्या भाषा विशिष्ट चौकटींमध्ये बांधल्या गेल्या आहेत. या चौकटी मोडून भाषा शिक्षण खऱ्या अर्थाने खुले आणि समृद्ध करायचे असेल, तर त्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांचा पुढाकार फार महत्त्वाचा ठरेल.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुभाषिकतेवर भर देण्यात आला आहे. योग्य अध्यापन पद्धती वापरल्यास मुले लहान वयात अनेक भाषा शिकू शकतात, आणि त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावरही चांगला परिणाम दिसून येतो; मातृभाषा शिक्षणावरचा भर कमी न करता मुलांना लहान वयापासूनच इतर भाषांची ओळख करून देण्यात येईल, असे धोरणात नमूद केलेले आहे. हीच बाब पुढे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातही अधिक विस्ताराने मांडली आहे.

अनेक भाषा शिकल्यामुळे मुले बौद्धिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होतात, अनेक भाषांतील शब्दरचना, अभिव्यक्तीची धाटणी, साहित्य त्यांच्या हाताशी असल्याने ती अनेक अंगांनी विचार करू शकतात, अधिक लोकांशी संवाद साधू शकतात. या सर्व गोष्टी अधिक चांगले शिक्षण आणि राष्ट्रीय समरसता या दोन्हींसाठी श्रेयस्कर आहेत, अशी राष्ट्रीय आराखड्यातील सर्वसाधारण भूमिका आहे.

ती फक्त मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषा डोळ्यांसमोर ठेवून घेतलेली नाही. सर्वच भारतीय भाषांमध्ये प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याचा प्रचंड साठा आहे. त्याचा परिचय झाला, तर आपला राष्ट्रीय वारसा मुलांना अधिक चांगल्या रीतीने उमजेल अशी त्यामागची अपेक्षा आहे. ती प्रत्यक्षात उतरायची असेल, तर वर दिल्याप्रमाणे चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्वीपासूनच संस्कृत शिकवले जाते, त्याची गणना आता ‘आधुनिक भारतीय भाषा’ म्हणून करण्यात आली आहे. संस्कृत शिकण्याचे अनेक फायदे आहेत, यात शंका नाही. त्याचबरोबर इतर आधुनिक भारतीय भाषांचाही विचार करायला हवा. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शेजारी राज्यांच्या भाषा म्हणजे गुजराती, कन्नड, तेलुगू, कोकणी शिकण्याची सोय का नसावी?

आपल्या शेजाऱ्यांची भाषा शिकणे किती सोपे, मजेचे आणि नव्या जाणिवा विकसित करणारे असते. महाराष्ट्राच्या विविध भागांत स्थायिक झालेले जे तमीळ, बंगाली, सिंधी असे इतर भाषक समुदाय आहेत, त्यांच्यासाठीही स्थानिक मराठी शाळांनी पुढाकार घेऊन या भाषा शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर ते एक आकर्षण ठरेल.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरी उर्दू किंवा उर्दू-हिंदी-मराठी अशी मिश्र भाषा बोलणारी कितीतरी मुले मराठी माध्यमाच्या शाळांत जातात. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मराठी घरांतील मित्रमैत्रिणींसाठी उर्दू भाषा शिकण्याचा पर्याय तर नक्कीच उपलब्ध असायला हवा. (त्या निमित्ताने हिंदी चित्रपटांतील संवाद आणि गाण्यांचा अर्थही आणखी व्यवस्थित कळेल!) या भाषा शिकवण्यासाठी शिक्षक मिळणे फार अवघड नाही, आणि जास्तीची मदत पालकही आवडीने करतील. मराठी माध्यमाच्या शाळांचे हे सर्वसमावेशक स्वरूप महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेला साजेसे असेल.

या सगळ्या वेगवेगळ्या भाषांशी शब्दांचे, विचारांचे, संस्कृतीचे आदानप्रदान करतच मराठी भाषेला आजचे समृद्ध स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांना मराठीचेच अंतरंग आणखी चांगल्या प्रकारे उलगडेल, हाही एक महत्त्वाचा फायदा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com