जागर स्त्रियांच्या आरोग्यहक्काचा

जगभर नुकताच ‘मासिक पाळी आरोग्य दिन’ ( २८ मे) पाळण्यात आला. भारतात, महाराष्ट्रातही हा दिवस पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Menstruation
MenstruationSakal

स्त्रियांच्या आरोग्यविषयक विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचा मुद्दा ऐरणीवर येण्याची गरज आहे. नुकताच ‘मासिक पाळी आरोग्य दिन’ पाळण्यात आला. पण या प्रश्‍नांचा पाठपुरावा सातत्याने व्हायला हवा.

जगभर नुकताच ‘मासिक पाळी आरोग्य दिन’ ( २८ मे) पाळण्यात आला. भारतात, महाराष्ट्रातही हा दिवस पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मासिक पाळी हा विषय बायकी कुजबुजीचा न रहाता सार्वजनिक चर्चेचा विषय बनत चालला आहे, ही खरोखरच स्त्रियांसाठी; तसेच स्त्री-पुरुष सहजीवन, महिलांचे आणि सार्वजनिक आरोग्य या दृष्टीनेही स्वागतार्ह गोष्ट आहे.

नवी बाजारपेठ मिळवण्यासाठी कंपन्यांनी ‘सॅनिटरी पॅड’च्या प्रचार-प्रसारासाठी भलेही हा प्रश्न सार्वजनिक केला असला तरी त्यामधून मासिक पाळी आरोग्यविषयक सार्वजनिक धारणा बदलण्यास मदत झाली. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयामध्ये आणि किशोरवयीन मुलीच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या आरोग्य धोरणात मासिक पाळी आरोग्य आणि त्याचे व्यवस्थापन याचा समावेश आहे, याची नोंदही आज घ्यायला हवी. मासिक पाळी आरोग्य व व्यवस्थापन यासबंधी निर्माण झालेल्या काही गंभीर सामाजिक, राजकीय प्रश्नांचा विचार केला पाहिजे. मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा आणि त्यामुळे महिलांना मिळणारी बहिष्कृततेची वागणूक हा विषय सबरीमाला मंदिरातील प्रवेशाच्या प्रश्नात ऐरणीवर आला. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन मासिक पाळी काळात महिलांना प्रवेश नाकारणे, हे मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली आणि त्याबरोबरच अर्थात मासिक पाळीविषयी समाजामध्ये वैज्ञानिक जाणीव तयार होणे हे घटनात्मक मूल्य पुढे आले.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मासिक पाळीमध्ये पाण्याअभावी स्थलांतरामुळे महिलांना कामाचा ताण, ऊस तोडीच्या कामाचा ताण, स्वच्छतागृहाच्या सोयींचा अभाव यामुळे मासिक पाळी संबंधित आरोग्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्या तयार झाल्या आणि मग नफेखोर डॉक्टरांनी यावर उपाय म्हणून स्त्रियांची गर्भाशये काढण्याचा मार्ग शोधला. अकाली काढलेल्या गर्भाशयामुळे या महिलांच्या आरोग्यावरही खूप परिणाम झाला. या घटना पुढे आल्या तेव्हा आम्ही महाराष्ट्रातील स्त्री संघटना व आरोग्य संघटनांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर आवाज उठवला आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली गेली व या प्रश्नावर काही शिफारशी झाल्या.

स्वच्छतागृहांचा अभाव

हा प्रश्न केवळ ऊसतोड वाहतूक कामगारांबाबत नाही, तर दुष्काळी भागांमधल्या महिला, शहरांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या महिला यांचाही आहे. त्यांना पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. पुरेश्या पाण्याचा प्रश्न आहे. असंघटित क्षेत्रातल्या महिला कामगारांवरील शारीरिक- मानसिक ताणाचा हा प्रश्न असंघटित क्षेत्रातील महिलांशी मोठ्या प्रमाणावर संबंधित आहे व येथे उपाययोजना आवश्यक आहे. त्याचबरोबर जिथे खूप शारीरिक मानसिक ताण आहे, सतत उभे राहून काम करावे लागते अशा नर्स, कारखान्यातील मजूर महिला, अभियंता महिला, कंडक्टर, सफाई सेविका, कचरा वेचक महिला यांच्यासाठीही मासिक पाळीचे दिवस हा गंभीर प्रश्न आहे. पुण्यामध्ये ‘आनंद ग्रुप'' च्या दोन कंपन्यांमध्ये महिला इंजिनियरची संख्या मोठी आहे. इथे महिलांना मासिक पाळीची रजा दिली जाते. या सुविधेची अंमलबजावणी होते किंवा नाही याचा आढावा घेतला जातो, हे या कंपन्यांच्या जेंडर सेलवर काम करताना समजले. म्हणून शारीरिक ताण असलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांना ‘मासिक पाळी’ची विशेष रजा मिळणे आवश्यक वाटते.

रक्तस्रावशोषक साहित्य म्हणून पूर्वी घरातीलच जुने सुती कपडे वापरले जात; परंतु आता सुती कपडे महाग झाले आहेत आणि पॉलिस्टर कपडे अशासाठी उपयोगी ठरू शकत नाहीत. त्यामुळे ‘सॅनिटरी पॅड’चा वापर वाढला आहे; परंतु सॅनिटरी पॅड स्वस्त नाहीत.ते स्वस्त दरामध्ये मिळणे आणि ‘जीवनावश्यक वस्तूं’ मध्ये त्याचा समावेश होणे आवश्यक आहे. त्यामुळेच अगदी रेशनवरही सँनिटरी पॅड द्यावेत. त्याचबरोबर या कचऱ्याची विल्हेवाट हा पर्यावरणाचा प्रश्न तयार होतो. कचरावेचकांच्या आरोग्याचा प्रश्नही येतो. म्हणून संबंधित व्यक्तीने पर्यावरणपूरक पद्धतीने सँनिटरी पॅडची विल्हेवाट लावली पाहिजे.

मध्यमवयीन महिलांचे प्रश्न

मासिक पाळीचे आरोग्य व त्याचे व्यवस्थापन याबाबत राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील विविध धोरणे घेतली आहेत; परंतु या धोरणांमध्ये किशोरवयीन मुलींमध्ये जागरूकता यावरच भर आहे. मध्यमवयीन महिला किंवा रजोनिवृत्तीकडे जाणाऱ्या महिला यांचे मासिक पाळीच्या काळात आरोग्याचे अनेक प्रश्न असतात. त्याबाबतही धोरणांमध्ये विचार होण्याची गरज आहे. कावळा शिवण्याच्या प्रतिकापासून समाज माध्यमांमध्ये सँनिटरी पॅडच्या जाहिरातींपर्यंत आपल्या जाणीवा बदलत आहेत, हे स्वागतार्ह असले तरी मासिक पाळी आरोग्य व व्यवस्थापन यासंबंधीवरील काही प्रश्नांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

  • लिंगभाव संवेदनशीलतेसंदर्भात विवाहपूर्व समुपदेशन, लैंगिकता प्रशिक्षण यामध्ये मासिक पाळीबाबतची जागरूकता वाढवणे

  • मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा दूर करणे

  • महिलांनी या काळात वापरण्याचे साहित्य स्वस्त दरात व सर्वत्र उपलब्ध व्हावे.

  • महिलांना विशेष रजेची व्यवस्था.

  • किशोरवयीन व तरुण मुलींबरोबरच रजोनिवृत्तीच्या वयातील महिलांच्या आरोग्याचाही विचार आवश्यक.

  • सर्व कामाच्या ठिकाणी पुरेसे पाणी, पुरेशी स्वच्छतागृहे, विश्रांतिगृहे आवश्यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com