esakal | बदलती गावे : गोडवा गुऱ्हाळाच्या गावाचा!
sakal

बोलून बातमी शोधा

बदलती गावे : गोडवा गुऱ्हाळाच्या गावाचा!

बदलती गावे : गोडवा गुऱ्हाळाच्या गावाचा!

sakal_logo
By
प्रशांत शेटे

राचन्नावाडी (ता. चाकूर, जि. लातूर) केवळ दोन हजार लोकवस्तीचे गाव. पारंपरिक पद्धतीची शेती हा येथील मुख्य व्यवसाय होता. गावाच्या शेजारी झालेल्या तलावामुळे गावातल्या शेतीचा चेहरामोहरा बदलला. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी ऊसलागवडीला प्राधान्य दिले आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्राने गुऱ्हाळाला सुरुवात झाली. ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतात आजमितीला गुऱ्हाळं सुरू झाली आहेत. त्यामुळे मजुरांना गावातल्या गावात रोजगार मिळाला. गुळाचा व्यवसाय गावासाठी आर्थिकदृष्ट्या नवसंजीवनी देणारा ठरला आहे. उसावर प्रक्रिया करून नव्या पिढीसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे गुऱ्हाळाचे गाव म्हणून आता या गावाची लातूर जिल्ह्यात ओळख झाली आहे.

राचन्नावाडी हे गाव चाकूर-उदगीर रस्त्यावर आहे. चाकूर या तालुक्याच्या ठिकाणापासून ते १२ कि.मी.अंतरावर आहे. ऊस उत्पादनात पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीला तोड उत्पादन घेणारे शेतकरी याठिकाणी तयार झाले आहेत. ही सर्व किमया गावाच्या शेजारी झालेल्या साठवण तलावामुळे झाली. यासोबतच संगाचीवाडी येथेही साठवण तलाव झाल्यामुळे राचन्नावाडी, कलकोटी, शेळगाव, टाकळगाव, सांडोळ-महांडोळ या गावात उसाचे क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात २,१०५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होत असून, यापैकी सहाशे हेक्टर लागवड एकट्या शेळगाव मंडळात आहे.

पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उसाची लागवड सुरू केली. तो कारखान्यांनी घेऊन जावा म्हणून पाठपुरावा सुरू झाला. तथापि, त्याला विलंब होऊ लागला. ऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने कारखाने तो घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ सुरू करून गुळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. एक-दोन शेतकऱ्यांनी सुरू केलेला हा प्रयोग लघुउद्योगाच्या रूपाने पर्याय घेऊन आला. सध्या गावाच्या आसपास ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतात गुऱ्हाळं सुरू असलेली दिसतात. त्यावर जवळपास सहाशे ते सातशे महिला व पुरुष मजूर काम करत आहेत. एका मजुराला पाचशे रुपयांची मजुरी मिळते. नोव्हेंबरपासून मे महिन्यापर्यंत ही गुऱ्हाळे चालतात.

अनेक शेतकऱ्यांनी शेतात गुऱ्हाळं सुरू करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारली आहे. त्याचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केल्याने येथील गुळाला अंगभूत गुणवत्ता आहे. हे शेतकरी स्वतःसह इतर शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करून गुळाचे उत्पादन करून देतात. यातून शेतकऱ्यांनाही चरखा, चुलवण याचे भाडे मिळते. दोन एकर क्षेत्रातील उसावर किमान सहा टन गुळाचे उत्पादन निघते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. भाजीपाल्याचे उत्पादनही येथील शेतकरी घेत आहेत. भाजीपाल्यास लातूर, उदगीर, चाकूर येथील बाजारपेठ उपलब्ध असते.

गुळाचे उत्पादन वाढल्यामुळे गावातच व्यापारी येत असून, ते जागेवरून गूळ खरेदी करून घेऊन जातात. प्रल्हाद चिंचोळे यांनी सेंद्रिय गूळ व पाकाची निर्मिती सुरू केली आहे. राचन्नावाडी गावाच्या जवळ पोचताच दरवळणारा गोडसर सुगंध मन प्रसन्न करतो, पुढे जाताच गुऱ्हाळांची लगबग दिसते. ऊसतोडणी, चरकातून काढण्यात येणारा उसाचा रस, त्याच्या बाजूला पेटवलेले चुलवण, त्यात एक सारखे पाचट टाकून ते धगधगत ठेवण्याचे प्रयत्न, चुलवणावरील भलीमोठी कढई, उकळणारा रस, त्यास सातत्याने ढवळत राहणारे मजूर आणि यातून तयार होणारा गूळ हे या गावाचे वैशिष्ट्य आहे.

loading image
go to top