तंत्रज्ञानयुगातील बंडखोरीचे धडे

तब्बल १४ वर्षे तगड्या राष्ट्रांशी पंगा घेणारे असांज आधुनिक तंत्रज्ञान युगातील एक बंडखोर ठरतात. महत्त्वाच्या निर्णयांमागील धागेदोरे समोर आणणारी माहिती प्रसिद्ध होऊ नये, यासाठी महासत्तेने त्यांच्या गळचेपीसाठी जंगजंग पछाडले. गोपनीयतेच्या तटबंदीला धक्का लागला, तर शासनसंस्था कशा अस्वस्थ होतात, याचाच हा प्रत्यय.
तंत्रज्ञानयुगातील बंडखोरीचे धडे
तंत्रज्ञानयुगातील बंडखोरीचे धडेsakal

-ऩिखिल श्रावगे

‘विकिलिक्स’ या संकेतस्थळाचे संस्थापक ज्युलियन असांज यांची अखेर कायदेशीर कचाट्यातून सुटका होऊन ते आपल्या मायदेशी ऑस्ट्रेलियात परत गेले. असांज २०१०पासून अमेरिकी तपास यंत्रणांच्या रडारवर होते. सुमारे १४ वर्षांनंतर त्यांची झालेली सुटका, त्यांनी समोर आणलेल्या माहितीच्या आधारावर लावण्यात आलेले गुन्हे आणि त्याची व्यापकता यांचा धांडोळा घेणे आवश्यक आहे.

चेल्सी मॅनिंग या अमेरिकेच्या सैन्यदलात काम करणाऱ्या विश्लेषकाने २०१० मध्ये इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लष्करी कामगिरी करताना बरीच गोपनीय माहिती गोळा केली. त्याचसुमारास हॅकिंग विश्वातील जुलिअन असांजशी मॅनिंगची इंटरनेटद्वारे ‘आभासी ओळख’ झाली. विकिलिक्स हे गोपनीय माहिती प्रसिद्ध करणारे संकेतस्थळ आपली रसद योग्य पद्धतीने जगासमोर आणू शकेल, याचा विश्वास असणाऱ्या मॅनिंगने असांजकडे ऐवज दिला. संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या त्या माहितीने अमेरिकी सरकारला घाम फोडला. अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्यानंतर दहशतवादासोबत दोन हात करायची घोषणा करून तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश आणि त्यांच्या प्रशासनाने अल-कायदा या दहशतवादी गटाचा तळ असणाऱ्या अफगाणिस्तानवर हवाई हल्ला सुरु केला. यथावकाश पायदळाला पाचारण करून तेथील एक एक शहर उध्वस्त करत गेले. त्यानंतर संहारक शस्त्रांचा साठा केल्याचा आरोप करून सद्दाम हुसेन राष्ट्राध्यक्ष असलेल्या इराकवर हल्ला करत अमेरिकेने आधीच धगधगणारा पश्चिम आशिया अधिक पेटवला.

जगाला सांगताना ''न्याय्य पद्धतीने दहशतवादाचा बिमोड'' वगैरे गुलाबी वर्णन करणाऱ्या बुश प्रशासनाने प्रत्यक्षात महिला, ज्येष्ठ, लहान मुले, सर्वसामान्य नागरिक असा कुठलाही भेद न करता सरसकट हल्ले केले. संशयित दहशतवाद्यांकडून माहिती गोळा करायच्या उद्देशाने त्यांचा अमानुष छळ केला. हे दोन्ही देश जवळपास आपल्या टाचेखाली घेताना तेथील तेल,अफूच्या व्यवहारावर ताबा मारला, राष्ट्रीय तिजोरी आपल्याकडे वळती केली. सुमारे २० वर्षे या दोन देशांमध्ये आपला कायदा चालवताना अमेरिकी व्यवस्थेने अमेरिकी नागरिकांकडून कर स्वरूपात गोळा झालेल्या कोट्यावधी डॉलरचा चुराडा केला. हे करत असताना सत्तेच्या प्रत्येक वळणावर नेमलेले राजकारणी, सरकारी अधिकारी, शस्त्रोत्पादन करणाऱ्या कंपन्या यांनी बेसुमार फायदा करून घेतला. मॅनिंगने ही आणि आणखी बरीच स्फोटक माहिती असांज यांना सुपूर्द केली. प्रशासनाचा गुमान चाललेला हा प्रकार समोर आणून त्या दोघांनी फक्त युद्धाच्या नफ्यावर जगत असलेल्या अमेरिकी रचनेच्या शेपटावरच पाय दिला.

मॅनिंगला अटक करून, तातडीने खटला चालवत शिक्षा सुनावण्यात आली. लंडनमध्ये स्थायिक असणाऱ्या असांज यांनी वाऱ्याचा वेध घेत तेथील इक्वेडोर या देशाच्या दूतावासात राजकीय आश्रय घेतला. मध्यम आकाराचा दूतावास आणि त्याच्या बाहेर ब्रिटन आणि अमेरिकेचे तपासाधिकारी असा लपंडाव सुरु झाला. त्या इमारतीच्या बाहेर पडताच आपल्या हातात बेड्या पडणार हे समजल्यामुळे असांज आत राहिले. अमेरिकेने इक्वेडोरवर आणलेला राजकीय दबाव, तपासाधिकाऱ्यांनी बौद्धिक मसलत करत करकचून आवळलेली कायदेशीर चौकट इतकी घट्ट होती की सात वर्षे असांज त्याच दूतावासाच्या कार्यालयातच राहिले. कुटुंबापासून लांब, कधी संगणक, दूरध्वनी वापरायची बंदी, कार्यालयात कधीही थेट न येणारे ऊन, एकलकोंडेपणा या सर्व अडचणींना सामोरे जात असांज यांनी अमेरिकेला शरण जाण्यास नकार दिला. उलटपक्षी २०१६च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे ई-मेल आपल्या खासगी खात्यावर कसे पाठवले याची जंत्रीच समोर आणत त्यांनी अमेरिकेला आणखी शिंगावर घेतले. याचा काय तो अर्थ समजून घेत अमेरिकेने इक्वेडोरला असांज यांना दिलेला आश्रय रद्द करायला भाग पाडले. ते होताच ब्रिटनच्या पोलिसांनी असांज यांना अटक करून अमेरिकेकडे त्यांचे हस्तांतर करायची प्रक्रिया सुरु केली.

हेरगिरीचे कलम

त्यांच्याभोवती फास इतका आवळला गेला की त्यांनी शेवटी आरोप झालेल्या गुन्ह्याची अनिच्छेने कबुली देत माफी मागितली. घडलेल्या प्रमादाची शिक्षा कैदेत घालवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून, उरलेली गोपनीय माहिती प्रसिद्ध न करण्याच्या आणि तिची विल्हेवाट लावण्याची अट मान्य करून सरतेशेवटी ते परवा मायदेशी परतले. मुळात त्यांच्यावर अमेरिकेने लावलेले हेरगिरीचे कलम हे फक्त अमेरिकी सैनिक आणि गुप्तचर खात्याला लागू होते. असांज यांनी मिळालेली माहिती फक्त प्रसिद्ध केली. ती मिळवण्यात अथवा हेरगिरी करण्यात त्यांचा सहभाग दिसत नाही. मात्र, सामर्थ्याचा गंड असणाऱ्या अमेरिकी व्यवस्थेने असांज यांना कायद्याच्या कक्षेत अडकवून इतर प्रसारकांना इशारा दिला आहे. हे करताना मानवी मूल्य, पत्रकारांचा सन्मान, युद्धाच्या आडून चाललेले गैरप्रकार असे मूळ विषयांना हात न घालता ‘मिळालेली माहिती प्रसारित केली कशी’ असा प्रश्न करत या प्रकरणाचा गुंता वाढवला. हा सगळा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी ठरतो.

उठता-बसता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रशियातील त्यांच्या विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना कसे जीवानिशी मारतात, चीनमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांची कशी माध्यमांवर पकड आहे, भारतात मोदी सरकारच्या विरोधात बातम्या चालवणाऱ्यांचे कसे वाईट दिवस सुरु आहेत, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे टीकाकारांना कसे संपवतात, याची उजळणी करणाऱ्या अमेरिकी राजकारण्यांनी स्वतःचे झाकून ठेवण्यात प्रावीण्य मिळवले आहे. इतर देशांना मानवी मूल्य, धार्मिक स्वातंत्र्य, निवडणूकप्रक्रिया, श्रीमंतांची सरकारशी असलेली जवळीक, अल्पसंख्यांकांचे जीवनमान, लोकशाही यांविषयी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या अमेरिकी संस्था स्वतःमध्ये डोकावत नाहीत. भक्कम लष्कर, डॉलरचे महत्त्व याच्या जोरावर अमेरिका इतरत्र दबाव राखून आहे. मूळचे हॅकर असणारे असांज अगदी सरळमार्गी नसले तरी त्यांनी व्यवस्थेविरोधात केलेल्या उठावातून शासनसंस्थांना आणि सर्वसामान्यांनाही काही धडे मिळतात. समाजाच्या नियमनचा भाग म्हणून अगदी सगळी माहिती प्रत्येकवेळी उघड करता येत नाही, हे खरे असले तरी जी सार्वजनिक हिताची आणि लोकांना माहीत असणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रसारित व्हायलाच हवी. ती जर दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर असांज यांच्यासारखे लोक सक्रिय होतात. ते टाळता येणारे नाही. जगाची नको तितकी उठाठेव करणाऱ्या महासत्तेने स्वतःच्या देशातील छुपेपणाने चाललेल्या बेकायदा गोष्टी जाहीर करणाऱ्याचा जवळपास जीव घ्यावा, यासारखा संतापजनक प्रकार नाही. लोकशाहीचा प्रचार करणारी अमेरिका व्यवस्था आपल्या भानगडींच्याबाबत किती सावध आहे, हे असांज यांच्या मुस्कटदाबीवरून लक्षात येते. मायदेशात परतल्यानंतर असांज आपली कार्यपद्धत सुरु ठेवत गोपनीय माहिती फोडत देशोदेशींच्या सरकारची डोकेदुखी वाढवणार की ''झाले तेवढे फार झाले'' म्हणत तो नाद सोडून देणार हे बघायला हवे. मात्र, तब्बल १४ वर्षे तगड्या राष्ट्रांशी पंगा घेणारे असांज आधुनिक तंत्रज्ञानयुगातील एक बंडखोर ठरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com