- डॉ. केशव स. देशमुखविविध कारणांनी घडलेल्या स्थलांतरातून नव मिश्रभाषा तयार होत जाते. खरं तर यामुळेच बोलीची ढब आणि चवही बदलते. ही स्थलांतराची एकप्रकारे देनच. लवकरच येणाऱ्या मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त एका भाषक पैलूचा वेध..व्यक्ती आणि व्यक्तिसमूह यांच्यातील स्थलांतराची प्रकिया ही कालानुकाल चालत आलेली पहायला मिळते.माणसं गावं सोडतात.शहरं सोडतात.एका मुलखातून दुस-या मुलखात जातात. या देशातून त्या देशात जातात आणि नव्या भूमीवर स्थिर होतात. शिवाय, हे सतत घडत रहाते.यातून एकप्रकारे नव्या भाषेचे, नव्या बोलीचे अवगतीकरण होत रहाते. हे घडणं नकळत, लीलया, सहज होते. हे घडण्याला जसा नवा मुलूख कारणीभूत ठरतो, त्यासोबतच लोकसान्निध्यता आणि लोकभाषा ह्यापण कारणीभूत ठरतात. यातून अर्थातच या स्थलांतराचा बोलीभाषांवर मोठा परिणाम होतो..स्थलांतर बहुपेडीवस्तुतः स्थलांतर हे बहुपेडी असते. ते कुठल्या एका कारणानं होत नाही. जसे, शिक्षण,व्यवसाय,नोकरी आपत्ती,जगण्याचे बदलते रूप, दहशत, नव्या संधी,पोटापाण्याचे प्रश्न, आजारपण, रोगराई आणि नैसर्गिक अरिष्टं अशा कितीतरी कारणांनी स्थलांतर हे घडत रहाते. याचे ठसे बोलीवर, भाषेवर होत रहातात. व्यक्ती, व्यक्तिसमूह यांच्यात हे स्थलांतर होते.खूपदा बलाढ्य अशा धरणांसारख्या प्रकल्पामुळे तर गावंच्या गावं उठतात. यातून भाषिक, सामाजिक सांस्कृतिक मोठी उलथापालथ होते. मग यातून, पोटात आणि ओठांत असलेली भाषाही बदलतेच. कारण,माणूस भाषाशरण असतो. तो एक भाषा सोडतो आणि दुसरी भाषा धरतो..आता हेच पहा ना, नोकरीच्या निमित्तानं गावं सोडलेली (स्थलांतरित) माणसं वाचून लिहून गावबोली सोडतात आणि प्रमाण म्हणवल्या गेलेल्या भाषेला कायम जोडून रहातात. यात जसे शिक्षण कारण ठरले तसेच स्थलांतरही कारण ठरले आहे.यातून घडतं असं की,आपलं मूळ बोलभाषाधन गमावलं जातं आणि नवं भाषाधन अवगत केलं जातं. डाॅ. गणेश देवी म्हणतात त्याप्रमाणं,खरं तर हा एकप्रकारे ‘शब्दसंहारा’चा (फोनोसाईड) दुखरा आणि हळवा भाग म्हणायला हवा..कारण, यात बोलीचा मूळ ऐवज गमावणं हे आहेच. यात अजून एक गंमत आहे ती म्हणजे विविध कारणांनी घडलेल्या स्थलांतरातून नव मिश्रभाषा तयार होत जाते. खरं तर यामुळेच बोलीची ढब आणि चवही बदलते. हेलात बदल होतो.शब्दकाठिण्य किंवा लवचिकता यातले भेद सहज कळतात.ही एका अर्थानं स्थलांतराची देणच!तसेच वय आणि लिंग यातूनही बदलत गेलेल्या बोलभाषेची नवी रीत व प्रत समजून घेता येते. उदा.लहान मुलं एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित झाली की, त्यांचे मैत्र जीवांचे व्हायला वेळ लागत नाही. त्यांच्यात खेळांतून सोबत चटकन वाढते. मग ते भाषेसोबत खेळतात. नवी भाषा पटकन पकडतात. स्थलांतरातून लहानांकरवी उमटणारा हा भाषिक ठसा मोठा रोचक,मोठा रंजक म्हणावा असा!.जिभेवरची भाषाबोली किंवा भाषा यांच्यातील बदलाच्यादृष्टीने स्थलांतराच्या कालगतीलाही महत्त्व आहेच. स्थलांतर हे तात्पुरते की कायमचे, यावरूनही भाषिक बदलाच्या ठशांचा माग काढता येतो.पण हे नक्की की, स्थलांतरामुळे मूळ भाषेला/बोलीला ढका लागतो.माणसं निकड म्हणून प्रमाणभाषेजवळ जातात आणि भाषिकदृष्ट्या प्रमाण होतात, हे खरे असले तरी यामुळे त्यांची म्हणून असलेली जी जीभेवरची भाषा आहे, तिला मात्र झळ तर अवश्य पोहचतेच.याशिवाय, आपल्या प्रतिष्ठा आड येतात. शुद्ध बोलावे असे काही आपले सामाजिक,नागरी धोके असतात. यातूनही मूळ, रसाळ, लयदार, गोड अशा बोलीमधील मूळ रूपं हरवली जातात..स्थलांतरामध्ये जसा काळाचा अवकाश महत्त्वाचा असतो, तसेच व्यक्ती आणि व्यक्तिसमूह यांचे जिथे स्थलांतर झाले आहे, त्या स्थलांतरस्थळी लोक एकमेकांच्या सान्निध्यात किती आले, हेपण लक्षात घेणे आवश्यक ठरते. सान्निध्यपरिणाम महत्त्वाचा असतो. यातून भाषिक बदलाचे नेमके मापन करता येणे शक्य होते. तसेच बदलत्या शब्दावलीचं नीट असं सांख्यिक स्वरूप स्पष्ट करता येऊ शकतं.‘एखाद्या समाजाची भाषा निर्माण होण्यासाठी शतकानुशतकं लागतात.’ असा ठोस अभ्यासातून डॉ. गणेश देवी यांनी जो आधार काढला आहे तो खूपच मूल्यगर्भ आहे. शिवारामधून जसे रब्बी अथवा खरीप हंगाम काढले जातात,तशी भाषा मात्र उत्पादित करता येणारी नसते.आणि हेही सत्य की, भाषेत सतत आवक-जावक होते.पण,ती निर्माण व्हायला शतकं लागतात हेही खरेच !.त्यासाठी स्थलांतराची एक कसोटी पुष्कळ ठळक आहे, की ज्यामुळे लोक भाषेत नवे काय काय आणून सोडतात आणि आपले जुने काय काय सोडून देतात.भाषेमध्ये सतत चालणारी ही 'धर-सोड' अगदीच मजेशीर आहे. माणसाला मातृभाषेतून तुटायला वेळ लागतो हे किती जरी खरे असले तरी पण एकंदर समाजातील माणसं भाषिकदृष्ट्या आपल्या म्हटल्या जाणा-या तुटतात हेही खोटे नाही..करुणेने भरलेली,दुःखावेग प्रकट करणारी,विव्हळजन्य भाषा ही पुष्कळ खोल अर्थात अधिक जड असते.ती जीभेवरून लीलया हटत नाही.ती मनातूनही सहजी लोप पावत नाही.एकप्रकारे हे भाषिक टिकाऊपण लक्षात घेण्यासारखेच आहे.याउलट,उल्हास,आनंद किंवा हर्षोत्पन्नशील भाषा ही आपल्यापर्यंत चटकन पोचणारी आणि झटकन विसरायला होणारी अशी भाषा असते.स्थलांतरातूनही हा पडताळा समजून घेता यावा,इतका लक्षणीय आहे..गतकालीन सोडलेला मुलूख, माणसे,आठवणी या स्मृतिपटलावर भाषेलापण जुळून असतात. भाषेस त्या मनात आंदोळत रहातातच. स्थलांतराचा हा ठसा, ठसाच असतो पण तो अमीट म्हणावा असा.(लेखक ज्येष्ठ बोली-भाषाभ्यासक असून महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.