...चला पुस्तकांचं सोनं लुटू!

प्रख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन (ता. २३ एप्रिल) जागतिक पुस्तक दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त पुस्तक वाचनाच्या आपल्याकडील सद्यःस्थितीचा मिश्‍कील नजरेने घेतलेला वेध.
Books
Bookssakal

प्रख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन (ता. २३ एप्रिल) जागतिक पुस्तक दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त पुस्तक वाचनाच्या आपल्याकडील सद्यःस्थितीचा मिश्‍कील नजरेने घेतलेला वेध.

‘मोरू’ आणि त्याचे बाबा ही मराठी साहित्यातली तशी ऐतिहासिक पात्रं. नवरात्र संपून दसरा उजाडला की, त्या दोघांची कोणाला ना कोणाला आठवण होतेच. सोनं लुटायचं म्हणून मोरूला दसऱ्याच्या दिवशी बाबा उठवित. काळ बदलला आहे. साडेतीन मुहूर्तांसह आणखी काही मुहूर्त इंटरनेटकृपेने आले आहेत. त्यांना ‘डेज’ म्हणतात. काळाबरोबरच चालत आता काही विशिष्ट दिवशीही त्याला झोपेतून जागं करणं, बाबांना आपलं कर्तव्य वाटते.

काळाप्रमाणे भाषाही बदलली आहे. पूर्वीसारखं ‘मोऱ्या’ असं खेकसत त्याच्या कटिप्रदेशाशी आपल्या चरणकमलानं आघात करणं बाबांनी सोडलं आहे. ते आता ‘मोरूबाळ’ असं संबोधतात. ‘खेकसत म्हणणे, आय लव्ह यू’ कादंबरी त्यांनी वाचलेली आहे. पण वसकणं सोडून ते ‘गुड मॉर्निंग, बेटा’ म्हणतात. मोरूही त्यांचा उल्लेख (पाठीमागे) ‘आमचा बाप’ असा थेट न करता, ‘आमचे पिताश्री’ असं म्हणतो.

त्या दिवशी असंच झालं. सवयीप्रमाणे बाबा मोरूला उठवायला गेले. त्याच्या प्रायव्हसीचा भंग होऊ नये आणि उपचार म्हणून त्यांनी दारावर दोनदा ‘टक टक’ केलं. प्रतिसादाची वाट न पाहताच घुसले. मोरू आपला पसरलेलाच. डोळ्यांसमोर मोबाईल. परमपूज्य पिताश्रींच्या आगमनाची दखल घेतल्या न घेतल्यासारखं त्यानं केलं. मोबाईलवरची त्याची नजर हटत नाही, हे पाहून पूर्वीच्या भूमिकेत जात बाबा खेकसलेच!

‘मोऱ्या, सकाळी उठल्यापासूनच मोबाईल! किमान आजच्या दिवशी तरी पुस्तक हातात धर.’

‘माझी परीक्षा संपून आठवडा झालाय. आता कसलं पुस्तक हातात घेऊ म्हणताय बाबा?’

बाबांना चिडल्यासारखं वाटू लागलं. म्हणाले, ‘‘अभ्यासाचं पुस्तक म्हणत नाहीये मी. आज जागतिक पुस्तक दिवस आहे. विल्यम शेक्सपीअर माहितीये ना? त्या महान लेखकाचा जन्मदिन आहे आज. चारशे आठवा. आठ वर्षं झालीत चारशे पार होऊन..!’

‘त्या गुगलमध्ये सारखं डोळे खुपसून बसलेला असतो. एवढंही माहीत नाही? त्या ऐवजी पुस्तकात थोडं डोकं खुपसत जा.’ बाबांचा सात्त्विक वगैरे म्हणणारा संताप शब्दांमधून झिरपत ईअरफोनला भेदत मोरूच्या कानापर्यंत पोहोचला.

‘अच्छा, पुस्तक दिनाचं महत्त्व सांगताय तुम्ही बाबा. या मुहूर्तावर सकाळी सकाळी मी एखादं पुस्तक हातात घेऊन बसावं, अशी तुमची अपेक्षा आहे. म्हणजे ‘किमान आजचा दिवस तरी’ मी पुस्तक वाचावं. असंच ना?’

‘आजच्या दिवशी म्हणजे? रोजच वाजत जा असं कित्येक वर्षांपासून सांगतोय मी. रोजचं सोडा, आठवड्यातला एखादा दिवस तरी पु्स्तक धरत जा हातात,’ बाबा तळमळीने म्हणाले.

‘बाबा, वाचून फायदा काय? म्हणजे पुस्तकंच का वाचायची?’ मोरूनं भाबडेपणानं विचारलेला हा प्रश्न म्हणजे ऑफस्पिनर आश्विननं टाकलेला लेगस्पिन! किंवा हरभजननं टाकलेला ‘दूसरा’!! मोरूला इतकी वर्षं पुरेपूर ओळखून असलेल्या बाबांना माहीत होतं हे.

‘पुस्तकं वाचनाचे फायदे सांगता येतील का तुम्हाला बाबा? म्हणजे ‘वाचाल तर वाचाल’ अशी वर्षानुवर्षं वाचत आलेली सुभाषितं नका सांगू. ‘ज्याचं मस्तक पुस्तकात, त्याच्या मस्तकात पुस्तक!’, हे सुभाषितही माहिती आहे मला.’

‘...आणि हो, ती खास आजचा दिवस साजरा करण्यासाठी इंटरनेटवरून शोधून काढलेली कोटही ऐकवू नका.’ मोरून पुढचा गुगली किंवा दूसरा टाकला.

‘मोरू, मोरू... पुस्तकवाचनाचे किती म्हणून फायदे सांगू तुला,’’ बाबा म्हणाले. त्यांनी आठवायला सुरुवात केली. मनातल्या मनात यादी सुरू झाली. बाबा सांगू लागले - पुस्तकं वाचल्याने आपल्या जगाबाहेर काय चाललंय, हे कळतं. काय होतं पुस्तकं वाचल्यानं? ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, माहितीच्या साठ्यात भर पडते. पुस्तकं वाचायला लागला की, तुमची एकाग्रता आपोआप वाढते. त्याचा फायदा अभ्यास करताना, तुमचा व्यवसाय वा नोकरी करताना होतो.तर्क करण्याची शक्ती वाचनातून विकसित होते.

तुमच्या भाषेत सांगायचं तर पुस्तकं वाचण्याएवढं दुसरं चांगलं ‘स्ट्रेस बस्टर’ नाही. समजा तुला फिजिक्सचा पेपर अवघड गेला. तो ताण विसरायला म्हणून तू द. मा. मिरासदार यांचं ‘माझ्या बापाची पेंड’, पु. ल. देशपांडे यांचं ‘खोगीरभरती’, शंकर पाटील यांचं ‘खुळ्याची चावडी’, शरद वर्दे यांचं ‘फिरंगढंग’ किंवा ‘बोलगप्पा’... असं कुठलंही पुस्तक वाचायला घे. हवं तर शिरीष कणेकरांचं निवड. आठ-दहा पानं वाचली की, तू सगळा ताण विसरून जाशील. खरं म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी तसं ते विसरल्यामुळेच तुला या ‘स्ट्रेस बस्टर’ची गरज पडलीय.

बाबांना नेमक्या वेळी फिजिक्सचा पेपर आठवल्यामुळं मोरूचा स्ट्रेस किंचित वाढलेलाच.

फायद्याची यादी पुढे चालू राहाते - ‘मस्तकात पुस्तक’ वगैरे तुला आवडत नाही. पण वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. कल्पनाशक्ती सुधारते.

आपलं जग, आपली (आणि इतरांचीही) संस्कृती, आपला इतिहास याची उमज वाढते ती वेगवेगळी पुस्तकं वाचल्यानेच. विविध दृष्टिकोन वाचल्यामुळं खरं-खोटं कळायला लागतं. वाचनामुळे प्रेरणा मिळते. जग बदलून जातं. मला स्वतःला ‘एक होता कार्व्हर’सारखी अनेक पुस्तकं प्रेरणा देणारी वाटतात.

वाचनामुळे संवाद करण्याची क्षमता अधिक चांगली होते. महत्त्वाचं म्हणजे भरपूर वाचलं की (थोडं तरी) चांगलं लिहिता येतं. मी नाही का साप्ताहिक सदर लिहितोय...

आता बाबा स्वतःच्या सदराबद्दल आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल भरभरून बोलू लागणार, हे मोरूच्या आतल्या आवाजानं सांगितलं. त्यानं ब्रेक लावला. ‘‘आम्ही, म्हणजे हल्लीची मुलं, वाचतच नाही, हे तुम्ही कशावरून ठरवता बाबा? फेसबुक, एक्स, इन्स्टा, चॅट हे सगळं सांभाळत आम्हीही वाचतो. पुस्तक थेट हातात कमी घेत असू. इंटरनेटवरच्या ‘अर्काइव्ह’सारख्या ग्रंथालयातून जुन्या पुस्तकांच्या पीडीएफ वाचत असतो.

‘पब्लिक लायब्ररी ऑफ इंडिया’, प्रोजेक्ट गुटेनबर्गची ‘फ्री इ-बुक्स’, ‘ई-साहित्य’... असं बरंच कुठून कुठून खूप काही वाचत असतो. तुम्हाला वाटतं आम्ही मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये डोळे खुपसून बसलोय. दिसतं तसं नसतं, बाबा...’ ‘...आणि खरं सांगू बाबा तुम्हाला, ‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा. ‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो. तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला पहिल्या क्रमांकावरचा देश आपला भारत आहे. आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो आपण जगात नंबर वन?’ मोरूलाही सात्त्विक संताप आलाय, हे बाबांनी ओळखलं.

मोरू पुढं सांगू लागला, ‘पुस्तक दिनानिमित्त तुम्हाला एखादं छान पुस्तक भेट द्यायचंय. त्यासाठीच मी सकाळी सकाळी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलोय.’

आता बाबांचे डोळे किंचित पाणावलेच. पुस्तकांचं सोनं लुटायचंय, या कल्पनेनं त्यांना भरून आलं.

(लेखक मुक्त पत्रकार व मराठी ब्लॉगर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com