तिढ्यानंतरचा लढा

‘खेला होबे’वरची प्रतिक्रिया निकालात दिसणार आहे. घोडामैदान जवळ आल्यावर तिढा तर कसाबसा सुटला आहे. आता लढा बाकी आहे.
lok sabha election mahayuti nomination vote election program
lok sabha election mahayuti nomination vote election programSakal

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात बरेच काही घडले. या ‘खेला होबे’वरची प्रतिक्रिया निकालात दिसणार आहे. घोडामैदान जवळ आल्यावर तिढा तर कसाबसा सुटला आहे. आता लढा बाकी आहे.

महाराष्ट्रातील जागावाटपाचा महातिढा महायुतीने सोडवला तर खरा; परंतु आता निवडणूक जिंकण्याची खरी अग्निपरीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्रात जनतेने कौल देऊनही भारतीय जनता पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागले होते, त्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

राजकारण व्यवहारावर चालते, असे सांगून भाजपने तडजोडी करण्याचा सपाटाच लावला. वेगवेगळ्या ‘शस्त्रक्रिया’ केल्या. पण या सगळ्याची परिणती महायुतीच्या जागावाटपाच्या तिढ्यात झालयाचे दिसून आले. अखेर तो सोडविण्यात यश आले असले तरी खरा लढा आता सुरू होणार आहे.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात बरेच काही घडले. या ‘खेला होबे’वरची प्रतिक्रिया निकालात दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

देशात दोन क्रमांकाची खासदारसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडे भाजपने पहिल्यापासूनच विशेष लक्ष दिलेले दिसले. मोदीपर्वातल्या याआधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातली स्थिती भाजपच्या घोषणेप्रमाणे ‘चलो चले मोदी के साथ’ अशी होती.

युतीला चाळीसहून अधिक जागा मिळाल्या होत्या. धनुष्यबाण कमलदलात गुंतला होता. आताही धनुष्यबाण आहेच; फक्त ठाकरे जाऊन शिंदे आले आहेत. सवंगडी बदलला आहे. या राज्यात स्वबळावर नव्हे तर सहकाऱ्यांचा हात धरून निवडणुकीला सामोरे जायचे आहे, हे केंद्रीय नेतृत्वानेही एव्हाना स्वीकारलेले दिसते.

पण यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ‘घड्याळ’ बांधलेला अजित पवार गटही भाजपसमवेत आहे. मुशीत घडलेल्या सरदारांना समवेत घेतले तर आहे; पण त्यांना लोकसभेच्या किती जागा द्यायच्या अन् त्यांनी समोर केलेले चेहरे उमेदवार म्हणून मान्य करायचे का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

हा प्रश्न खचितच भाजपचे कार्यकर्तेही विचारत असतील. भाजपने गेल्या दोन महिन्यांपूर्वी ज्यांना कलंकित ठरवले , त्याबद्दलचे गाडाभर पुरावे दिले, त्यांना आता भावी खासदार म्हणून लोकात न्यायचे अन् निवडून द्या म्हणायचे, अशी वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.

वर्षानुवर्षे काम करणारा कार्यकर्ता हे भाजपचे बळ. त्याने बाहेरून आलेले नेते निमूट स्वीकारले, आता वादग्रस्त ठरवलेले उमेदवारही आपले मानायचे का? वेगळी विचारधारा आणि स्वच्छ प्रतिमा यांचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपला मित्रपक्षांचे उमेदवार स्वीकारताना नैतिक आग्रह दूर ठेवावा लागला आहे.

म्हणजे प्रतिमाही खालावली आणि निकाल वेगळेच लागले तर तेलही गेले, तूपही गेले, हाती फक्त धुपाटणे, अशी वेळ येईल. पराभवाची ही नामुष्की टाळण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते शुचितेचा आग्रह दूर ठेवून कितपत सक्रिय होतात, यावर निकाल अवलंबून रहातील.

आमदार कमी असताना मुख्यमंत्रिपद दिले तरी एकनाथ शिंदे यांनी जागांबाबतचा आग्रह सोडला नाहीच. त्यांच्यावर विश्वास ठेवून आलेल्या खासदारांना संधी देणे हे शिंदेंचे कर्तव्य होते; भाजपने त्या भावनेचा आदर केला असे धरले तरी आता शिंदे यातील किती उमेदवारांना जिंकू शकतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

शिवाय त्यांचा आग्रह मान्य करायचाच होता, तर वेळीच का केला नाही? उमेदवार अन् जागावाटप अडवून धरणे योग्य नव्हते. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराने दोनदा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता महायुतीने पोतडीतून नावे बाहेर काढली आहेत.

काही ठिकाणी ती राजकारणालाच नवी आहेत, तर काही ठिकाणी वादग्रस्त. एकूणच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जो वेगळा रस्ता धरला, त्या निर्णयांची कसोटी आता लागणार आहे. समोरच्या बाजूने महाविकास आघाडीने एकेक जागेची व्यूहरचना विचारपूर्वक आखली आहे अन् प्रत्यक्षात आणली आहे.

विभागणी तिघांत असूनही भाजपने गेल्या वेळी लढलेल्या जागांपेक्षा जास्त उमेदवार उभे केले आहेत.भाजपने २८, शिवसेनेने १५ तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने चार जागा लढायच्या असे ठरले. परतलेल्या ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ या मित्रपक्षाला एक जागा देण्यात आली आहे. पण मुद्दा किती लढल्या, यापेक्षा किती जिंकणार हा आहे.

बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झुंज आहे. या निकालांवर विधानसभेचे जागावाटप अवलंबून असेल. महाशक्तीचा ‘मोदीप्रभाव’ असतानाही मित्रपक्षांनी भाजपला जागावाटपात बरेच अडवले.

‘राष्ट्रवादी कॉँग्रेस जरा समजुतदारपणे वागली; पण सध्या एकच खासदार असलेल्या या पक्षाने चार जागा घेतल्या. महाराष्ट्रात भाजपने आजवर कधीही स्वबळावर सर्व जागा लढवलेल्या नाहीत.

युतीच्या कुबडया घेऊन राज्यात वाटचाल करावी लागली अन् त्या नकोशा झाल्याने नव्या आधारासाठी नव्या कुबड्या शोधल्या. भाजपच्या आत्म्याला नवे शरीर शोधावे लागले आहे! घोडामैदान जवळ आल्यावर तिढा तर कसाबसा सुटला आहे. आता लढा बाकी आहे.

खरा बलवान तोच असतो, ज्याने स्वतःच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले असते.

— आचार्य विनोबा भावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com