esakal | अग्रलेख : पराभवाकडून पराभवाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

priyana and rahul gandhi

२०१४ मध्ये पदरी आलेल्या पराभवानंतरही पुढचे अटळ भविष्य सोनिया-राहुल यांना उमगले नव्हते, हेच खरे!

अग्रलेख : पराभवाकडून पराभवाकडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली झुंज घेतली ती २०१४ मध्ये! त्या लढाईत काँग्रेसचे पुरते ‘पानिपत’ झाले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्‍यक ती ५५ खासदारांची कुमकही काँग्रेसला तेथे धाडता आली नव्हती. त्यानंतर झालेल्या काही लढायांमध्येही काँग्रेसला हार सहन करावी लागली; मात्र गेल्या वर्षी झालेल्या झुंजीत भाजपच्या ताब्यातील तीन राज्यांवर कब्जा करण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे यंदाच्या या दुसऱ्या लढाईत काँग्रेसने कात टाकली आहे, असे चित्र उभे राहिले होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधीही भलतेच आक्रमक झाले होते आणि त्यांच्या हाती कथित राफेल गैरव्यवहारापासून बेरोजगारी, शेतकऱ्यांचा असंतोष असा दारूगोळा भाजपनेच दिला होता. मात्र, या लढाईतही काँग्रेसचे ‘पानिपत’च झाले. वर्ष-दीड वर्षापूर्वी हातात आलेल्या तीन राज्यांनीही दगा दिला. शिवाय, साथीला प्रियांका यांना घेऊनही उत्तर प्रदेशातील गंगा-जमनी संस्कृतीने पुन्हा मोदी यांच्याच हाती राज्य येणार, असा कौल दिला. त्यामुळेच आता राहुल यांच्या नेतृत्वावर भलेमोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. खरे तर यंदाची लढाई चुरशीची होती. तरीही काँग्रेसला विविध राज्यांतील भाजपविरोधी सुभेदार एकत्र आणण्यात अपयश आले आणि तेथेच काँग्रेसचे डावपेच कमी पडले होते. खरे तर या सर्वात जुन्या-पुराण्या पक्षाने या महासंग्रामाचे महत्त्व लक्षात घेऊन, स्वत: पडते घेऊन, या सुभेदारांना एकत्र आणण्यासाठी जातीने प्रयत्न करायला हवे होते. खरे तर कर्नाटकावरील स्वारी जनता दल (एस)ला साथीला घेऊन काँग्रेसने जिंकली, तेव्हा देशातील सर्व प्रादेशिक सुभेदार एकत्र येऊन भाजपशी निकराची झुंज देणार, अशी चिन्हे दिसू लागली होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही आणि महाराष्ट्रासह बहुतेक मोठ्या राज्यांतील तिरंगी लढतींमुळे काँग्रेसचे पुनःश्‍च एकवार पानिपत झाले.

अर्थात, यास कारणीभूत आहे ती काँग्रेसमधील घराणेशाही! खरे तर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गांधी घराण्याशिवायही आपण कारभार यशस्वी करू शकतो, असे दाखवून दिले होते. मात्र, त्यानंतरच्या पाच-सात वर्षांत चित्र बदलले आणि आता लागोपाठ दुसऱ्यांदा काँग्रेसला लोकसभेत तीन आकडी संख्येने खासदार पाठवता आले नाहीत. याचा सोनिया तसेच राहुल-प्रियांका यांनी गांभीर्याने विचार करायला हवा आणि ही घराणेशाही स्वत:च पुढाकार घेऊन मोडून काढायला हवी. काँग्रेसने २००४ ते २०१४ अशी सत्ता राबवलीही होती. मात्र, नेमक्‍या याच काळात काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ऊत आला, त्याचबरोबर पक्षनेतृत्वावर म्हणजे सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी अशा भ्रमात नेतेमंडळी राहू लागली. खरे म्हणजे पदरी आलेल्या अनेक पराभवांपासून काही धडा घेऊन राहुल यांनी अध्यक्षपद अन्य तरुण नेत्याकडे सोपवायला हवे होते. तसे झाले नाही आणि भले राहुल यांनी राजीनामा दिला, तरी तसे होण्याची शक्‍यता कमीच दिसते. मोदी यांनी नेमकी ही घराणेशाहीच लक्ष्य केली होती आणि त्याचा फायदा दरम्यानच्या अनेक लढायांमध्ये त्यांना झाल्यानंतरही प्रियांका यांना मैदानात उतरवण्यात आले. त्यांचा करिष्मा किमान उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात काँग्रेसला तारून नेईल, अशा भ्रमात काँग्रेसनेते होते. प्रत्यक्षात त्यानंतरही दस्तुरखुद राहुल यांना गांधी घराण्याच्या पारंपरिक अमेठीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये पदरी आलेल्या पराभवानंतरही पुढचे अटळ भविष्य सोनिया-राहुल यांना उमगले नव्हते, हेच खरे!
मात्र, हे भवितव्य महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील काँग्रेसच्या सुभेदारांना उमगले होते आणि त्यामुळे त्यांनी आपले गड-किल्ले घेऊन भाजपच्या छावणीत जाणे पसंत केले. भाजपने गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाचा आवाज अधिक उंचावला आणि राहुल यांनीही ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ची कास धरली. यंदाच्या लढाईत भाजपने थेट साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मैदानात उतरवल्यावर तर त्यांच्या विरोधातील दिग्विजयसिंह हेही आपल्या घरात कशी मंदिरे आहेत, त्याचीच जपमाळ प्रचारात ओढू लागले. मग अशा बेगडी ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या विरोधात, अस्सल हिंदुत्ववाद्यांनाच भरभरून मते देऊन मतदार मोकळे झाले! खरे तर देशाच्या बहुधार्मिक-बहुजातीय संस्कृतीवर घाला घालू पाहणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेसच खऱ्या अर्थाने झुंज देऊ शकते आणि त्यासाठी सोनिया-राहुल-प्रियांका यांनीच पक्षाची सूत्रे अन्य कोणाकडे द्यायला हवीत. शिवाय, या घराण्याची चमचेगिरी करणाऱ्यांनाही दूर सारायला हवे. त्याचबरोबर तळागाळाच्या पातळीवर जाऊन पक्षबांधणी हाती घेऊन, मुख्य म्हणजे रंजल्या-गांजलेल्यांना विश्‍वास द्यायला हवा. अन्यथा, पराभवाकडून पराभवाकडे असाच प्रवास चालू राहील.

loading image