अग्रलेख : संभ्रमित काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे.

हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही! काँग्रेसचे दरबारी राजकारण, तसेच गांधी घराण्यावर भिस्त ठेवून आला दिवस पुढे ढकलण्याच्या मानसिकतेतील काँग्रेस नेत्यांना दुसरा धक्‍का राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे बसला आणि हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या या नेत्यांना पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले! राहुल यांनी गेल्या दोन दिवसांतील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून, ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीही नाकारल्यामुळे तर हा पेच अधिकच गंभीर झाला होता. अखेर मंगळवारी प्रियांका गांधी यांनी राहुल यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ अन्य नेत्यांची रीघ त्यांच्या दरबारी लागली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न न झाल्यामुळे काँग्रेसमध्ये चार दिवस सुरू असलेल्या गोंधळात भरच पडली आहे. अर्थात, या साऱ्या गोंधळाला हे घराणे शीर्षस्थपदी नसेल, तर आपली ‘दुकाने’ कशी चालणार, हा पक्षनेत्यांना पडलेला मूलभूत प्रश्‍नच कारणीभूत आहे. त्यातच राहुल यांनी राजीनामा देण्याचे जाहीर करताच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिशा या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष अनुक्रमे अशोक चव्हाण, राज बब्बर आणि निरंजन पटनाईक यांनीही राजीनामे देण्याची तयारी दर्शविली. त्या पाठोपाठ या साथीच्या रोगाची लागण इतर राज्यांतही पसरली आणि पंजाब, आसाम, झारखंडमधील प्रदेशाध्यक्षांनी थेट राजीनामेच देऊन टाकले आहेत. खरे तर पंजाबमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी केलेली असताना, तेथील प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी राजीनामा देण्याचे काहीच कारण नव्हते.

राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत, हे स्पष्ट झाल्यावर खरे तर तातडीने नवा पक्षाध्यक्ष निवडून काँग्रेसजनांनी धडाडीने कामाला लागायला हवे होते. त्याऐवजी राहुल यांनाच पक्षाची संपूर्ण फेररचना करण्याचे अधिकार देऊन हे नेते मोकळे झाले! पराभवाने व्यथित होऊन, जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपद सोडू इच्छिणाऱ्या नेत्यालाच पुन्हा कामास जुंपण्याचा हा प्रकार झाला. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे या निकालांमुळे राज्या-राज्यांतील काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदीला आणि बंडखोरीला आलेला ऊत. अर्थात, याला राहुल गांधी यांनी उद्वेगाने तीन ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमाबद्दल व्यक्‍त केलेली नाराजीच कारणीभूत आहे. हे तीन नेते अर्थातच कमलनाथ आणि अशोक गेहलोत हे दोन मुख्यमंत्री, तसेच पी. चिदंबरम आहेत. त्यामुळे लगोलग राजस्थानात नेतृत्वबदलाची मागणी पुढे आली. राजस्थानवर वर्षभरापूर्वी कब्जा केल्यानंतरही तेथील जनतेने राज्यातील सर्व म्हणजे २५ खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच निवडून दिले आणि त्याबरोबर तेथील काँग्रेसच्या दोन नेत्यांनी विसंवादी सूर लावला व त्यापाठोपाठ कृषिमंत्री लालचंद कटारिया यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. हा सारा गोंधळातील गोंधळ बघून आता राहुल यांच्या या वक्‍तव्याबाबत सारवासारव करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू झाले आहेत. तर, कर्नाटकात भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ या आपल्या पूर्वीच्याच मोहिमेला पुन्हा गती दिली असून, त्यामुळे तेथील जनता दल (एस)- काँग्रेस सरकारवर अस्थितरतेचे सावट आले आहे.

खरे तर अस्थिरतेचे आणि अनिश्‍चिततेचे सावट देशभरातीलच काँग्रेसवर आले असून, या दारुण पराभवामुळे कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांनी प्रचारात जिवापाड मेहनत घेतली होती आणि पाच वर्षांपूर्वीपेक्षा त्यांचे व्यक्‍तिमत्त्वही अधिक प्रगल्भ झाले आहे. मात्र, मोदी यांनी उभ्या केलेल्या हिंदुत्व, तसेच राष्ट्रवाद या सापळ्यात काँग्रेस सापडली आणि भाजपला मिळालेल्या २३ कोटी मतांपेक्षा निम्मी म्हणजे जवळपास बारा कोटी मते मिळूनही पदरी फक्‍त ५२ जागा आल्या. मतांचे हे आकडेच देशातील मोठ्या जनसमूहाला काँग्रेस अजूनही हवीशी वाटते, याची साक्ष देतात. त्यामुळे राहुल यांनी राजीनामा देऊ केल्यावर इतके बावचळून जाण्याचे आणि हुजरेगिरीचे दर्शन घडविण्याचे काहीच कारण नव्हते. दोन-अडीच दशकांपूर्वी गांधी घराण्याशिवायही काँग्रेस उत्तम रीतीने सत्ता राबवू शकते, हे राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आर्थिक सुधारणा राबवत, पक्षालाच नव्हे, तर देशाला सुगीचे दिवस दाखवले होते. मात्र, घराणेशाहीच्या विळख्यातील आताच्या काँग्रेसजनांना त्याचे पूर्ण विस्मरण झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत सुदृढ विरोधी पक्षाची गरज असते आणि आजतरी देशव्यापी अपील असलेला भाजपनंतर काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. तेव्हा राहुल गांधी बाजूला होत असतील, तर दुसऱ्या कोणाला पुढे करून पक्ष उभा करायला हवा. अन्यथा, आजचा हा गोंधळ उद्याही असाच पुढे सुरू राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha 2019 and congress president rahul gandhi in editorial