esakal | Loksabha 2019 : ऑल इज नॉट वेल! (अग्रलेख)
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena-bjp

भाजपचा अनेकांना बुचकळ्यात टाकणारा आणखी एक निर्णय हा लाखालाखांनी निवडून आलेल्या चार प्रमुख खासदारांना घरी बसवण्याचा आहे.

Loksabha 2019 : ऑल इज नॉट वेल! (अग्रलेख)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी केल्यानंतरही जागावाटप, उमेदवार निवड, तसेच दोन्ही पक्षांतून सुरू झालेले ‘आउटगोइंग’ बघून खरे म्हणजे भाजप व शिवसेना युतीने ऐन फाल्गुनातच दिवाळी साजरी करायला हवी होती! प्रत्यक्षात या दोन पक्षांतही कुरघोडीचे राजकारण सुरू असून, भाजपमध्येही उमेदवार निवडीवरून सुरू असलेला घोळ बघता तेथेही ‘ऑल इज नॉट वेल!’ असेच म्हणावे लागते. राजधानी मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा प्रचंड विरोध होता आणि त्याबरोबरच अन्य अनेक कारणांमुळे अखेर सोमय्या यांना घरी बसवणे भाजपला भाग पडले आहे. हा गोंधळ बरेच दिवस सुरू होता आणि त्यातच उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असे गृहीत धरून सोमय्या यांनी प्रचाराला सुरवातही केली होती. आता त्यांना आपले प्रचारसाहित्य बासनात बांधून ठेवून, तेथील उमेदवार मनोज कोटक यांच्या खांद्यावर हात ठेवून मतदारांना सामोरे जावे लागेल. पालघर मतदारसंघ शिवसेनेला देणे भाग पडले, तरी तेथे आपलाच पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार शिवसेनेच्या छावणीत पाठवून, भाजपने हरलेली लढाई तहात जिंकून दाखवली होती. त्याचबरोबर जालन्यातही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी उभारलेले बंडाचे निशाण खाली उतरावयाला लावण्यातही भाजपला यश आले होते. ईशान्य मुंबईत सोमय्या यांची उमेदवारी अखेर रद्द करावी लागल्याने शिवसैनिक आता आनंदाने कोटक यांच्या प्रचारात सहभागी होतील काय?
भाजपच्या पदरी खरी नामुष्की आली ती जळगाव मतदारसंघात. खरे तर तेथील विद्यमान खासदार ए. टी. तथा नाना पाटील यांनी २०१४ मध्ये मिळवलेला दणदणीत विजय लक्षात घेता, त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र, भाजपने तेथे पूर्वीच्या ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी अधिकृतरीत्या ‘ए-बी’ फॉर्मसह अर्जही दाखल केला. त्यानंतर वातावरण वेगाने पालटले. त्या निवडून येण्याची शक्‍यता बिलकूलच नाही, असे स्पष्ट झाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम बारा तास शिल्लक राहिले असताना मध्यरात्रीनंतर त्यांची उमेदवारी रद्द करून आता तेथे आमदार उन्मेष पाटील यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. अर्थात, गोंधळातील हा गोंधळ कमी म्हणावा, असेच चित्र जळगावपलीकडल्या नंदुरबार मतदारसंघात आहे. तेथे विद्यमान खासदार हिना गावित यांना उमेदवारी दिली असली, तरी तेथील एकूण वातावरण बघता तेथेही काही बदल होणार का, अशी चर्चा आहे. भाजपचा अनेकांना बुचकळ्यात टाकणारा आणखी एक निर्णय हा लाखालाखांनी निवडून आलेल्या चार प्रमुख खासदारांना घरी बसवण्याचा आहे. सोलापुरात २०१४ मध्ये शरद बनसोडे यांनी दीड लाखांचे मताधिक्‍य घेऊन सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या बड्या नेत्याचा परभाव केला होता. बनसोडे यंदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करतील, याची खात्री भाजपनेत्यांना वाटली नाही आणि त्यामुळे तेथून जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. खरी कमाल झाली ती नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात. तेथे गेल्या वेळी हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी ‘राष्ट्रवादी’च्या भारती पवार यांना जवळपास अडीच लाख मतांनी पराभूत केले होते. तरीही त्यांना घरी बसवून, भारती पवार यांनाच ‘दत्तक’ घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली! पुण्यातही अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून गिरीश बापट यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

मात्र, एकंदरीतच राज्यभरात भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि तिकीटवाटपांचा घोळ पक्षाला अडचणीचा ठरू  शकतो, असेच निदान आजचे तरी चित्र आहे आणि त्याला पश्‍चिम महाराष्ट्रही अपवाद नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व ‘राष्ट्रवादी’ या पक्षांना, त्यांच्या या बालेकिल्ल्यातच युतीने चारीमुंड्या चीत केले होते. तेथेही भाजपचे कार्यकर्ते नेमका कोणाचा प्रचार करत आहेत, ते सांगता येणे कठीण असल्यासारखी परिस्थिती आहे. युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षातील चित्र युतीतील या दोन पक्षांमध्येच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे आणि त्यामुळेच घाईघाईने घेतलेले निर्णय बदलावे लागत आहेत. ‘पार्टी वुईथ ए डिफरन्स’ म्हणून गेली चार दशके डिंडीम वाजवणाऱ्या पक्षाला हे खचितच शोभणारे नाही.

loading image