Loksabha 2019 : ‘उत्सव’ मांडियेला... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!  

वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!  

लोकसभा निवडणुकीच्या सध्या सुरू असलेल्या धामधुमीचे वर्णन निवडणूक आयोगानेच ‘लोकशाहीचा उत्सव’ असे केले आहे! प्रत्यक्षात सुरू आहेत त्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, हीन पातळीवरील शेरेबाजी, तसेच कुरघोडीचे राजकारण. मात्र, हा तथाकथित ‘उत्सव’ टिपेला नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या त्यांनी मोठ्या चतुराईने पाच वर्षांपूर्वी निवडलेल्या मतदारसंघात गेले दोन दिवस ठाण मांडून केले आहे. मतदानाच्या पहिल्या तीन फेरी पार पडल्या, तेव्हा राजकारणातील अवकाश विरोधकांनी बऱ्यापैकी व्यापल्याचे चित्र होते. मात्र, गुरुवारी मोदी यांनी प्रचंड गाजावाजा करून वाराणसीमध्ये केलेला ‘रोड शो’ आणि शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरताना जमवलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची मांदियाळी यामुळे आता सभोवतालच्या राजकीय अवकाशावर ‘मीडिया’च्या माध्यमातून त्यांनी कब्जा केल्याचे दिसत आहे. आपल्या वाराणसी या मतदारसंघाचा उल्लेख मोदी सातत्याने ‘काशी’ असाच करतात आणि त्यामागील इंगित उघड आहे. ‘काशी’ असा शब्द देशातील हिंदू जनतेच्या मनात धार्मिक भावना चेतवतो, याची त्यांना कल्पना आहे. खरे तर बनारस वा वाराणसी वा काशी अशा अनेक नावांनी उल्लेखले जाणारे हे शहर अनेकार्थांनी सर्वधर्मीय आहे. मात्र, मोदी यांनी ‘रोड शो’ आणि त्यानंतर केलेली ‘गंगा आरती’, तसेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कालभैरवाच्या मंदिरात जाऊन केलेली पूजा यामुळे वाराणसी ही केवळ हिंदुत्व आणि हिंदुत्व यांची जणू गंगोत्री असल्याचे दिसू लागले. हे सारे चित्र उभे राहिले ते घराघरांत जाऊन पोचलेल्या दूरचित्रवाणीच्या शेकडो वाहिन्यांमुळेच.

अर्थात, मोदी यांनी हा जो काही राजकीय अवकाश मीडियाच्या माध्यमातून गेल्या ४८ तासांत व्यापून टाकला, त्याची सुरवात चित्रपट अभिनेते अक्षय कुमार यांनी घेतलेल्या मोदी यांच्या ‘अ-राजकीय’ मुलाखतींमुळे बुधवारी सकाळी म्हणजे तिसऱ्या फेरीचे मतदान संपल्यावर अवघ्या १२-१४ तासांतच झाली होती. देशातील जवळपास सर्वच वाहिन्यांनी या मुलाखतीचा दिवसभर रतीब घातला आणि देशभरात मोदी यांच्या नावाचा गजर सुरू झाल्यासारखे भासू लागले. वाराणसीतील ‘रोड शो’, तसेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केलेल्या भाषणांमध्ये मोदी यांनी देशात प्रथमच प्रस्थापितविरोधी नव्हे, तर प्रस्थापितांच्या बाजूने लाट असल्याचे जाहीर करून टाकले! ही लाट वाराणसीपासून शेकडो मैल दूर असलेल्या तमिळनाडू वा केरळ अशा काही राज्यांबरोबरच देशभरातील ग्रामीण भागात दिसत नसली, तरीही मोदी यांनी हे जाहीर केले. अर्थात, मोदी यांचा हा सारा प्रयास काही केवळ वाराणसीतील विजयासाठी बिलकूलच नव्हता; कारण तो मतदारसंघ त्यांनी जिंकल्यातच जमा आहे, हे वास्तव आहे. मात्र, मोदी यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या ४८ तासांत केवळ वाराणसी या एका मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही हिंदुत्वाच्या गजरात! २०१४ मध्ये मोदी वाराणसीत आले, तेव्हाच्या भाषणांत त्यांनी गंगा स्वच्छ करण्यापर्यंत अनेक बाबींचा विकासाच्या अंगाने उल्लेख केला होता. गुरुवार-शुक्रवारच्या भाषणांत मात्र मोदी यांनी त्या पाच वर्षांपूर्वीच्या भाषणांतील सारे संदर्भ टाळले आणि केवळ हिंदुत्वाचाच नारा दिला. मोदी यांचे बदललेले ‘नॅरेटिव्ह’ हे राष्ट्रभक्‍तीचा गजर करणारे होते आणि त्यानिमित्ताने त्यांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शनही घडवून आणले. अर्थात, विकासाचा नारा मोदी यांच्या भाषणांतून गेले काही दिवस गायब झाला आहे. त्यामुळे वाराणसीत त्यांनी त्याचा उल्लेख न करणे, हे अपेक्षितच होते.

मोदी यांनी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख पक्षांचे उद्धव ठाकरे, नितीशकुमार, प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान आदी नेत्यांबरोबरच भाजपचे अध्यक्ष अमित शहा, तसेच राजनाथ सिंह, नितीन गडकरी आदी नेत्यांनी हजेरी लावली आणि ‘रालोआ’तील ऐक्‍याचे दर्शन पुन्हा घडविले. मात्र त्याचबरोबर भाजपला वाटणारी मित्रपक्षांची गरजही त्यातून स्पष्ट झाली. या साऱ्या ‘मेगा शो’मुळे एक बाब पुनःश्‍च अधोरेखित झाली आणि ती म्हणजे कोणत्याही घटनेचे ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर करून, त्याचे मीडियामध्ये फुटेज मिळवणे, यामध्ये मोदी यांच्यासारखा कुशल नेता देशात दुसरा नाही. मोदी यांना तेच हवे असते, हे गेल्या पाच वर्षांत अनेकदा दिसून आले आहे. त्याशिवाय, आपले बदललेले ‘नॅरेटिव्ह’ केवळ भक्‍तमंडळींनाच नाही, तर प्रवाहाच्या काठावरील जनतेच्याही मनावर बिंबवण्यात मोदी यांचा हात धरणारा कोणी नाही. आता मोदी यांनी घडवून आणलेले हे शक्‍तिप्रदर्शन आणि त्यांनी दिलेला राष्ट्रवादाचा नारा याभोवतीच पुढच्या टप्प्यातील प्रचार भिरभरत राहणार आणि त्या वावटळीत विरोधकांनाही सामील व्हावे लागणार, हाच या साऱ्या ‘खेळा’चा अर्थ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 narendra modi varanasi roadshow in editorial