भाष्य : चौदाची आशा, एकोणीसचा विश्‍वास

उमेश उपाध्याय
मंगळवार, 28 मे 2019

देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे.

देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे.

पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा सारा माहोल असल्याने कोणत्याही विषयावर गप्पा सुरू झाल्या, तरी त्यांची गाडी राजकारणाकडे वळणार, हे उघडच होते. तसेच झाले. विषय उपस्थित झाला, तो मतदान करण्याचा. विशेषतः मत कोणाला द्यायचे हा विषय ओघानेच आला. पण आश्‍चर्य म्हणजे उपस्थित असलेल्या मित्रांपैकी कोणालाच रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे नावच सांगता येईना. त्यांनाच कशाला? मलादेखील एकाही उमेदवाराचे नाव आठवत नव्हते. दिल्लीतील राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या तीनच मुख्य राजकीय शक्ती होत्या. पण या तिन्ही पक्षांच्या एकाही उमेदवाराचे नाव कोणालाही सांगता आले नाही. १९७७पासून मी निवडणुकांचे अवकोलन करतो आहे; परंतु एकाही उमेदवाराचे नाव माहीत नाही, अशी वेळ पहिल्यांदाच आली. माझे मलाच आश्‍चर्य वाटले आणि मी विचार करू लागलो, की असे का झाले असावे?

थोडा विचार करता लक्षात आले, की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे २३ मे रोजी जे निकाल लागले, त्यातच याचे उत्तर दडलेले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ३५३ आणि भाजप ३०३ एवढ्याच आकड्यांवरून या निकालाचे रहस्य कळणार नाही. ‘एनडीए’ला देशातील २८ कोटी लोकांनी मतदान केले आहे आणि यापैकी बहुतांश मतदारांनी एकाच उमेदवाराला दिली आहेत! आणि त्या उमेदवाराचे नाव आहे नरेंद्र दामोदारदास मोदी. त्यामुळे आपल्या भागात कोण उभे आहे, भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे, या गोष्टीसुद्धा कोणी पाहत नव्हते. आपल्याकडच्या संसदीय लोकशाहीचा विचार करता, अशी मनोधारणा असणे कितपत सयुक्तिक, असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे ही इष्ट घटना नाही, असेही मत व्यक्त होऊ शकते. अशी मतमतांतरे स्वाभाविक आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की हे जे घडले ते वास्तव आहे. ते दुर्लक्षून चालणार नाही.

असे का घडले, या प्रश्‍नाच्या उत्तरातच या निवडणुकीचे वेगळेपण लक्षात येईल. २०१४मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा केंद्रात सत्तेवर आले, तेव्हा मतदारांना त्यांच्यात एक आशेचा किरण दिसत होता. हे काही पहिल्यांदाच घडत होते, असे नाही. या देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण हाताच्या मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचे झाले. मतदारांच्या या आशेची नौका अखेर वैफल्याच्या खडकावर जाऊन आदळत असे. गेल्या पन्नास वर्षांतील निवडणुकांचे निकाल पाहिले तर ही बाब आणखी स्पष्ट होईल.

१९७७मध्ये भारतातील जनतेने जनता पक्षाकडून मोठी आशा बाळगली होती. परंतु, अडीच वर्षांतच पुन्हा इंदिरा गांधी यांना सत्तेवर आणण्याची वेळ त्याच्यावर आली. १९८४मध्ये राजीव गांधी यांच्या रूपाने जनतेला एक आशेचा किरण सापडला. पण पाच वर्षांतच म्हणजे १९८९मध्येच त्या आशावादाचा नि स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्यानंतर १९९६, १९९८, २००४  किंवा २००९च्या सार्वत्रिक निवडणुका पाहिल्या तर असे दिसते, की जनतेच्या आशावादाला विश्‍वासात परिवर्तित करणे कोणताही पक्ष वा पंतप्रधानांना जमले नाही. २०१९ची निवडणूक अशी पहिली निवडणूक आहे, की ज्या वेळी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनतेने पंतप्रधानांना आधीच्या बहुमतापेक्षा जास्त बहुमत मिळवून दिले. आधीपेक्षा जास्त विश्‍वास दाखवला. आशेला विश्‍वासात रूपांतरित करणे हे केवळ राजकीय-सामाजिक जीवनापुरतेच नाही, तर मानवी नातेसंबंधांतीलही एक मुख्य आधारतत्त्व असते. विश्‍वासार्हता मिळविणे ही सोपी गोष्ट नसते. ती केवळ भाषणांतून येत नाही, तर ठोस अशा कर्तृत्वातून येते. आशेच्या दुधात सत्कर्माचा गोडवा मिसळला आणि घुसळला तर विश्‍वास नावाचे मधुपेय तयार होते.

आपल्या जीवनात काही चांगला बदल घडावा, अशी मतदारांची अपेक्षा आपल्या नेत्याकडून असतेच. पण भारताचे एक वैशिष्ट्य असे, की मतदार आणि नेता यांच्यातील नाते केवळ देवघेवीच्या स्वरूपाचे नसते. त्यांच्यातील बंध केवळ व्यापारी स्वरूपाचे नसतात. त्या नात्याला भावनिक परिमाण असते. असे भावनात्मक बंध एकदा का तयार झाले, की लोक आपले तात्कालिक हित, आपली जात, भाषा, प्रांत, पंथ आणि धर्म यांच्यापलीकडे जाऊन अधिक व्यापक विचार करू लागतात. बहुतेक राजकीय विश्‍लेषकांनी मोदी यांच्या भव्य अशा विजयाची कारणे सांगताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांची चाणक्‍य नीती, मजबूत पक्षसंघटन, राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान, खंबीर नेतृत्व, पंतप्रधानांचे प्रभावी वक्तृत्व, विरोधी पक्षांचे अपयश आणि सरकारी जनकल्याण योजनांचा परिणाम या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. पण हे केवळ अर्धसत्य आहे. यातील अनेक गोष्टी कमी-अधिक फरकाने याआधीच्या सरकारांमध्येही शोधता येतील. या वेळचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो- नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदावरील आचरण हाच. देशातील अनेकांशी बोलताना मला हे जाणवले, की त्यांचे पंतप्रधानांशी काहीएक भावनिक नाते निर्माण झाले आहे. जवळजवळ प्रत्येकाचे मत असे पडले, की मोदी यांनी स्वतःसाठी काही केले नाही. ते देशासाठी काम करीत आहेत. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या शब्दांत सांगितले; पण त्यामागची भावना हीच होती.
गेल्याच वर्षीची गोष्ट. मोहंमद जाकीर या २५ वर्षीय युवकाशी बोलत होतो. तो म्हणाला, ‘आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार.’ मी विचारले, ‘असे तू का म्हणतोस आणि कशाच्या आधारावर म्हणतोस?’ त्यावर जाकीर म्हणाला, ‘मोदी हे देशासाठी काम करीत आहेत. हे पाहा, मोदी जी कामे करीत आहेत, ती सारी देशाच्या हितासाठीच करताहेत. माणूस भला आहे.’ केवळ माध्यमिक शिक्षण झालेला जाकीर असे म्हणत होता. त्याने दिलेले उत्तर हेच २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाचे सार आहे. २०१४मध्ये ज्या आशेने, उत्साहाने जनतेने मतदान केले, त्याला त्यांच्या नेत्यानेही तसाच चांगला प्रतिसाद दिला आणि त्या आशावादाला २०१९मध्ये विश्‍वासात परावर्तित करण्याची किमया साधली. जाकीरच्या त्या विश्‍वासावर आता भारतीय जनतेने बहुमताने मोहोर उमटविली आहे.
(लेखक राजकीय विश्‍लेषक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha 2019 umesh upadhyay write Expectations from the Government