भाष्य : सार्वजनिक जीवनातील ययातीचे वारस

कितीही वय झाले तरी सत्ता, मत्ता आणि अधिकार यांचा मोह सुटत नाही. त्यापायी मागून येणाऱ्या आपल्याच वारसांचे रस्ते आपणच कुंठित करून ठेवतो याचेही भान राहत नाही.
Yashwant Sinha
Yashwant SinhaSakal
Summary

कितीही वय झाले तरी सत्ता, मत्ता आणि अधिकार यांचा मोह सुटत नाही. त्यापायी मागून येणाऱ्या आपल्याच वारसांचे रस्ते आपणच कुंठित करून ठेवतो याचेही भान राहत नाही.

कितीही वय झाले तरी सत्ता, मत्ता आणि अधिकार यांचा मोह सुटत नाही. त्यापायी मागून येणाऱ्या आपल्याच वारसांचे रस्ते आपणच कुंठित करून ठेवतो याचेही भान राहत नाही. नव्या पिढ्यांची कार्यक्षमता, कल्पनाशक्ती बहरात असते तेव्हा त्यांचा उपयोग समाजाला व्हायला हवा.

ययातीची कथा आपल्या पौराणिक साहित्यात प्रसिद्ध आहे. पराक्रमी म्हणून विख्यात असलेल्या या राजाची मदत साक्षात देवराज इंद्राने युद्धासाठी घेतली होती. अनेक लहानमोठी राज्ये जिंकून घेऊन तो मोठ्या भूभागाचा सम्राट बनला होता. सत्तेबरोबर येणारी सर्व सुखे त्याच्या पायावर लोळण घेत होती. त्याला आव्हान देण्याची ताकद अन्य कोणामध्ये नसल्यामुळे तो सर्व सुखांचा उपभोग निर्वेधपणे घेत होता. सत्ता व सत्तेबरोबर येणाऱ्या सुखांची त्याला इतकी सवय झाली होती, की वार्धक्यामुळे त्या सर्वांवर पाणी सोडायची वेळ येताच तो कमालीचा बेचैन झाला. सत्ता व सुखे उपभोगत राहण्यासाठी आपल्या मुलांचे तारुण्य उधार घ्यायलाही त्याने मागेपुढे पाहिले नाही. तसे करताना आपण आपल्याच मुलांचे जीवन उद्ध्वस्त करतो आहोत, हा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरु असलेले राजकारण पाहून मला आज ही कथा अपरिहार्यपणे आठवली.

हा लेख प्रसिद्ध होईल, त्या दिवशी राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल लागलेला असेल. भारतीय जनता पक्ष -राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय लोकांनी स्वाभाविकपणे गृहीत धरला होता. त्यांची उमेदवारी रालोआने जाहीर केल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. याचे कारण भारतीय राजकारणात त्यांचे नाव परिचित नव्हते. ओडिशा या आजही अप्रगत मानल्या जाणाऱ्या राज्याच्या मयूरभंज जिल्ह्यात बाईडापोसी नामक एका लहानशा खेड्यात, अत्यंत गरीब, आदिवासी घरात त्यांचा जन्म झाला. आज ६४ वर्षांच्या असलेल्या श्रीमती मुर्मू ह्या स्वत:च्या मेहेनतीने मोठ्या झाल्या आहेत. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर श्रीमती मुर्मू यांनी ओडिशाच्या राज्य सरकारी पाटबंधारे खात्यात सहाय्यक कारकून म्हणून कामाला सुरुवात केली. नंतर त्या शिक्षिका झाल्या. दरम्यानच्या काळात त्या भाजपच्या संपर्कात आल्या. ओडिशा हा काही भाजपाचे बलस्थान असलेला प्रदेश नाही. तरी अन्य कोणत्याही राजकीय पक्षात न जाता भाजपाच्या कामात स्वत:ला झोकून देऊन पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न त्या प्रामाणिकपणे करत राहिल्या. नगरपंचायतीचे सदस्यत्व, पक्षाचे जिल्हाध्यक्षपद असे टप्पे करत त्या ओडिशा विधानसभेत निवडून गेल्या.

बिजू जनता दल व भाजपा यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात मुर्मू यांना दोन वेळा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता देशात व अनेक राज्यांमध्ये आल्यानंतर त्या मुर्मू झारखंडच्या राज्यपाल झाल्या. झारखंड हे आदिवासी बहुल राज्य आहे. ह्या राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या आदिवासी नेत्या. झारखंडच्या राज्यपालांनी आपली पाच वर्षांची मुदत पूर्ण केल्याची परंपरा नव्हती. श्रीमती मुर्मू यांनी ती मोडून पाच वर्षांचा कार्यकाल कोणताही कटू, वादग्रस्त प्रसंग घडू न देता पूर्ण केला. त्याचबरोबर तेथे काम करताना आपल्या प्रशासन कौशल्याचा परिचय देखील दिला.त्यावेळेला झारखंडमध्ये भाजपाचे सरकार होते. आदिवासींच्या जमिनीवरील हक्कांमध्ये बदल करणारी दोन विधेयके राज्य सरकारने आणली होती. पण, श्रीमती मुर्मू यांनी आपल्या अधिकारात ती रोखून धरली. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली. नंतर ते बदल कायमचे बारगळले. देशाच्या कोणत्याही भागातील आदिवासींच्या हक्कांबद्दलची जागरूकता व त्यांचे रक्षण करण्याचा ठाम निर्धार ह्या दोन्ही गुणांचा परिचय श्रीमती मुर्मू यांनी त्या प्रसंगी दिला. मृदुभाषी स्वभावाच्या मुर्मू जमिनीवर पाय असलेल्या, समाजाशी, कार्यकर्त्यांशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

संकुचित उद्देश

एनडीएच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, अन्य विरोधी पक्ष व डाव्या आघाडीने मिळून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली. सिन्हा ८५ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात पाटणा शहरात झाला. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर ते IAS झाले व २४ वर्षे त्यांनी प्रशासकीय सेवा केली. परराष्ट्र व अर्थखात्यांमध्ये त्यांनी सर्वात अधिक काळ सेवा केली. नंतर ते राजकारणात आले. जनता पार्टी, जनता दल, भारतीय जनता पक्ष, तृणमूल काँग्रेस या पक्षांमध्ये ते वावरले. ते राज्यसभा, लोकसभा व बिहार विधानसभेचे सदस्य होते. (कै). अटलजींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थ व परराष्ट्रमंत्री पदे भूषविलेली आहेत. म्हणजे भारतीय राजकारण्याला जे जे मिळू शकते ते सर्व त्यांना मनमुराद मिळालेले आहे. तरी भाजपने पुन्हा राज्यसभा सदस्यत्व दिले नाही म्हणून खालच्या स्तरावर जाऊन मोदींवर यथेच्छ व्यक्तिगत टीका करत त्यांनी पक्ष सोडला व ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल आणि राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवली. ‘मी निवडून आलो तर रबरस्टँप राष्ट्रपती रहाणार नाही’ अशा वल्गना त्यांनी केल्याच. त्या वल्गनांना घटनात्मकदृष्ट्या काही आधार नव्हता, हा भाग वेगळा. पण, आपला मोदी व भाजपद्वेष व्यक्त करत रहाणे एवढा एकच उद्देश त्यांच्या या वक्तव्यामागे होता.

यशवंत सिन्हांच्या या राजकारणात त्यांचे चिरंजीव जयंत सिन्हा यांचे कायम नुकसान होत राहिले. जयंत सिन्हांना भाजपाने लोकसभा उमेदवारी दिली व ते निवडूनही आले. पण, आपल्याला डावलून मुलाला खासदारकी दिली गेली, हेही त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे ते स्वत:च्या मुलावर सुद्धा अत्यंत कटू शब्दात टीका करत राहिले. यशवंत सिन्हांच्या अशा वागण्यामुळे जयंत सिन्हांना दुहेरी नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. स्वत:ची सत्ता लालसा पुरी करण्यासाठी आपल्या मुलाच्या कारकिर्दीची पर्वा न करणाऱ्या यशवंत सिन्हांकडे बघून ययातीची आठवण होणे अपरिहार्य आहे.

अगदी तशीच नसली तरी वेगळ्या अर्थाने तीच परिस्थिती उपराष्ट्रपती निवडणुकीत आहे. भाजपा-रालोआने उभे केलेले जगदीप धनकड ७१ वर्षांचे आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मिळून उभ्या केलेल्या मार्गारेट अल्वा ८० वर्षांच्या आहेत. सलग पाच दशके त्यांच्याकडे खासदारकी आहे. कर्नाटकातील एका नामवंत काँग्रेस घराण्यातून त्या पुढे आल्या. पक्षातील पदांसह चौवीस वर्षे खासदारकी, केंद्रातील मंत्री, राज्यपाल अशी विविध शासकीय पदे त्यांनी सांभाळली आहेत. काँग्रेस सत्तेवरून गेल्यानंतर त्या सार्वजनिक जीवनात दिसलेल्या नाहीत. कोणत्याही विवादात फारशा अडकलेल्या नाहीत व तोंडाळपणासाठी प्रसिद्ध नाहीत, ही त्यांची जमेची बाजू! पण, सांकेतिक विरोधासाठी निवडणूक लढवताना सुद्धा तुलनेने तरुण पिढीला, ज्यांना संधी मिळाल्या नाहीत अशा एखाद्या व्यक्तीला पुढे चाल द्यावी असे विरोधकांपैकी कोणालाही वाटले नाही.

आपल्या सार्वजनिक जीवनाची ही शोकांतिका आहे. कितीही वय झाले, व्याधींनी ग्रासले तरी सत्ता, मत्ता आणि अधिकार यांचा मोह सुटत नाही. त्यापायी आपल्या मागून येणाऱ्या आपल्याच वारसांचे रस्ते आपणच कुंठित करून ठेवतो याचेही भान रहात नाही. पण, ही प्रवृत्ती समाजासाठी हानिकारक आहे. नव्या पिढ्यांची कार्यक्षमता, कल्पनाशक्ती बहरात असते तेव्हा त्यांचा उपयोग समाजाला व्हायला हवा. तो या प्रवृत्तीमुळे कमी प्रमाणात होतो. समाजाच्या वाटचालीचा वेग वाढवण्यासाठी सर्वच क्षेत्रातल्या `ययातीच्या वारसां’नी योग्य वेळी थांबण्याचा विचार करायला काय हरकत आहे?

(लेखक महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.)

madhav.bhandari@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com