esakal | आम आदमी ग्यान बतावे... 
sakal

बोलून बातमी शोधा

आम आदमी ग्यान बतावे... 

जमिनीवर ज्यांची पाळेमुळे घट्ट आहेत, अशा बिनभिंतीच्या अतिप्राचीन निसर्गशाळेत शिकलेल्या युवक-युवतींच्या ज्ञानाला बिनभिंतीच्या आधुनिक सायबरशाळेतील ज्ञानाची जोड दिल्यास त्यांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून भारतातील अनेक विद्या शाखांमध्ये नवचैतन्य सळसळू शकेल.

आम आदमी ग्यान बतावे... 

sakal_logo
By
माधव गाडगीळ

जमिनीवर ज्यांची पाळेमुळे घट्ट आहेत, अशा बिनभिंतीच्या अतिप्राचीन निसर्गशाळेत शिकलेल्या युवक-युवतींच्या ज्ञानाला बिनभिंतीच्या आधुनिक सायबरशाळेतील ज्ञानाची जोड दिल्यास त्यांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून भारतातील अनेक विद्या शाखांमध्ये नवचैतन्य सळसळू शकेल.

मेंढा(लेखा) चारही बाजूंनी अरण्याने वेढलेले गोंड आदिवासींचे निसर्गरम्य गाव. नुकताच इथे सामूहिक वनसंपत्तीवरचे अधिकार हातात घेऊन काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्यात सहभागी झालेल्या गावांनी पाठवलेल्या तरुण-तरुणींसाठीचा पाच महिन्यांचा अभ्यासक्रम शिकवण्यात मी खुशीने सहभागी झालो होतो. आपण निसर्गरम्य स्वित्झर्लंडचे कौतुक करतो. परंतु, स्वित्झर्लंडची विपुल वनराजी केवळ गेल्या १६० वर्षांत फोफावलेली आहे. त्यापूर्वी स्वित्झर्लंडचे केवळ चार टक्के वनावरण शिल्लक होते. तेव्हा लोकजागृती होऊन त्या देशाने पुन्हा जंगल वाढवले आणि जे वाढवले ते सरकारी खात्याच्या हातात देऊन नाही. स्वित्झर्लंडचे सारे जंगल गावसमाजांच्या मालकीचे आहे. सामूहिकरीत्या चांगली काळजी घेऊन त्यांनी वनराजी पुनरुज्जीवित केली. लोकांच्या सान्निध्यात, लोकांच्या प्रयत्नाने, कळकळीने निसर्ग सुस्थितीत राहतो. आपल्या वनाधिकार कायद्यातून हीच फलप्राप्ती होऊ शकेल. अभ्यासक्रम शिकवताना मला हे प्रकर्षाने जाणवले. आणखी जाणवले की या अभ्यासक्रमातील वर्गात सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय खास जिव्हाळ्याचा होता, त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.

गेली वीस वर्षे लोकांबरोबर वनपरिसराच्या अभ्यासासाठी मी मेंढा(लेखा)ला मुक्काम करतो. इथली खास खुशीची आठवण म्हणजे चैत्रात सकाळची न्याहारी करताना वरून मोहाची फुले टपकायची आणि मटकीच्या उसळीबरोबर या ताज्या मिठ्ठास फुलांना मजेत मटकावायचो. केवळ भारत, श्रीलंका, नेपाळ, म्यानमारमध्ये आढळणारा मोहा एक अफलातून वृक्ष आहे. हजारो वर्षे लोकांनी याला प्रेमाने ‘मोहामाई’ संबोधत सांभाळला आहे. जंगलात, शेतात, गावठाणात कोठेही त्याला तोडत नाहीत. जगात कुठल्याही दुसऱ्या प्रजातीच्या वनस्पतीच्या पाकळ्या मोहासारख्या साखरेने ठेचून भरलेल्या नसतात. फुले वाळवून त्यांचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आवडीने खाल्ले जातात; सणासुदीला पिण्यासाठी मोहाची दारूही काढतात. जीवसृष्टीचा अभ्यासक म्हणून मोहाचीच फुले गोड का असा मला विचार पडतो. सजीवांची सारी गुणवैशिष्ट्ये निसर्गनिवडीतून पारखली जातात. यांच्यातून एक तर सजीवांच्या आयुष्याची दोरी आणखीन बळकट होते किंवा त्यांचे प्रजोत्पादन वाढते. पुंकेसर आणि बीजांडांच्या संगमातून बीजोत्पादन हे फुलांचे इतिकर्तव्य आहे. वनस्पती यासाठी वारा, पाणी आणि नानाविध प्राण्यांची मदत घेतात. प्राणी फुकटंफाट सेवा पुरवत नाहीत; त्यांना बिदागी म्हणून मधाचे बोट लावले जाते. या मधासाठी दिवसा उमलणाऱ्या फुलांवर मधमाशा, फुलपाखरे, अमेरिकेत हमिंगबर्ड अथवा आपल्याकडे सनबर्ड आणि रात्री उमलणाऱ्या फुलांवर पतंग अथवा वटवाघळे लोटतात. मोहाची फुले रात्री उमलतात; पहाटे गळतात. फुलपाखरांचे भाईबंद पतंग पाकळ्या खाणार नाहीत, तेव्हा वटवाघळेच पाकळ्यांची गोडी चाखत मोहाचे परागीकरण करत असणार. भारतात मोहाचे वृक्ष सर्वदूर भरपूर आढळतात; आपल्याकडचे अनेक शास्त्रज्ञ परागीकरणाचा अभ्यास करतात. परंतु मोहाचे परागीकरण कसे होते याचा कुणीही विचार केलेला नाही; त्यावर कुठलेही संशोधन झालेले नाही. खरे तर अशा अभ्यासातून काहीतरी नावीन्यपूर्ण निष्कर्ष पुढे येतील आणि त्या शास्त्रीय कामाला जगन्मान्यता मिळेल. मग असे काम का झाले नाही? याचे एकच उत्तर आहे: भारतातले बहुतांश शास्त्रज्ञ नक्कलखोरीत गढलेले असतात. अमेरिकेत हमिंगबर्डच्या परागीकरणावर अभ्यास झाले आहेत ना, मग त्याचे अनुकरण करत आपण सनबर्डवर काहीतरी अभ्यास करावेत एवढेच त्यांना सुचते. भारतातल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टीचा फायदा घेऊन डोके चालवून अगदी नव्या पद्धतीचे काम करावे, असे सुचतच नाही. तर मग काय करावे?

मेंढा(लेखा)तील अभ्यासक्रमाच्या निमित्ताने निसर्गात घट्ट पाय रोवलेल्या, मोहतरूची फुले वेचुनी उदरनिर्वाह करणाऱ्या युवक-युवतींच्या सहवासात अगदी नवीन शक्‍यता माझ्या डोळ्यांपुढे आल्या आहेत. गदिमा सांगतात: बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे वेली पशू पाखरे, यांशी गोष्टी करू. आदिमानवाच्या काळापासून आजपावेतो, आता निसर्गापासून दुरावलेली शहरी मंडळी सोडता, सगळे जण या बिनभिंतीच्या निसर्गशाळेत शिकत आलेले आहेत. आमच्या अभ्यासक्रमातील सगळे विद्यार्थी असेच खूप काही शिकलेले होते. शेकडो वनस्पती-प्राण्यांबद्दल त्यांना खोल, जीवशास्त्रातील अनेक पदवीधारकांहून अधिक समज होती.  ते मानवजातीच्या इतिहासात अलीकडेच सुरू झालेल्या भिंतीआडच्या शाळांत थोडेफार शिकलेले होते; परंतु मुख्यतः इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे त्यांच्यातले तल्लख विद्यार्थीसुद्धा बारावी नापास होते. आता त्यांना आणखी एका आगळ्या-वेगळ्या निसर्गातल्या नाही, तर सायबरविश्वातल्या बिनभिंतीच्या शाळेत शिकायची संधी मिळाली आहे. आजमितीस इंटरनेटवरून जगभरातली कुठलीही माहिती हाती लागू शकते. आरंभी ही माहिती शोधणे जिकीरीचे होते. पण २०००नंतर ‘विकिपीडिया’ हा पूर्णपणे विनामूल्य सर्वसमावेशक ज्ञानकोश अस्तित्वात आला आणि कोणत्याही विषयावरची अद्ययावत माहिती उपलब्ध होऊ लागली. हळूहळू हा कोश सर्वसामान्यांनाही भावू लागला. इतका की २०१३मध्ये लोकप्रिय झालेल्या ‘चेन्नई एक्‍सप्रेस’ या बॉलिवूड फिल्ममधल्या लुंगी डान्समध्ये नाचत नाचत शाहरुख गाऊ लागला ‘घर जाके गुगल कर लो, मेरे बारेमे विकिपीडियापे पढ लो’ त्या वेळी जगात एक अब्ज स्मार्टफोन वापरात होते, पण महाग होते आणि सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोचले नव्हते. पण हेही भराभर बदलले आहे आणि आज अगदी दुर्गम भागातल्या खेड्यापाड्यांतसुद्धा स्मार्टफोन पोचले आहेत, एवढेच नव्हे तर युनिकोडच्या सुविधेमुळे महाराष्ट्राचे एक कोटीहून जास्त नागरिक अगदी सराईतपणे स्मार्टफोनवर मराठीचा वापर करू लागले आहेत. 

इंग्रजी अमदानीत पुस्तके छापली जाऊन, ती शाळांमध्ये वापर वापरात येऊ लागली, तेव्हा दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका हिंदी दोह्यात थोडा बदल करून आजच्या अत्याधुनिक बिनभिंतीच्या शाळेबद्दल म्हणता येईल : ‘गुगल युगमें जानकारी होवे सबके साथ, आम आदमी ग्यान बतावे स्मार्टफोन लेके हाथ!’ आमचा विद्यार्थिवृंद स्मार्टफोनवर वेगवेगळी ॲप उतरवून घेत होते. आम्ही त्यांना अशा नानाविध ॲपच्या आधारे त्यांच्या गावच्या सामूहिक वनक्षेत्राची परिसीमा कशी नोंदवावी आणि ती ‘गुगल अर्थ’ प्रतिमेवर चढवून त्या क्षेत्रातील वनराजीचा अंदाज कसा घ्यावा, तसेच याचबरोबर इतर माहिती कशी नोंदवावी हे शिकवले; त्यांनी ते भराभर आत्मसात केले आणि आणि आता ते अशा अनेक सुविधा मराठीचा वापर करत शिताफीने हाताळत आहेत. लहानपणापासून बिनभिंतीच्या अतिप्राचीन निसर्गशाळेतून ते वनराजीबद्दल खूप काही शिकलेले आहेतच; त्याला बिनभिंतीच्या सायबरशाळेतल्या ज्ञानाची जोड दिल्यावर ते कुणालाही आश्‍चर्यचकित करेल अशा दर्जाचे शास्त्रीय काम करू लागले आहेत. ही आगळ्यावेगळ्या शास्त्रज्ञांची चमू उगीच परकी प्रकाशने वाचत त्यांची नक्कल करत संशोधन करण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवांतल्या जीवसृष्टीबद्दल नावीन्यपूर्ण संशोधन नक्कीच करू लागतील. लहानपणापासून त्यांनी रात्री शेतांवर, गावठाणात, जंगलात मोहाच्या फुलांवर निरीक्षणे केली आहेत. ते खरोखरच वटवाघळे मोहाचे परागीकरण करतात काय, हे कोडे सहजी सोडवू शकतील. मला उमेद आहे की या नवोदित शास्त्रज्ञांच्या सहभागातून भारतातले परिसरशास्त्र नवचैतन्याने सळसळू लागेल.

loading image
go to top