esakal | आम्रफळाची लज्जत न्यारी...
sakal

बोलून बातमी शोधा

madhav gadgil

आम्रफळाची लज्जत न्यारी...

sakal_logo
By
माधव गाडगीळ

पोपटांनी खावे म्हणून मिठ्ठास आंबे रंगले; माणसाला ते भावले, त्याने ते भरपूर जोपासले. पण आजकाल आंब्यांची झाडे कवडीमोलाने विकून तोडली जाताहेत; हवेच्या प्रदूषणामुळे आंब्यांचे मोहर करपत आहेत. नक्कीच हे थांबवले पाहिजे.‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही.

 आं बा पाडाला येतो, कैरीची आंबटी जाऊन गोडी येते, हे परिवर्तन केव्हा, कसं, का होतं? जीवसृष्टीतल्या अशा सगळ्या घडामोडी उत्क्रांतीच्या ओघातील निसर्गाच्या पाखडणीतून आकार घेतात. तेव्हा विचारायला पाहिजे की आंबा ही वनस्पती जाती केव्हा, कुठे उपजली, तिची जडणघडण कशी झाली? निसर्गात आंबा भरपूर पावसाच्या सदाहरित अरण्यांचा रहिवासी आहे. तो ईशान्य भारत आणि ब्रह्मदेशातील चिक्कार पावसाच्या घनदाट अरण्यांच्या नदीकाठांचा मूलनिवासी आहे. तेथून तो निदान पंधराशे वर्षांपूर्वी भारतभर पसरत सह्याद्रीवर आणि कोकणात पोचला आणि तिथे तर ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ अशा राजपदी स्थानापन्न झाला.

घनदाट अरण्यांत जगायचे तर आंब्याच्या रोपांना उन्हापर्यंत पोचायला झटायला हवे. त्यासाठी बीजामध्ये अन्नाचा मुबलक पुरवठा हवा. म्हणून आंब्याची बाठ चांगली मोठी असते. अशा बाठींचा सडा जर झाडाखालीच पडला, तर त्या रोपाला आपल्या आईच्या सावटीत आपल्या भाईबंदांशी झगडायला हवे. उलट आंब्याच्या बाठी दूर-दूर फैलावल्या गेल्या, तर कुठे ना कुठे त्यातून रुजून आलेल्या रोपांना प्रकाशापर्यंत जास्त सहज पोचता येण्याची शक्‍यता आहे. हे कसे साधणार? कुठल्यातरी प्राण्यांना काहीतरी आमिष दाखवून बीज एकदा परिपक्व झाले, की ते लांबवर पोचवायला उद्युक्त करायला पाहिजे. साखरेत भरपूर ऊर्जा असते आणि त्यामुळे मानवाप्रमाणेच सारे प्राणी गोडीकडे आकर्षित होतात. हेच आहे आंब्याच्या गोड, रसाळ फळाचे रहस्य. निसर्गात पाडाला आलेल्या आंब्यांवर पोपटासारखे फलाहारी पक्षी तुटून पडतात.
पण आंबा पाडाला आल्यावरच हे फलाहारी त्याच्यावर तुटून पडायला हवेत; आधी नकोत. बीज परिपक्व होण्याआधीच्या अवस्थेतल्या हिरव्या कैऱ्या हिरव्या पानांमध्ये सहज लपून जातात. आंबट कैऱ्यांमधून प्राण्यांना फारशी ऊर्जा मिळत नाही, उलट त्यांचा विषारी चीक बाधतो. मी आणि माझे ‘आंबटशौकीन’ मित्र लहानपणी कैऱ्या पाडून खायचो आणि आणि अनेकदा त्यांचा चीक उतल्याने ओठांवर, गालांवर फोड आलेले असायचे. म्हणून पोपट कैऱ्यांच्या वाटेला जात नाहीत. पाडाला आलेले पिवळट, केशरी, लालसर आंबे डोळ्यांत भरतात, त्यांचा चीक ओसरतो. आमराईचे मालक एखाद्या पोपटाने आंब्याला चोच मारण्याची वाट पाहत राहतात; मगच ते आंबे उतरवून पिकण्यासाठी अढीला घालतात; आणि आंबे पिकतात केव्हा? मुख्यतः पावसाळ्याच्या तोंडाला. त्याआधी बाठी कोरड्याठण्ण जमिनीत रुजल्या, तर ती रोपे सुकून जायचा धोका असतो. म्हणून आंब्याला मोहर येतो उरे घोटभर गोड हिवाळा अशा माघ- फाल्गुनाच्या महिन्यात आणि आंबे पाडाला येतात वैशाखात. अर्थात ते जितक्‍या लवकर बाजारात येतील तितके जास्त दराने विकता येतात, म्हणून मळेवाले खूप खटपटीने हे ऋतुचक्र बदलायचा प्रयत्न करतात.

मधमाश्‍यांनी सहकार्य करावे म्हणून आंब्याचे झाड मोहराला मधाचे बोट लावते, फलाहारी प्राण्यांनी सहकार्य करावे म्हणून बीजाभोवती गोड गराचे वेष्टन घालते. हे असते खुशीचे सहजीवन. मानवसुद्धा आंब्याला फळांचा राजा ठरवतो आणि प्रयत्नपूर्वक आम्रवृक्षांची प्रजा वाढवत राहतो. पण आंब्याचे सगळेच सहजीवी असे उपकारक नसतात. आंब्याला कीड लागते, त्याच्यावर बांडगुळे वाढवून त्याचे शोषण करतात आणि आणि माणूसही वेगवेगळ्या प्रकारे आंब्याच्या झाडांना उपद्रव करतो. लाकडासाठी तो आंब्याची झाडे तोडतो. कमी पावसाच्या पानगळीच्या अरण्यातल्या सागवानासारख्या जातीच्या झाडांचे लाकूड जास्त बळकट असते ते गलबते, फर्निचर बनवण्यासाठी, इमारतींसाठी वापरले जाते. आंब्यासारख्या भरपूर पावसाच्या अरण्यात वाढलेल्या झाडांचे लाकूड त्या मानाने मऊ असते आणि असे लाकूड प्लायवुडसाठी उत्तम कच्चा माल आहे. स्वतंत्र भारतात प्लायवूड उद्योग जोराने फोफावला आणि त्यासाठी सरकारने लाकूड अगदी स्वस्तात उपलब्ध करून दिले. कारवार जिल्ह्यातल्या जंगलातले अप्पिमिडी नावाच्या वाणाच्या कैऱ्यांचे मोठे रुचकर लोणचे बनते. एकेका झाडाला वर्षाला सहज बाराशे ते पंधराशे रुपयांच्या कैऱ्या लागतात. या भागातले माझे शेतकरी मित्र रागारागाने सांगायचे, की इथल्या सरकारी राखीव जंगलातले अप्पिमिडी आंब्यांचे भलेमोठे वृक्ष प्लायवूड उद्योगांना फक्त शंभर रुपयांना विकण्यात आले.

भारतात आंब्याचे शेकडो वाण आहेत. हापूस, पायरी, मानकुराद, तोतापुरी, लंगडा, नीलम - पण सगळेच मानतात की रत्नागिरी- देवगडच्या हापूस आंब्याची काहीतरी जगावेगळी न्यारी लज्जत आहे. त्यांना प्रचंड मागणी आहे, भरपूर भाव मिळतो आणि रत्नागिरी - देवगड भागात त्यांच्या मोठमोठ्या आमराई आहेत; त्यांच्यावर हजारोंची उपजीविका अवलंबून आहे. पण आता या आमराई संकटाच्या छायेत आहेत, कारण कोकण किनाऱ्यावर कोळसा जाळत वीज उत्पादन करणे आणि दुसरेही अनेक प्रदूषक रासायनिक उद्योग उभारणे मोठ्या फायद्याचे आहे. भारत सरकारने स्वतः बनवलेला प्रदूषणाचा नकाशा ‘या भागात आताच भरमसाट प्रदूषण आहे; आणखी प्रदूषक उद्योग प्रस्थापित करू नयेत,’ असे बजावत असला तरी तो अहवाल जाणूनबुजून दडपून टाकण्यात आला आहे आणि इथे सातत्याने असे प्रदूषक उद्योग उभारण्याचे प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत असतात.

कुसुमाग्रज हिवाळ्यातल्या पहाटेचे वर्णन करतात: दवबिंदू बिलगून फुलांना, पानांना हसती! पण आज कोकणात अनेक ठिकाणी हिवाळ्यात आंब्याच्या मोहरावर बिलगलेले दवबिंदू हसत नाहीत, कारण ते हवेतल्या सल्फरच्या रेणूंमुळे आंबलेले असतात. अशा ॲसिड दवामुळे आंब्याचा मोहर करपतो. पानांवर अशा दवांत हवेतली कोळशाची राख कालवली जाते आणि जो लेप बसतो त्यामुळे झाडांची वाढ खुंटते, फळे नीट पोसली जात नाहीत. म्हटले जाते की ही विकासाची अपरिहार्य किंमत आहे. विकासाचा मूळ अर्थ आहे फुलांचे उमलणे, खुलणे. अवश्‍य विचार करावा, विज्ञानाधारित अहवाल डावलून, फुले करपवत लोकांच्या पोटावर पाय आणणे, ‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे ही कसली विकासाची उफराटी रीत आहे?

loading image